मायकेलस्मिथ, मायकेल : (२६ एप्रिल १९३२—५ ऑक्टोबर २०००). इंग्लंडमध्ये जन्मलेले कॅनडियन जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ऑलिगोन्यूक्लिओटाइड आधारित विशिष्ट उत्परिवर्तन घडवून आणणारे जैव तंत्र विकसित केले व त्यामुळे संशोधकांना जीवांमध्ये ( जनुकां-मध्ये ) नेमके बदल करणे शक्य झाले. या संशोधन कार्याबद्दल त्यांना कॅरी बॅक्स म्यूलीस यांच्यासमवेत १९९३ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषक विभागून मिळाले.

स्मिथ यांचा जन्म ब्लॅकपूल ( लँकाशर, इंग्लंड ) येथे झाला. १९५६ मध्ये त्यांनी मँचेस्टर विद्या-पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यांना व्हँकूव्हर ( कॅनडा ) येथे संशोधन करण्यासाठी हरगोविंद खोराना यांचे मार्गदर्शन लाभले.१९६४ मध्ये स्मिथ यांना कॅनडा देशाचे नागरिकत्व मिळाले. १९६६ मध्ये ते ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या विद्याशाखेत रुजू झाले. ते तेथील जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचे प्रमुख होते (१९८७ —९७). ते झायमोजेनेटिक्स इन्कॉर्पोरेटेड या जैवतंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक होते.

सामान्यतः प्रत्येक प्राण्याचे विशिष्ट गुणधर्म पिढ्यान्पिढ्या चालत आलेले असतात. त्यामध्ये काही वेळा आकस्मिक बदल होतात, यालाच उत्परिवर्तन असे म्हणतात. हे बदल गुणसूत्रातील डीएनएमध्ये ( डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लामध्ये ) होतात. स्मिथ यांनी १९७० दशकाच्या सुरुवातीलाच उत्परिवर्तनामधील वाढ आणि उत्पत्तिस्थान यांसंबंधी संशोधन केले होते. या उत्परिवर्तन प्रक्रियेचे निष्कर्ष मिळण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागला. संशोधनाच्या पहिल्या पायरीमध्ये सूक्ष्मजंतूला संसर्ग करणार्‍या वर्तुळाकार एकपेडी व्हायरसाच्या डीएनए मध्ये सामान्य डीएनएचा अनुक्रम एकसंध करणे, त्यानंतर डीएनएचा छोटा अनुक्रम ( ऑलिगोन्यूक्लिओटाइड ) रासायनिक पद्धतीने कृत्रिम रीत्या तयार करणे. या संश्लेषित डीएनएमधील अनुक्रम सामान्य डीएनए अनुक्रमापेक्षा वेगळा असतो, कारण त्यांमध्ये एक किंवा काही क्षारके वेगळी असतात. डीएनएचा सामान्य अनुक्रम आणि बदललेल्या डीएनएचा पेड एकसंध होऊन द्विपेडी डीएनएचा छोटा खंड तयार होतो. पॉलिमरेज एंझाइम उरलेल्या एकपेडी डीएनएची आवृत्ती तयार करतात, तसेच द्विसर्पिल डीएनएही निर्माण करतात. हा द्विसर्पिल डीएनए सूक्ष्मजंतूच्या जीनोममध्ये घालण्यात येतो, या उत्परिवर्त ( मूळ जननिक रचनेत बदल झालेल्या ) डीएनएचा वापर उत्परिवर्त प्रथिने तयार करण्यासाठी साचा म्हणून केला जातो. शास्त्रज्ञांना अशी खात्री वाटते की, या जैव तंत्राचा उपयोग अनेक रोगांच्या उपचाराकरिता करता येऊ शकेल, तसेच या तंत्राचा कृषी आणि उद्योगामध्ये व्यापक प्रमाणात व्यावहारिक उपयोग होईल.

स्मिथ यांना नोबेल पारितोषिकाखेरीज इतरही मानसन्मान मिळाले आहेत. त्यांपैकी सायन्स कौन्सिल ऑफ ब्रिटिश कोलंबियाचे सुवर्ण पदक (१९८४) गेर्डनर फौंडेशनचे इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर केमिस्ट्री (१९८६) जेनेटिक्स सोसायटी ऑफ कॅनडा ॲवॉर्ड ऑफ एक्सलन्स (१९८८) रॉयल सोसायटी ऑफ कॅनडाचे फ्लॅवेले पदक (१९९२) इत्यादी. ते रॉयल सोसायटी ऑफ कॅनडा (१९८१) व रॉयल सोसायटी ऑफ लंडन (१९८६) या संस्थांचे फेलो होते.

स्मिथ यांचे व्हँकूव्हर येथे निधन झाले.

मगर, सुरेखा अ.