व्ह्यूर्त्स शार्ल, आदोल्फ : (२६ नोव्हेंबर १८१७ – १२ मे १८८४). फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ. कार्बनी नायट्रोजन संयुगे, हायड्रोकार्बने आणि ग्लायकॉले यांसंबंधीच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध. जन्म स्ट्रँस्बर्गजवळील वॉल्फिशेइन येथे. १८४३ मध्ये स्ट्रँस्बर्ग विद्यापीठात वैद्यकातील डॉक्टरेट पदवी. ते पॅरिस येथे एकोल द मेदिसीन या संस्थेमध्ये ⇨झां बास्तिस्त आंद्रे द्यूमा यांचे साहाय्यक होते. (१८४५). पुढे तेथेच ते कार्बनी रसायनशास्त्र विषयाचे व्याख्याते (१८४९), प्राध्यापक (१८५३) आणि अधिष्ठाते (१८६६) झाले. १८७४ मध्ये सॉरबॉन येथे कार्बनी रसायनशास्त्राच्या अध्यासनावर नेमणूक.

व्ह्यूर्त्स (वुर्टझ) यांचा पहिला शोधनिबंध हायपोफॉस्फरस अम्लासंबंधी होता.(१८४२). त्यांनी १८४५ मध्ये फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड व कॉपर हायड्राइड यांचा शोध लावला. १८४९ मध्ये त्यांनी अमोनियापासून एथिल अमाइन(C2H5NH2), डायएथिल अमाइन [(C2H5)2NH] व ट्रायएथिल अमाइन [(C2H5)3N] तयार केले. १८५५ मध्ये त्यांनी अल्किल हॅलाइडांवर सोडियमाची क्रिया केली असता दोन हायड्रोकार्बन मूलकांचे एकत्रीकरण होऊ शकते, असे सिद्ध केले. ⇨रूडोल्फ फिटिख यांच्याबरोबर त्यांनी अँरोमॅटिक हायड्रोकार्बनांचे संश्लेषण करण्याकरिता व्ह्यूर्त्स विक्रिया विकसित केली.

   

ग्लायकॉलाच्या निर्जलीकरणाने व्ह्यूर्त्स यांनी एथिलीन ऑक्साइड मिळविले. हे ऑक्साइड द्वि-आणवीय कँल्शियम आणि बेरियम यांच्या ऑक्साइडसारखे समधर्मी संयुग मानले जाते. याप्रमाणेच ग्लिसरील ऑक्साइड हे त्रिआणवीय अँटिमनी आणि बिस्मथ या ऑक्साइडांचे समधर्मी संयुग म्हणून दाखविता येते. अशा प्रकारे कार्बनी आणि अकार्बनी ऑक्साइड संयुगांमधील सारखेपणा दाखवून व्ह्यूर्त्स यांनी रसायनशास्त्राचा एकीकृत सिद्धांत जाहीर केला.

ग्लायकॉलाचे ऑक्सिडीकरण करून त्यांनी लॅक्टिक अम्लाची समजातीय संयुगे तयार केली. १८६७ मध्ये त्यांनी आणि फ्रीड्रिख आउगुस्ट केकूले यांनी बेंझिनापासून फिनॉलाचे संश्लेषण करण्याची पद्धत शोधून काढली. व्ह्यूर्त्स यांनी एथिलीन ऑक्साइडपासून न्यूरीन, अँसिटाल्डिहाइडापासून अँल्डॉल आणि अल्किल हॅलाइडापासून एस्टरे यांचे संश्लेषण केले. तसेच त्यांनी कोलिनाचे प्रथम संश्लेषण केले (१९६७).

इ.स. १८६० साली व्ह्यूर्त्स आणि केकूले यांनी कार्लझ्रूए येथे इंटरनॅशनल केमिकल कॉग्रेसचे पहिले अधिवेशन भरविले. व्ह्यूर्त्स आणि एम. बर्थेलॉट यांच्या प्रयत्नांमुळे पॅरिस हे रसायनशास्त्राच्या अभ्यासाचे युरोपातील एक प्रमुख केंद्र बनले.

व्ह्यूर्त्स यांनी Dictionnaire de chimie pure et appliqué ( ३खंड, १८६८ – ७८, पुरवणी १८८०), Traite elementaire de chimie medical (२ खंड, १८६४-६५), La theorie atomique (१८७८) आणि Traite de chimie biologique (१८८५) या ग्रंथाचे लेखन केले. ते पँरिस येथे मृत्यू पावले.

सूर्यवंशी, वि. ल.