केकूले, फोन श्ट्राडोनिट्स फ्रीड्रिख आउगुस्ट :(७ सप्टेंबर १८२९–१३ जुलै १८९६). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. रासायनिक संरचनेसंबंधीच्या (रेणूतील अणूंच्या रचनेसंबंधीच्या) सिद्धांताकरिता विशेष प्रसिद्ध. यांचा जन्म डार्मस्टाट येथे झाला. गीसेन येथे प्रथम वास्तुशिल्पाचा अभ्यास केला, पण फोन लीबिक यांच्या प्रभावामुळे नंतर गीसेन विद्यापीठात रसायनशास्त्राचे अध्ययन केले. १८५२ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली. नंतर काही वर्षे लंडन येथे विल्यमसन यांच्याबरोबर त्यांनी अन्वेषण (संशोधन) केले. १८५६ मध्ये जर्मनीला परत आल्यावर त्यांनी हायड्लबर्ग येथील विद्यापीठात सन्मान्य अधिव्याख्याते म्हणून काम केले, त्यानंतर १८५८ मध्ये बेल्जियममधील घेंट विद्यापीठात ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. बॉन विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापकपद त्यांनी १८६५ मध्ये निमंत्रणावरून स्वीकारले. तेथेच त्यांनी शेवटपर्यंत अन्वेषणकार्य केले.

कार्बन मूलद्रव्याची संयुजा (अणूंची परस्परांशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) चार असून त्याचे अनेक अणू एकमेकांशी संयोग पावू शकतात, अशी कल्पना त्यांनी मांडली. १८६५ मध्ये बेंझिनाकरिता त्यांनी सुचविलेली संवृत शृंखलात्मक (टोके एकमेकांस जोडलेल्या साखळीसारखी) किंवा षट्‍कोनी वलयी संरचना ही त्यांची सैद्धांतिक कार्बनी रसायनशास्त्राला बहुमोल देणगी आहे. बेंझिनामध्ये प्रतिष्ठापन करून (एक अणू अथवा अणुगट काढून त्या जागी दुसरा बसवून) येणाऱ्या संयुगांचे समघटक (तेच व तितकेच अणू रेणूमध्ये असून संरचना भिन्नत्वामुळे वेगळे गुणधर्म असलेली संयुगे) व त्यांचे प्रकार यांच्या शक्यतेचे अचूक भाकित त्यांनी केले. त्यांच्या या बेंझीनवलय सिद्धांताने त्यापुढील कालातील कार्बनी रसायन शास्त्राचे अन्वेषण शक्य झाले. प्रायोगिक कार्बनी रसायनशास्त्रातही अतृप्त (काही संयुजा मोकळ्या असलेली) अम्ले, ॲझो व डाय-ॲझो या संयुगांच्या संघटना आणि मर्क्युरी फल्मिनेट इत्यादींविषयी त्यांनी महत्त्वाचे अन्वेषण केले. त्यांनी ॲझो व डाय-ॲझो संयुगांसंबंधी केलेल्या कार्यामुळे जर्मनीचा रंजकद्रव्यांचा (रंगविण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या द्रव्यांचा) उद्योग ऊर्जितावस्थेस आला. 

त्यांच्या मार्गदर्शनाने ज्यांनी उल्लेखनीय अन्वेषण कार्य करून कीर्ती मिळविली, त्यांमध्ये युलिउस मायर, सर हेन्री रॉस्को, ॲडॉल्फ फोन बेयर व एमील फिशर या प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञांचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेला Lehrbuch der organischen Chemie हा चार खंडांचा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे  (१८६१–६७). बॉन येथे ते मृत्यू पावले.  

जमदाडे, ज. वि.