क्षपण :ज्या रासायनिक विक्रियेत द्रव्याकडून इलेक्ट्रॉन ग्रहण केले जातात, तिला क्षपण म्हणतात. ज्या विक्रियेत द्रव्याचा एक तर हायड्रोजनाशी संयोग होतो किंवा द्रव्यातून ऑक्सिजन निघून जातो, अशा विक्रियेला पूर्वी क्षपण म्हणत असत. ज्या विक्रियेत द्रव्य इलेक्ट्रॉन देऊन टाकते तिला ऑक्सिडीभवन किंवा ऑक्सिडीकरण म्हणतात. अशा प्रकारे क्षपण ही ऑक्सिडीभवनाविरुद्धची विक्रिया आहे. म्हणजे क्षपण व ऑक्सिडीभवन या परस्परावलंबी विक्रिया असून त्या नेहमीच एकत्र घडतात. या दोन संयुक्त विक्रियांना रेडॉक्स विक्रिया म्हणतात. रिडक्शन (क्षपण) व ऑक्सिडेशन (ऑक्सिडीभवन) या दोन विक्रियांच्या इंग्रजीतील नावांच्या आद्याक्षरांवरून रेडॉक्स हा संक्षिप्त शब्द तयार करण्यात आला आहे.

ऑक्सिजनयुक्त संयुगातील ऑक्सिजन काढून टाकणे किंवा त्याचा हायड्रोजनाशी संयोग घडवून आणणे या विक्रियेला पूर्वी स्थूलपणे क्षपण म्हणत असत. उदा., तांब्याच्या ऑक्साइडाला उष्णता देऊन त्यावरून हायड्रोजन वायू जाऊ दिल्यास धातुरूप तांबे व पाण्याची वाफ मिळते. ही विक्रिया खालीलप्रमाणे दर्शवितात:

येथे कॉपर ऑक्साइडाचे क्षपण झाले व त्याचबरोबर हायड्रोजनाचे ऑक्सिडीभवन झाले, असे म्हणता येते.

रसायनशास्त्राची प्रगती होत गेल्यावर अणूच्या रचनेसंबंधी इलेक्ट्रॉनांच्या बाबतीत स्पष्ट कल्पना मांडण्यात आल्या. यामुळे क्षपण व ऑक्सिडीभवन या विक्रियांनाही इलेक्ट्रॉन व आयन (विद्युत् भारित अणू, रेणू किंवा अणुगट) यांची बैठक प्राप्त झाली व त्यानुसार त्या स्पष्ट करण्यात आल्या. उदा., मर्क्युरिक क्लोराइडाचे मर्क्युरस क्लोराइडात रूपांतर होणे. ही विक्रिया हायड्रोजनाशी संबंध न आणता घडवून आणता येते.

या समीकरणात ही क्षपण आणि  ही ऑक्सिडीभवन या दोन्ही विक्रिया आहेत. शिवाय मर्क्युरिक अवस्थेत असलेली दोन ही संयुजा मर्क्युरस अवस्थेत एक झाली आहे. क्षपण क्रियेत हाही महत्त्वाचा परिणाम असतो. थोडक्यात क्षपणात आयनावरील धन विद्युत् भार कमी होण्याची तर ऑक्सिडीभवनात धन विद्युत् भार वाढण्याची प्रवृत्ती आढळते, तेव्हा इलेक्ट्रॉन ग्रहण करणाऱ्या संयुगाचे क्षपण झाले असे म्हणतात आणि ज्या संयुगाकडून इलेक्ट्रॉन मिळालेले असतात, त्याला क्षपणकारक म्हणतात. नवजात हायड्रोजन, कार्बन, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डाय-ऑक्साइड, पोटॅशियम सायनाइड इ. संयुगे तसेच सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम इ. धातू ही क्षपणकारकांची काही उदाहरणे आहेत.

रसायनशास्त्र, रासायनिक उद्योग व रासायनिक अभियांत्रिकी यांच्यातील क्षपण ही महत्त्वाची विक्रिया असून महत्त्वाच्या औद्योगिक रासायनिक प्रक्रियांमध्ये क्षपणाचा संबंध येतो. उदा., धातुविलेपन म्हणजे धातूला मुलामा देणे. विद्रावातील धातूच्या आयनांचे क्षपण होऊन धातूचे विद्युत् भाररहित अणू तयार होतात व त्यांच्यामुळे मुलामा तयार होतो. उदा., चांदीचे आयन (अस+) असलेल्या विद्रावात तांब्याचा तुकडा ठेवल्यास त्याच्यावर सावकाशपणे चांदीचा मुलामा तयार होतो. या प्रक्रियेतचांदीच्या प्रत्येक धन विद्युत् भारित आयनाला अणूतून बाहेर पडलेला तांब्याचा एकेक इलेक्ट्रॉन प्राप्त होतो व तो विद्युत् भाररहित होतो. हेचांदीचे अणू म्हणजेच मुलामा होय. ही विक्रिया   Ag+ +lē→Ag  अशी दर्शवितात.

मूळ अर्थानुसार क्षपणाची पुढील उदाहरणे आहेत. नायट्रोजन व हायड्रोजन वायूंचा संयोग होऊन अमोनिया वायू (Nh3) तयार होतो तर झिंक ऑक्साइडातील (ZnO) ऑक्सिजन काढून टाकल्यास धातुरूप जस्त तयार होते. जस्ताच्या धातुकापासून (कच्च्या रूपातील धातूपासून) अशा रीतीने धातू मिळविता येते.

क्षपणाचे काही औद्योगिक उपयोग पुढीलप्रमाणे आहेत : मिथिल अल्कोहॉलाचे किंवा मिथेनॉलाचे संश्लेषण नॅप्थॅलिनाच्या क्षपणाद्वारेटेट्रॅलीन विद्राव मिळविणे बेंझिनापासून सायक्लोहेक्झेन मिळविणे नायट्रोबेंझिनापासून आधुनिक कृत्रिम रंगांचे पायाभूत संयुग ॲनिलीनमिळविणे असंपृक्त (द्विबंध वा त्रिबंध असलेल्या) वसांचे (मेदांचे) हायड्रोजनीकरण करून वनस्पती तूप मिळविणे [→ वनस्पति-१] जास्त रेणुभाराची अल्कोहॉले वापरून उच्च क्षमतेची प्रक्षालके बनविणे इत्यादी.

पहा : ऑक्सिडीभवन.

ठाकूर, अ. ना.