होफमान, रोआल्ड : (१८ जुलै १९३७). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी व जपानी शास्त्रज्ञ फुकूई केनिची यांनी रासायनिक विक्रियांच्या यंत्रणेविषयी स्वतंत्रपणे संशोधन केल्याबद्दल त्या दोघांना१९८१ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. 

 

रोआल्ड होफमान
 

होफमान यांचा जन्म झ्लोक्झो( पोलंड) येथे झाला. १९४९ मध्ये त्यांनी कुटुंबासह अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत स्थलांतर केले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची पदवी आणि १९६२ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी तीन वर्षे हार्व्हर्ड रोआल्ड होफमानविद्यापीठात कनिष्ठ फेलो म्हणूनरॉबर्ट बर्न्स वुडवर्ड यांच्याबरोबर संशोधन केले (१९६२–६५). ते कॉर्नेल विद्यापीठात रसायनशास्त्र आणि रासायनिक जीवविज्ञान विभागात सहप्राध्यापक (१९६५–६८), प्राध्यापक (१९६८–७४) आणि भौतिकीय विज्ञानाचे जॉन ए. न्यूमन प्राध्यापक (१९७४–९६) होते. ते कॉर्नेल विद्यापीठात फ्रँक एच्. टी. र्‍होड्स गुणश्री प्राध्यापक आहेत. 

 

होफमान आणि वुडवर्ड यांनी अपेक्षा नसलेल्या विक्रियांच्या यंत्रणे-विषयीचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला. या विक्रियांच्या यंत्रणा वुडवर्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवनसत्त्व ब१२ करिता गुंतागुंतीच्या रेणूच्या संश्लेषणात वापरल्या होत्या. होफमान आणि वुडवर्ड यांनी अणूंची वलये तयार होणाऱ्या किंवा वलये मोडणाऱ्या अनेक विक्रियांमध्ये घडणाऱ्या यंत्रणांचा शोध लावला. या यंत्रणा अधिक बदल घडवून आणणाऱ्या रेणूंच्या परिभ्रमण कक्षा गणितीय वर्णनाने ओळखता येतील अशा सममितींवर अवलंबून असतात, हा सिद्धांत वुडवर्ड-होफमान नियम या नावाने ओळखला जातो. योग्य अशा सुरुवातीच्या द्रव्यांपासून ठराविक वलयी संयुगे तयार होण्यास अयशस्वी ठरल्यासंबंधी व इतर संयुगे लगेच तयार झाल्यासंबंधी घटनांचे हा सिद्धांत वर्णन करतो. तसेच वलयी संयुगामधील वलये मोडून तयार झालेल्या उत्पादांच्या अणूंची मांडणीसुद्धा स्पष्ट करतो. होफमान यांचे संशोधन पुंजयामिकीवर आधारलेले असल्याने अणू कसे वर्तन करतात हे स्पष्ट झाले आहे. 

 

होफमान अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी या संस्थांचे सदस्य आहेत. तसेच रॉयल सोसायटी, इंडियन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस आणि रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे परदेशी सदस्य आहेत. त्यांना अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डी.एस्सी. पदवी दिली ( उदा., येल १९८०, कोलंबिया १९८२). तसेच त्यांना अनेक पुरस्कार व पदके मिळाली आहेत. त्यांनी पुढील ग्रंथ लिहिले : कॉन्झर्व्हेशन ऑफ ऑर्बिटल सिमेट्री (१९६९), सॉलिड्स अँड सर्फेसेस : ए केमिस्ट व्ह्यू ऑफ बाँडिंग इन एक्सटेंडेड स्ट्रक्चर्स (१९८८), केमिस्ट्री इमॅजिन्ड ( सहलेखक) १९९३

एरंडे, कांचन