फ्यूरान : कार्बनी संयुगांचा एक गट. या विषमवलयी (ज्यांच्या वलयांमध्ये कार्बनाशिवाय इतरही अणू–येथे ऑक्सिजन अणू–आहेत अशा) संयुगांचे वलय चार कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांचे बनलेले असून वलयात एकाआड एक असे दोन द्विबंध असतात. फ्यूरान, ⇨ फुरफुराल, फुरफुरील अल्कोहॉल, फ्युरोइक अम्‍ल ही या गटातील संयुगे असून फ्यूरान हे या गटाचे नमुनेदार संयुग आहे व त्याचीच माहिती पुढे दिली आहे. यांशिवाय टेट्राहायड्रोफ्यूरान, टेट्राहायड्रोफुरफुरील अल्कोहॉल इ. या गटाशी निगडित असलेली संयुगे औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत.

म्युसिक अम्‍लाचे कोरडे ऊर्ध्वपातन (बंद भांड्यात घन पदार्थ तापविल्याने अपघटन-रेणूचे तुकडे-होऊन मिळणारे बाष्परूपातील घटक वेगळे गोळा करण्याची क्रिया) केले, तर फ्युरोइक अथवा पायरोम्युसिक अम्‍ल मिळते, हे कार्ल व्हिल्हेल्म शेले यांनी १७८० साली दाखविले होते. साखरेवर किंवा स्टार्चवर सल्फ्यूरिक अम्‍ल व मॅगॅंनीज डाय-ऑक्साइड यांची विक्रिया केल्यास फॉर्मिक अम्‍ल व त्याच्या जोडीने फ्यूरानही मिळते, याचा शोध १८३२ साली लागला. बेरियम फ्युरोएट आणि सोडा-लाइम यांच्या रासायनिक विक्रियेद्वारे १८७० मध्ये फ्यूरान प्रथम स्वतंत्रपणे बनविण्यात आले. १८७० साली आडोल्फ फोन बेयर यांनी फुरफुरालापासून क्रमाने फ्युरोइक अम्‍ल व फ्यूरान बनविले. तसेच वेगवेगळ्या विक्रियांद्वारे फुरफुरालापासून पिमेलिक अम्‍ल हे ज्ञात संरचनेचे संयुग मिळते, हे सिद्ध केले. या विविध विक्रियांतील संगती लावली म्हणजे फ्यूरानाची रासायनिक संरचना निश्चित करता येते. फ्यूरानाची ही विषमवलयी संरचना व वलयातील अणू दर्शविण्याची पद्धती पुढील संरचना सूत्रात दिली आहे.

P - 1048 - 1

फ्यूरान हा रंगहीन, बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारा) व ज्वालाग्राही द्रव असून त्याला काहीसा क्लोरोफॉर्मासारखा वास येतो. त्याचा उकळबिंदू ३१·३६° से., वितळबिंदू ८५·६५° से., वि.गु. ०·९३७८ आहे. फ्यूरान पाण्यात विरघळत नाही पण अल्कोहॉल, ईथर यांसारख्या कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत) विरघळते. फ्यूरान काहीसे विषिरी आहे. हे तसेच ठेवल्यास त्याला तपकिरी छटा येते मात्र त्यात थोडेसे पाणी मिसळल्यास असा रंग येण्याची क्रिया सावकाश होते. हवेत उघडे राहिल्यास स्वयंऑक्सिडीभवनाने [⟶ ऑक्सिडीभवन] त्याचे अपघटन होते. तसेच त्याचे पेरॉक्साइड बनते. असे अपघटन होऊ नये म्हणून त्यामध्ये हायड्रोक्विनोन घालावे लागते. समावेशन (इतर अणू वा रेणूचा समावेश होणे), प्रतिष्ठापन (एका अणूच्या वा अणुगटाच्या जागी दुसरा अणू वा अणुगट बसविणे) व वलयाचा भंग होणे या प्रकारच्या विक्रिया फ्यूरानाच्या बाबतीत होऊ शकतात. रॅने ‌निकेल (स्पंजासारखे निकेल) हे उत्प्रेरक (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिचा वेग बदलणारा पदार्थ) वापरून फ्यूरानात हायड्रोजनाचे समावेशन करून टेट्राहायड्रोफ्यूरान मिळविता येते तर क्लोरिनाच्या साहाय्याने परिस्थितीनुसार २ क्लोरो -, २, ५ डायक्लोरो – किंवा २, ३, ५ ट्रायक्लोरा-फ्यूरान ही संयुगे मिळतात. तसेच फ्यूरानामध्ये ॲसिल गटाचे प्रतिष्ठापन करता येते आणि V2O5 या उत्प्रेरकाच्या सान्‍निध्यात ऑक्सिडीकरण केल्यास फ्यूरानाच्या वलयाचा भंग होऊन मॅलेइक अम्‍ल व मॅलेइक ॲनहाड्राइड ही तयार होतात.

पाण्याच्या वाफेने फुरफुरालाचे अपघटन करून तसेच तांबे हा उत्प्रेरक वापरून फ्युरोइक अम्‍लाचे अपघटन करून फ्यूरानाचे उत्पादन केले जाते. टेट्राहायड्रोफ्यूरान, फुरफुरील अल्कोहॉल इ. फ्यूरानाचे महत्त्वाचे अनुजातही (एक संयुगापासून बनविलेले दुसरी संयुगेही) बनविता येतात.

अशा प्रकारे फ्यूरानाचा उपयोग इतर कार्बनी द्रव्यांच्या संश्लेषणात (कृत्रिम रीतीने निर्मिती करण्यामध्ये) होतो व ही द्रव्ये औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत. फ्यूरान, अमोनिया आणि पाण्याची वाफ यांच्यापासून पायरॉल हे औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे रसायन मोठ्या प्रमाणावर निर्माण केले जाते, फ्यूरान व त्याचे अनुजात यांचा नायलॉन, रंगलेप, जंतुनाशके वगैरेंच्या निर्मितीस उपयोग केला जातो. तसेच विद्रावक म्हणूनही काही अनुजान उपयुक्त आहेत.

पहा : फुरफुराल विषमवलयी संयुगे.

गडम, द. द.