न्यूलँड्स, जॉन अलेक्झांडर रेइना : (२६ नोव्हेंबर १८३७–२९ जुलै १८९८). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. ⇨ आवर्तसारणीतील सप्तकाच्या नियमाबद्दल प्रसिद्ध. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. लंडनच्या रॉय कॉलेज ऑफ केमिस्ट्रीमध्ये आउगुस्ट डब्ल्यू. व्हॉन होफमान यांच्या हाताखाली त्यांचे शिक्षण झाले. नंतर ते १८६४ पर्यंत रॉयल ॲग्रिकल्चरल सोसायटीमध्ये साहाय्यक रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम करीत होते. १८६४ मध्ये ते वैश्लेषिक रसायनशास्त्रज्ञ म्हणून व्यवसाय करू लागले, तसेच त्यांनी रसायनशास्त्राचे अध्यापनही चालू ठेवले. त्यांनी शर्करा रसायनशास्त्राचा सखोल अभ्यास केला व १८६८ मध्ये एका साखर कारखान्याचे ते प्रमुख रसायनशास्त्रज्ञ झाले. तेथे त्यांनी साखर स्वच्छ करण्याची नवी पद्धत शोधून काढली व साखरनिर्मितीच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या सुधारणा केल्या.

इटलीच्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी भाग घेतला होता (१८६०). त्यानंतर त्यांची नेमणूक औद्योगिक रसायनशास्त्रज्ञ म्हणून झाली. रासायनिक मूलद्रव्यांमध्ये आवर्तिता आढळते, या कल्पनेच्या जनकांपैकी ते एक होत आणि तीसंबंधी त्यांनी केमिकल न्यूज या नियतकालिकाच्या ७ फेब्रुवारी १८६३ च्या अंकात एक पत्र लिहिले. पुढच्या वर्षी त्यांनी त्याच नियतकालिकामध्ये ‘सप्तकाचा नियम’ ही कल्पना मांडली. तीनुसार तेव्हा माहीत असलेली मूलद्रव्ये अणुभारांच्या चढत्या क्रमाने मांडून त्यांना अनुक्रमांक दिले, तर क्रमागत मूलद्रव्ये बहुधा एकाच गटात पडतात किंवा भिन्न गटांमध्ये सारख्याच स्थितीत येतात. तसेच ज्याप्रमाणे संगीतातील आठवा सूर गुणधर्मांच्या बाबतीत पहिल्या सुरासारखा असतो त्याचप्रमाणे एखाद्या मूलद्रव्यापासूनचे आठवे मूलद्रव्य हे गुणधर्मांच्या बाबतीत सुरुवातीच्या मूलद्रव्यासारखेच असते. त्यांनी शोधलेला हा सप्तकाचा नियम प्रथम दुर्लक्षिला गेला व त्याला महत्त्व दिले गेले नाही पण पुढे हाच नियम डी. आय्. मेंडेलेव्ह व इतरांनी सुधारून आवर्त सारणीमध्ये वापरला. त्यांनी आपले सर्व लेख डिस्कव्हरी ऑफ द पिरिऑडिक लॉ (१८८४) या ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले. शुगर : ए हँडबुक फॉर प्‍लँटर्स अँड रिफायनर्स (१८८८) हे साखरनिर्मितीविषयीचे पुस्तकही त्यांनी लिहिले. १८८७ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे डेव्ही पदक देण्यात आले. ते लंडन येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.