बाइलश्टाइन, फ्रीड्रिख कोनराड : (१७ फेब्रुवारी १८३८–१८ ऑक्टोबर १९०६). रशियन रसायनशास्त्रज्ञ. Handbuch der organischenChemie (हँडबुक ऑफ ऑर्गॅनिक केमेस्ट्री) या कार्बनी संयुगाच्या कोशाचे व प्रमाणभूत संदर्भ ग्रंथाचे कर्ते. त्यांचा जन्म रशियातील सेंट पीटर्झबर्ग (हल्लीचे लेनिनग्राड) येथे व शिक्षण जर्मनीतील हायडलबर्ग, म्यूनिक व गटिंगेन झाले. १८५८ साली त्यांनी गटिंगेन येथे डॉक्टरेट पदवी मिळविली. नंतर काही काळ त्यांनी पॅरिस येथे अध्ययन व संशोधन केले. १८६० साली ते गटिंगेन येथे फ्रीड्रिख व्हलर यांचे साहाय्यक म्हणून आले. तेथेच १८६५ साली त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. वडिलांच्या निधनामुळे त्यांना रशियाला परतावे लागले व १८६६ साली ते सेंट पीटर्झ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दाखल झाले व सेवानिवृत्तीपर्यंत (१८९६) ते तेथेच होते.

बाइलश्टाइन, हान्स ह्यूब्नर व रूडोल्फ फिटिख यांनी १८६५–७१ या काळात एक रसायनशास्त्रविषयक नियतकालिका चालविले होते. बाइलश्टाइन यांनी विश्लेषणात्मक व कार्बनी रसायनशास्त्राविषयी बरेच संशोधन केले आहे. तथापि वरील संदर्भ ग्रंथ हेच त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. हा ग्रंथ १८८३ साली प्रसिद्ध झाला. तेव्हा माहित असलेल्या सु.१५,००० कार्बनी  संयुगांची माहिती सुसूत्रपणे यात दिलेली होती व त्यामुळे कार्बनी रसायनशास्त्रविषयक अध्ययन व संशोधन करणाऱ्‍याना हा ग्रंथ फार उपयुक्त ठरला. कार्बनी संयुगांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने ग्रंथाचे पुढील काम एकट्या व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचे झाले. त्यामुळे जर्मन केमिकल सोसायटीने याला पूरक असा बाइलश्टाइन हँडबुक हा ५ खंडांचा ग्रंथ प्रसिद्ध केला (१९०१–०६). नंतर १९३७ च्या आवृत्तीमध्ये १९१० पर्यंतची आणि पुढच्या पाचव्या आवृत्तीत १९१९ पर्यंतची माहिती समाविष्ट करण्यात आली होती. मान्यवर संस्थांनी आपले सदस्यत्व देऊन बाइलश्टाइन यांचा सन्मान केला होता. ते सेंट पीटर्झबर्ग येथे मृत्यू पावले.

मिठारी, भू. चिं.