क्लोरोफॉर्म : वर्णहीन, विशिष्ट वासाचा, घशात जळजळणारा गोड चवीचा व न पेटणारा द्रव पदार्थ. सूत्र CHCl3. उकळबिंदू ६३·५° सें. वि. गु. १·४८९ पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारा) अल्कोहॉल, बेंझीन, ईथर व कार्बन डायसल्फाइडात विद्राव्य. लीबिक, सूबेरां व गथरी या तीन संशोधकांनी १८३१ च्या आसपास स्वतंत्रपणे याचा शोध लावला.

महत्त्वाच्या उत्पादन पद्धती : (१) एथिल अल्कोहॉल, विरंजक चूर्ण (रंग घालविणारे चूर्ण) व पाणी यांचे ऊर्ध्वपातन (वाफ करून व मग ती थंड करून तिच्यात तयार झालेले पदार्थ अलग करण्याची क्रिया) केले म्हणजे तीन टप्प्यांनी विक्रिया पूर्ण होते व क्लोरोफॉर्म तयार होतो. विरंजक चूर्ण व पाणी यांच्या विक्रियेने क्लोरीन व कॅल्शियम हायड्रॉक्साइड तयार होतात. अल्कोहॉलाचे प्रथम ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] होऊन ॲसिटाल्डिहाइड बनते, नंतर त्याचे क्लोरिनीकरण (रेणूत क्लोरीन बसविणे) होऊन ट्रायक्लोरो-ॲसिटाल्डिहाइड (क्लोरल) व त्यापासून शेवटी क्लोरोफॉर्म मिळतो. (२) एथिल अल्कोहॉलाऐवजी ॲसिटोन, विरंजक चूर्ण व पाणी यांपासूनही क्लोरोफॉर्म तयार करण्यात येतो. (३) मिथेन व क्लोरीन या वायूंची विक्रिया घडवून क्लोरोफॉर्म तयार केला जातो. (४) कार्बन टेट्राक्लोराइडाचे ⇨ क्षपण करून क्लोरोफॉर्म बनविता येतो. या विक्रियेकरिता लागणारा हायड्रोजन ओलसर लोह आणि हायड्रोक्लोरिक अम्ल यांपासून मिळवितात. (५) औषधी क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी क्लोरल व सोडियम हायड्रॉक्साइडाचा विद्राव यांचे एकत्र ऊर्ध्वपातन करतात.

गुणधर्म : (१) प्रकाश व हवा यांच्या परिणामामुळे क्लोरोफॉर्माचे अपघटन (मूळ रेणूचे तुकडे पडून लहान रेणू अथवा अणू बनणे) होऊन कार्बोनिल क्लोराइड (फॉस्जीन) हा विषारी वायू बनतो.

2CHCl3 + O2 2COCl2 + 2HCl
क्लोरोफॉर्म  ऑक्सिजन कार्बोनिल क्लोराइड हायड्रोक्लोरिक अम्ल

हा वायू तयार होऊ नये म्हणून क्लोरोफॉर्म गर्द तपकिरी रंगाच्या बाटल्यांत साठवितात व त्यामध्ये सु. १ % अल्कोहॉल मिसळतात म्हणजे कार्बोनिल क्लोराइड तयार झाले, तर त्याचे अल्कोहॉलामुळे एथिल कार्बोनेटामध्ये रूपांतर होते. (२) शुद्ध क्लोरोफॉर्माची सिल्व्हर नायट्रेटावर कसलीही विक्रिया होत नाही, पण त्याचे अपघटन झाले असल्यास पांढरा अवक्षेप (न विरघळणारा साका) मिळतो. (३) क्लोरोफॉर्म, जस्त व पाणी एकत्र तापविल्यास मिथेन वायू तयार होतो. (४) जस्त व हायड्रोक्लोरिक अम्लाच्या विक्रियेने क्लोरोफॉर्माचे रूपांतर मिथिलीन क्लोराइडामध्ये होते. (५) क्लोरोफॉर्म व सोडियम हायड्रॉक्साइडाचा अल्कोहॉली विद्राव यांच्या संयोगामुळे सोडियम क्लोराइड व सोडियम फॉर्मेट तयार होते. (६) प्राथमिक अमाइन (ज्यामध्ये NH2 गट आहे असे संयुग, उदा., ॲनिलीन), पोटॅशियम हायड्रॉक्साइड आणि क्लोरोफॉर्म हे एकत्र तापविले, तर कार्बिल अमाइन हे संयुग तयार होते. विशिष्ट दुर्गंधामुळे ते ओळखता येते. याला कार्बिल अमाइन विक्रिया म्हणतात.

CHCl3 + C6H5NH2 + 3KOH C6H5NC + 3KCl+3H2O
क्लोरोफॉर्म  ॲनिलीन कार्बिल अमाइन

(७) क्षाराच्या (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या पदार्थाच्या, अल्कलीच्या) उपस्थितीत क्लोरोफॉर्म व ॲसिटोन यांची विक्रिया होऊन क्लोरेटोन म्हणजे ट्रायक्लोरो-टर्शरी ब्युटिल अल्कोहॉल तयार होते. (८) क्लोरोफॉर्म व क्लोरीन यांच्या विक्रियेने कार्बन टेट्राक्लोराइड तयार होते. (९) संहत (विद्रावात प्रमाण जास्त असलेल्या) नायट्रिक अम्लाच्या विक्रियेने क्लोरोफॉर्मापासून क्लोरोपिक्रिन (नायट्रोक्लोरोफॉर्म) हा विषारी वायू तयार होतो.

CHCl3 + HNO3 CCl3NO2 + H2O
क्लोरोफॉर्म नायट्रिक अम्ल क्लोरोपिक्रिन पाणी

वर निर्देशित केलेल्या विक्रियेच्या साहाय्याने क्लोरोफॉर्माची संरचना (रेणूतील अणूंची मांडणी) व त्याचा मिथेनाच्या संरचनेशी असलेला संबंध स्पष्ट होतो. क्लोरोफॉर्माची संरचना खालीलप्रमाणे आहे.

उपयोग : क्लोरोफॉर्म हे एक तीव्र शुद्धिहारक (गुंगी आणणारे) संयुग असून त्याचा शस्त्रक्रियेपूर्वी शुद्धिहरणासाठी उपयोग करतात; तथापि त्याच्या अतिवापरामुळे चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक बदलांमध्ये) विकृती होतात. तसेच हृदय, यकृत व मूत्रपिंडास इजा होते. विद्रावक म्हणून तसेच रंजक आणि औषधे यांच्या निर्मितीत रासायनिक मध्यस्थ (दुसऱ्या एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील एक टप्पा) म्हणूनही त्याचा उपयोग करतात. खोकल्यावरील औषधांत शामक म्हणून, कृमिनाशक, वेदनाहारक, चोळण्याच्या औषधात व अंगग्रहरोधक (स्नायूच्या अनैच्छिक तीव्र आकुंचनाला रोध करणाऱ्या) इत्यादींसारख्या औषधांत त्याचा उपयोग करतात.

लेखक : गडम, द. द.