प्रेगल, फ्रिट्‌स : (३ सप्टेंबर १८६९-१३ डिसेंबर १९३०). ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ. १९२३ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. कार्बनी पदार्थांच्या ⇨सूक्ष्म-विश्लेषण तंत्रातील सुधारणेबद्दल विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म ऑस्ट्रियातील लायबाख (हल्ली युगोस्लाव्हियातील ल्यूब्ल्याना) येथे झाला. तेथीलच जिम्नॅशियममधून (विद्यापीठपूर्व शाळेतून) ते पदवीधर झाले. १८९४ मध्ये त्यांनी ग्रात्स विद्यापीठाची एम्.डी. ही पदवी मिळविली. ग्रात्स येथी त्यांनी नेत्रवैद्यकाचे काम केले. तेथे ते शरीरक्रियावैज्ञानिक रसायनशास्त्रात संशोधन करू लागले. त्यांनी कोलिक अम्लाच्या विक्रियांबद्दल संशोधन केले. मानवी मूत्रातील ‘कार्बन : नायट्रोजन’ हे प्रमाण उच्च का असते, याची कारणे त्यांनी शोधली. या शोधामुळे ते १८९९ मध्ये ग्रात्स विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञानाचे व्याख्याते झाले. १९०४ मध्ये ते जर्मनीला गेले. तेथे त्यांनी कार्ल हूफ्नर यांच्याबरोबर ट्यूर्बिंगेन येथे शरीरक्रियावैज्ञानिक रसायनशास्त्राचा, व्हिल्हेल्म ओस्टव्हाल्ट यांच्याबरोबर लाइपसिक येथे भौतिक रसायनशास्त्राचा आणि एमील फिशर यांच्याबरोबर कार्बनी रसायनशास्त्राचा अभ्यास केला. बर्लिन येथे त्यांनी ई.आप्डर-हाल्डेन यांच्याबरोबर अंड्यातील अल्ब्युमिनाच्या जलीय विच्छेदनामुळे (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे विभाग पडण्याच्या क्रियेमुळे) तयार होणाऱ्या पदार्थांविषयी संशोधन केले.

इ. स. १९०४ मध्ये ते परत ग्रात्स विद्यापीठात आले व विद्यापीठाच्या औषधि-रासायनिक प्रयोगशाळेत काम करू लागले. तेथे त्यांनी पित्ताम्लाचा अभ्यास केला. तसेच प्रथिन रसायनशास्त्रात संशोधन केले. हा अभ्यास करताना त्या वेळच्या उपलब्ध असलेल्या कार्बनी विश्लेषणाच्या पद्धती त्यांना फार किचकट व अपुऱ्या वाटू लागल्या, तसेच अशा विश्लेषणासाठी विश्लेषण करावयाचा पदार्थ मोठ्या प्रमाणात लागतो. म्हणून अत्यल्प नमुन्याचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीचा त्यांनी शोध लावला. युस्टुस फोन लीबिख व जे. बी. ए. द्युमा यांच्या विश्लेषमाच्या मूलभूत पद्धतींपेक्षा प्रेगल यांची पद्धत वेगळी नव्हती. तथापि प्रेगल यांच्या पद्धतीचे वैशिष्ट्य हे की, विश्लेषण करावयाचा नमुना १-३ मिग्रॅ. इतका पुरतो. तसेच निष्कर्ष जलद व काटेकोर येतात. १९१० मध्ये ते इन्सब्रुक विद्यापीठात औषधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. या ठिकाणी त्यांनी डब्ल्यू. एच्. कुहलमान यांच्या मदतीने ± ०·००१ मिग्रॅ. एवढे सूक्ष्म वजन करणारा सूक्ष्मग्राही तराजू शोधून काढला. तसेच त्यांनी कार्बनी पदार्थातील कार्बन व हायड्रोजन यांचे असलेले सूक्ष्म प्रमाण ठरविण्याच्या पद्धती शोधून काढल्या. इतर शास्त्रज्ञांनी याच पद्धतींचा वापर करून नायट्रोजन, हॅलोजन, गंधक, कार्‌बॉक्सिल इत्यादींचे सूक्ष्म प्रमाण ठरविण्यासाठी केला.

प्रेगल यांच्या सूक्ष्म-विश्लेषणातील सुधारणेमुळे विज्ञान व उद्योग यांच्या प्रगतीस अनमोल सहाय्य झाले. तसेच जीवरसायनशास्त्रातील मूलभूत कार्यास चालना मिळाली. वैश्लेषिक रसायनशास्त्रातील या त्यांच्या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. १९१३ मध्ये ते ग्रात्सला परत आले व तेथील विद्यापीठात औषधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. वरील कार्याशिवाय त्यांनी आप्डर-हाल्डेन यांच्या एंझाइमाच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिन संयुगाच्या) अस्तित्वाबद्दलच्या ⇨विसरण परीक्षेत सुधारणा करून रक्तरस (रक्त गोठल्यावर गुठळीविरहित उरलेला न गोठणारा पिवळसर विद्राव) कमी असतानासुद्धा ती वापरता येईल अशी करणे, मूत्रपिंडाची कार्यक्षमता ठरविण्याची सोपी पद्धत शोधून काढणे इ. महत्त्वपूर्ण कार्ये केली.

प्रेगल यांना व्हिएन्ना ॲकॅडेमी ऑफ सायन्सने १९०४ मध्ये रसायनशास्त्राचे लीवेन पारितोषिक व गटिंगेन विद्यापीठाने १९२० मध्ये तत्त्वज्ञानाची पदवी दिली. १९१७ मध्ये त्यांनी Die quantitative Organische Mikroanalyse हा ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथाची विविध भाषांत भाषांतरे झाली. व्हिएन्ना ॲकॅडेमी ऑफ सायन्समार्फत ऑस्ट्रियन सूक्ष्मरसायनशास्त्रज्ञांना ‘फ्रिट्स प्रेगल पारितोषिक’ देण्यासाठी त्यांनी ॲकॅडेमीकडे काही रक्कम दिली. ते ग्रात्स येथे मरण पावले.

जमदाडे, ज. वि.