स्ट्रिक्नीन : हे एक विषारी ⇨ अल्कलॉइड असून ते स्ट्रिक्नॉस प्रजातीतील ⇨ कुचला ( स्ट्रि. नक्स-व्होमिका ) आणि त्यासंबंधित इतर वनस्पतींच्या बियांपासून मिळविता येते. या संयुगाचा शोध १८१८ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जे. बी. काव्हेंतू आणि प्येअर-पेल्त्ये यांनी फिलिपीन्समधील स्ट्रिक्नॉस इग्नाटी या वनस्पतीमध्ये लावला. स्ट्रिक्नॉस प्रजातीतील आशियाई जातींच्या बियांमध्ये २-३% अल्कलॉइडे असून त्यांमध्ये निम्म्याहून अधिक स्ट्रिक्नीन असते. भारतातील कुचला ही वनस्पती स्ट्रिक्निनाचा मुख्य व्यापारी स्रोत आहे. ⇨ सर रॉबर्ट रॉबिन्सन यांनी स्ट्रिक्निनावर संशोधन करून त्याची संरचना निश्चिती केली. रेणुसूत्र C21H22N2O2.

स्ट्रिक्नीनाची संरचना

स्ट्रिक्नीन रंगहीन, स्फटिकीय व विषारी संयुग आहे. त्याचा वितळबिंदू २९०° से. आहे. ते पाण्यात अविद्राव्य ( न विरघळणारे ) आणि अल्कोहॉल व कार्बनी विद्रावकांत अल्पविद्राव्य ( किंचित विरघळणारे ) आहे. या संयुगाला अतिशय कडू चव असते. पाण्याच्या सु. ७ लक्ष भागांत एक भाग स्ट्रिक्नीन असल्यास त्याच्या चवीवरून ते सहज ओळखता येते. स्ट्रिक्नीन मूलतः ⇨ अमाइन असून अम्लाबरोबर त्याचे स्फटिकीय क्षार मिळतात. स्ट्रिक्नॉस प्रजातीतील वनस्पतींमध्ये ट्रिप्टोफेन आणि एकवलयी टर्पीन सेकोलागानीन यांचे सुरुवातीला एंझाइम-उत्प्रेरित संघनन होऊन मध्यस्थ स्ट्रिक्टॉसायडीन हे संयुग तयार होते. त्यानंतर आवृत्त व अनावृत वलयांच्या गुंतागुंतीच्या श्रेढी तयार होऊन त्यामध्ये स्ट्रिक्नीन मिळते.

स्ट्रिक्नीन विषारी असल्यामुळे त्याचा वापर उंदरासारखे कृंतक ( कुरतडणारे ) प्राणी मारण्यासाठी करतात. पशुवैद्यक व्यवसायात थोड्या मात्रेतील स्ट्रिक्नीन उद्दीपक म्हणून वापरता येते. त्याचा वापर केल्याने मेरुरज्जूमधील प्रतिक्षेपी संवेदनक्षमतेत वाढ होऊन शरीराच्या प्रेरक कोशिकांमध्ये ( पेशींमध्ये ) सामान्य अवरोधनाचा क्षय होतो आणि स्नायूंमध्ये तीव्र आकुंचन होते. स्ट्रिक्नीन तोंडाने किंवा अंतःक्षेपणाने घेतल्यास रक्तात लवकर मिसळले जाते आणि विषारीपणाची लक्षणे काही मिनिटांत दिसू लागतात. त्याच्यामुळे श्वसन स्नायूंचा अंगग्रह सतत होत राहून श्वसनस्थगनाने मृत्यू ओढवू शकतो. हृद्उद्दीपक असलेले स्ट्रिक्नीन पूर्वी वैज्ञानिक मध्यवर्ती ⇨ तंत्रिका तंत्राच्या चिकित्सा उद्दीपनासाठी वापरीत असत.

पहा : अल्कलॉइडे कुचला.

खोब्रागडे, स्नेहा दिलीप