एथिल क्लोराइड : एक महत्त्वाचे कार्बनी संयुग. रेणवीय सूत्र C2H5Cl. संरचना सूत्र :

एथिल क्लोराइड

एथिल क्लोराइड वायुरूप असून त्याचा वितळबिंदू –१३८·७°से. व उकळबिंदू १२·५° से. आहे. घनता ०·९२१४ ग्रॅ./मिली. पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे) असून अल्कोहॉलात विद्राव्य आहे. जाळल्यास हिरव्या रंगाची ज्योत मिळते. दाबाखाली बाटल्यांत द्रवस्वरूपात भरतात. त्यास ईथरसदृश्य वास असून मधुर पण जळजळीत चव आहे. द्रव रंगहीन असतो.

मोठ्या प्रमाणावर त्याचे उत्पादन पुढील पद्धतींनी करतात : (१) निर्जल झिंक क्‍लोराइडाच्या सान्निध्यात एथॅनॉलवर हायड्रोक्लोरीक अम्लाची विक्रिया करून, (२) एथिलिनामध्ये ॲल्युमिनियम क्लोराइड या उत्प्रेरकाच्या (विक्रियेत भाग न घेता तिची गती वाढविणार्‍या पदार्थाच्या) सान्निध्यात हायड्रोक्लोरिक अम्ल मिसळून.

बाजारात ते क्लोरिक व किलीन या नावांनी विकले जाते. ॲनेस्टाइल या नावाने विकल्या जाणार्‍या पदार्थात एथिल क्लोराइड व मिथिल क्लोराइड यांचे मिश्रण असते. सोम्नोफॉर्मामध्ये एथिल क्लोराइड व मिथिल क्लोराइड यांच्याबरोबर एथिल ब्रोमाइडही असते. या पदार्थाचा उपयोग तात्पुरती व स्थानिक बधिरता निर्माण करण्यासाठी करतात. किरकोळ शस्त्रक्रियांमध्ये (उदा., दात काढणे) हा पदार्थ पिचकारीने शरीराच्या पाहिजे त्या भागावर फवारतात. त्यावेळी –३५° सें.पर्यंत तपमान खाली जाऊ शकते. हुंगूनही याने गुंगी येते, मात्र ती क्लोरोफॉर्माइतकी टिकत नाही. ट्रेट्राएथिल लेड, सल्फोनॉल इत्यादींच्या निर्मितीत व प्रशीतनकारक (तपमान कमी करण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ) म्हणूनही त्याचा उपयोग करतात.

मुंबई, हैदराबाद व बडोदे येथील कारखान्यांतील एथिल क्लोराइडाच्या उत्पादनाने भारताची गरज बर्‍याच अंशी भागते.

कुलकर्णी, प्र.श्री.