निओडिमियम : एक धातुरूप मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Nd अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ६० अणुभार १४४·२४ ⇨ आवर्त सारणीतील (इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील) ⇨ विरल मृत्तिका समूहातील आणि ३ अ गटातील मूलद्रव्य वितळबिंदू १,०१९° से. उकळबिंदू ३,१२७° से. नैसर्गिक रीत्या आढळणाऱ्या स्थिर समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) अणुभार १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४८ असून त्यांचे प्रमाण अनुक्रमे २७·११%, १२·१७%, २३·८५%, ८·३०%, १७·२२% व ५·७३% असते किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारा) समस्थानिक १५० (दीर्घायुषी) स्थिर समस्थानिकांपैकी १४४ हा प्रकार क्षीण किरणोत्सर्गी असून तो आल्फा कण बाहेर टाकतो आणि त्याचे अर्धायुष्य (किरणोत्सर्गी पदार्थाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) ५ X१०१५  वर्षे इतके आहे. विद्युत् विन्यास (अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २, ८, १८, २२, ८, २ सामान्य संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) ३.

इतिहास : डिडीमियम ही धातू एक साधे मूलद्रव्य आहे असे समजून १८८५ मध्ये सी. ए. फोन वेल्सबाख यांनी तिच्या लवणांचे रासायनिक दृष्ट्या भिन्न असे दोन भाग केले आणि त्यांपासून मिळालेल्या धातूंना निओडिमियम आणि ⇨ प्रासिओडिमियम अशी नावे दिली.

आढळ : इतर विरल मृत्तिकांबरोबर निओडिमियम हे बऱ्याच खनिजांमध्ये आढळते. तथापि त्याचे व्यापारी उत्पादन फक्त ⇨ मोनॅझाइटापासून करतात. तसेच ते अणु-भंजनातून (अणुकेंद्राचे तुकडे होण्याच्या क्रियेतून) मिळणाऱ्या पदार्थांत आढळते.

निर्मिती : दुसऱ्या महायुद्धापर्यंत भागश: स्फटिकीकरणाने निओडिमियाची निर्मिती करण्यात येत आहे. हल्ली ⇨ आयन-विनियम पद्धतीचा वापर त्यासाठी करतात. तसेच त्याच्या वितळेलेल्या हॅलाइडांच्या विद्युत् विच्छेदनाने (विजेच्या साहाय्याने रेणूचे तुकडे करून) किंवा त्याच्या लवणांचे क्षार (अल्कली) व क्षारीय मृत्तिका धातूंनी (बेरियम, स्ट्राँशियम, कॅल्शियम इ.) ऊष्मीय क्षपण [⟶ क्षपण] करून त्याचे उत्पादन करतात.

गुणधर्म : शुद्ध धातू रूपेरी करडी असते. हवेत उघडी राहिल्यास आर्द्र हवेमुळे गंजून ती मळकट होते. शुद्ध स्थितीत ती मऊ व वर्धनीय असते. ही धातू हवेत उघडी राहिल्यास पेटते म्हणून ती निर्वातात किंवा अक्रिय (सहजासहजी रासायनिक विक्रिया न होणाऱ्या) वायूंत साठवितात. षट्‌कोणी बंदिस्त संरचनेच्या प्रकाराची घनता (२९८° के.ला) ७·००३ ग्रॅ.घ. सेंमी. इतर प्रकारच्या संरचनाही आढळून आलेल्या आहेत हवेत तिचे हळूहळू ⇨ ऑक्सिडिभवन होऊन निओडिमियम सेस्क्विऑक्साइड (Nd2O3) तयार होते. निओडिमियमाची थंड पाण्याबरोबर हळूहळू आणि गरम पाण्याबरोबर जलद विक्रिया होऊन हायड्रोजन वायू निर्माण होतो. त्रिसंयुजी निओडिमियम हे विरल मृत्तिकांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दाखविते व तयार होणारी संयुगे निळ्या रंगाची असतात. त्रिसंयुजी निओडिमियम आयनात (विद्युत् भारित अणूत) जोड इलेक्ट्रॉन नसल्याने ते समचुंबकीय [⟶ चुंबकत्व] असते. त्रिसंयुजी निओडिमियम आयन पाण्यात स्थिर असतो. Nd2O3 व Nd (OH)3 ही त्रिसंयुजी संयुगे होत. द्विसंयुजी आयन सजल विद्रवात अस्थिर असतो. NdI2 व NdCl2 ही द्विसंयुजी संयुगे ज्ञात आहेत. तसेच काही चतुर्संयुजी संयुगे तयार करण्यात आली आहेत.

अभिज्ञान : निओडिमियमाच्या लाल जांभळट विद्रावामुळे वर्णपटाच्या दृश्य भागात व जंबुपार (वर्णपटाच्या जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) भागात अनेक शोषण रेषा आढळतात. त्यांचा उपयोग निओडिमियमाच्या परिमाणात्मक विश्लेषणासाठी करतात.

उपयोग : या धातूचा उपयोग इलेक्ट्रॉनीय उद्योगात, पोलादनिर्मितीत व मिश धातूसारख्या मिश्रधातूच्या निर्मितीत करतात. मिश धातूमध्ये १५% निओडिमियन असून ठिणगी पाडून पेटविण्यास मदत करणाऱ्या सिगारेट लायटरसारख्या साधनांत ठिणगी उत्पन्न करणारा घटक (फ्लिंट) म्हणून धातूचा उपयोग करतात. त्याच्या संयुगांचा उपयोग मृत्तिका उद्योगात झिलईसाठी आणि काचेला रंग देण्यासाठी करतात. लोखंडामुळे काचेला येणारा रंग याच्या अशुद्ध ऑक्साइडामुळे नाहीसा होतो. तेजस्वी अंजिरी (पर्पल) रंगाची काच तयार करण्यासाठी याच्या शुद्ध ऑक्साइडाचा उपयोग करतात. निओडिमियम व प्रासिओडिमियम यांचे मिश्रण असलेल्या काचेत वर्णपटातील सोडियमाच्या D रेषांच्या भागातील डोळ्यांना धोकादायक असलेला प्रकाश शोषला जातो म्हणून अशा काचेचा उपयोग वितळजोडकाम (वेल्डिंग) करताना व फुंकून काचेच्या वस्तू बनविताना वापरण्याच्या चष्म्यांत करतात. काही कार्बनी रसायनांच्या निर्मितीत याचे ऑक्साइड व क्लोराइड यांचा उपयोग उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणारा पदार्थ) म्हणून करतात. ⇨ लेसरमध्येही निओडिमियमाचा उपयोग केला जातो.

पहा : विरल मृतिका.

ठाकूर, अ. ना.