सॅलिसिलिक अम्ल : (ऑर्थो-हायड्रॉक्सी-बेंझॉइक अम्ल). हा पांढरा स्वच्छ स्फटिकरूप घन पदार्थ आहे. हे अम्ल व यापासून तयार केलेले कित्येक पदार्थ, औषधे, स्वादके व रुचिवर्धके तसेच रंग कारखान्यातील निरनिराळी रंजके तयार करण्यासाठी वापरतात.

सॅलिसिलिक अम्लाचे लवण किंवा एस्टर : M – धातू, R – कार्बनी मूलक.

सॅलिसिलिक अम्लातील कार्बॉक्सिलिक हायड्रोजनाच्या ठिकाणी धातूचे किंवा कार्बनी मूलकाचे प्रतिष्ठापन होऊन लवण किंवा एस्टर तयार होते. गरम पाण्याचा उपयोग करून सॅलिसिलिक अम्लाचे स्फटिक तयार करतात. हे स्फटिक लांबट सुईच्या आकाराचे असतात. अल्कोहॉल, ॲसिटोन, ईथर, बेंझीन आणि टर्पेंटाइन यांध्ये सॅलिसिलिक अम्ल विद्राव्य (विरघळणारे) व पाण्यामध्ये किंचित विद्राव्य आहे. याची अल्कली धातू लवणे पाण्यात विद्राव्य तर एस्टरे पाण्यात अविद्राव्य असतात. या अम्लाचे स्फटिक १५९°से. तापमानाला द्रवीभूत होतात आणि २००°से. पेक्षा अधिक तापमानाला याचे फिनॉल व कार्बन डाय-ऑक्साइड यांमध्ये विघटन होते.

सामान्यतः सॅलिसिलिक अम्ल थोड्याफार प्रमाणात कित्येक वनस्पतींच्या मुळांत, पानांत, फुलोऱ्यात व पुष्कळ झाडांच्या फळांत आढळते. विशेषतः स्पायरिआ प्रजातीतील अनेक जातींच्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या तेलांत या अम्लाचे प्रमाण बरेच असते. कित्येक वनस्पतींच्या मुळांत, सालींत व पानांत या अम्लाचा मिथाइल एस्टर हा स्वादिष्ट पदार्थ आढळतो. गॉल्थेरिया प्रोक्रं बेन्स या ⇨ गंधपुरा झुडपाच्या तेलात मिथाइल सॅलिसिलेट हा प्रमुख घटक असतो.

सॅलिसिलाल्डिहाइड व पोटॅश क्षार यांच्या विक्रियेपासून १८३८ मध्ये आर्. पिरिआ यांनी सॅलिसिलिक अम्ल प्रथम तयार केले. १८६० मध्ये एच्. कोल्बे आणि ई. ल्यूटेमान यांनी फिनॉल आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांच्यापासून सोडियम धातू असताना सॅलिसिलिक अम्ल तयार करता येते याचा शोध लावला. १८७४ सालापर्यंत स्वीट बर्थ या झाडाच्या सालीतून किंवा गंधपुरा या झुडपाच्या पानांपासून मिळणाऱ्या मिथाइल सॅलिसिलेटाच्या जलीय विच्छेदनाने सॅलिसिलिक अम्ल तयार करीत असत. नंतर शुष्क सोडियम फेनोलेट आणि कार्बन डाय- ऑक्साइड यांच्यापासून सॅलिसिलिक अम्ल मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येऊ लागले.

उपयोग : सॅलिसिलिक अम्लाचा उपयोग अन्नेतर पदार्थ टिकविण्यासाठी होतो. अन्नात त्याचा उपयोग करता येत नाही व ते निषिद्घ आहे. २ ते १० टक्के सॅलिसिलिक अम्लयुक्त धावन द्रव (लोशन), मलम व फेस पावडर चर्मरोगांवर गुणकारी म्हणून वापरतात. सोडियम धातूबरोबर तयार झालेले सॅलिसिलिक अम्लाचे सोडियम सॅलिसिलेट हे लवण पूतिरोधक (पू होण्यास प्रतिबंध करणारे), ज्वरनाशक व वेदनाशामक म्हणून वापरतात. विशेषेकरून या लवणाचा उपयोग संधिवात, ज्वर व वेदना यांकरिता फार होतो. सॅलिसिलिक अम्लाची ॲसिटिक ॲनहायड्राइडाबरोबर विक्रिया करून ॲस्पिरीन तयार करतात. ॲस्पिरीन वेदनाशामक म्हणून वापरले जाते. सॅलिसिलिक अम्लाच्या मिथाइल अल्कोहॉलाबरोबरच्या ⇨ एस्टरीकरणा ने मिथाइल सॅलिसिलेट तयार होते. या एस्टराचा उपयोग स्वादक म्हणून निरनिराळ्या उद्योगांत करतात. सॅलिसिलिक ॲसिड फिनाइल एस्टर (सालोल) याचा औषध म्हणून उपयोग करतात. अशुद्घ (कच्च्या) सॅलिसिलिक अम्लाचा उपयोग निरनिराळी रंजके तयार करण्याकरिता होतो.

खटावकर, श्री. ब.