ॲस्टन, फ्रान्सिस विल्यम : (१ सप्टेंबर १८७०—२० नोव्हेंबर १९४५). ब्रिटिश रसायन व भौतिकीशास्त्रज्ञ. १९२२ च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते.

त्यांचा जन्म हार्‌बोर्न, बर्मिंगहॅम येथे झाला व शिक्षण मालव्हर्न कॉलेज, बर्मिंगहॅम आणि केंब्रिज विद्यापीठात झाले. १९१० पासून जे. जे. टॉमसन यांचे साहाय्यक म्हणून त्यांनी कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत काम केले. १९२० मध्ये ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली. टॉमसन यांनी समस्थानिकांचा (तोच अणुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचा) शोध लावल्यानंतर ॲस्टन यांनी समस्थानिक असलेल्या मूलद्रव्यांच्या आंतररचनेसंबंधी संशोधन करण्याकरिता अधिकाधिक चांगल्या पद्धती शोधून काढण्यात आपले आयुष्य व्यतीत केले. पहिला द्रव्यमान वर्णपटलेखक [→ द्रव्यमान वर्णपटविज्ञान] ॲस्टन यांनीच तयार केला व त्याच्या साहाय्याने समस्थानिक असणारी अनेक मूलद्रव्ये शोधून काढली.

रॉयल सोसायटीने १९२१ मध्ये त्यांची फेलो म्हणून निवड केली. १९२२ मध्ये ह्यूझ पदक व रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक आणि १९३८ मध्ये रॉयल पदक हे बहुमान त्यांना मिळाले.

आयसोटोप्स (१९२२), स्ट्रक्चरल यूनिट्स ऑफ मटेरियल युनिव्हर्स (१९२५), मास स्पेक्ट्रा अँड आयसोटोप्स (१९३३) हे त्यांचे ग्रंथ आणि वायूतील विद्युत् विसर्जन, द्रव्यमान वर्णपट, समस्थानिक असणारी मूलद्रव्ये इ. विषयांवरील त्यांचे संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध आहेत. ते केंब्रिज येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.