कॅलोमेल : (हॉर्न क्विकसिल्व्हर). खनिज. स्फटिक चतुष्कोणीय, प्रसूच्याकार किंवा (001) ला समांतर चापट वडीसारखे. कित्येकदा जटिल आकाराचे [→ स्फटिकविज्ञान]. छेद्य (चाकूने कापता येण्यासारखे). कठिनता १-२. वि. गु. ६.४८. दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक हिऱ्यासारखी. रंग पांढरा, पिवळसर, राखी, काळसर, उदी. कस पिवळसर पांढरा. रा. सं. Hg2Cl2. पाण्यात अविद्राव्य (विरघळत नाही).  कॅलोमेल हे उष्ण विद्रावांपासून अवक्षेपित होऊन (साक्याच्या रुपात खाली बसून) किंवा कधीकधी वाफेचे सरळ घनस्वरुपात हाऊन तयार झालेले असते व सामान्यतः इतर खनिजांवार बसलेल्या पुटांच्या स्वरुपात आढळते.  पुष्कळदा हिंगुळाच्या व नैसर्गिक पाऱ्याच्या जोडीने सापडते.  नाव पर्वापार चालत आलेले असून व्युत्पत्ती माहीत नाही.  याला मराठीत रसकापूर व संस्कृतास रसकर्पूर म्हणतात.

ठाकूर, अ. ना.

कॅलोमेल संयुग स्वरुपात मिळविण्यासाठी मर्क्युरिक क्लोराइड व पारा यांचे मिश्रण एकत्र करुन तापविल्यास ३७३.० से. तापमानावर ते संप्लवित होते.  मर्क्युरस सल्फेट व मीठ एकत्र तापविल्याने किंवा मर्क्युरस लवणाच्या विद्रावात हायड्रोक्लोरिक अम्ल अथवा क्लोराइडाचा विद्राव मिसळल्याने ते अवक्षेपित होते.

हे पांढरे चूर्णरुप संयुग पाण्यात जवळजवळ अविद्राव्य आहे. वि. गु. ७.१४. ऑक्सिडीकारकांच्या  ऑक्सिडीभवन  विक्रियेने द्विसंयुजी  अणूची संयोग पावण्याची क्षमता दोन असलेली,  संयुजा  मर्क्युरिक संयुगे तयार होतात.  उष्ण नायट्रिट बनते.  संतृप्त (विरघळलेल्या पदार्थांचे प्रमाण जास्तीत जास्त असलेला) कॅलोमेल विद्राव व पोटॅशियम क्लोराइडाचा विद्राव यांचे मिश्रण पाऱ्याच्या विद्युत्‌ अग्रांबरोबर (स्थिर वर्चस्‌ स्थिर विद्युत्‌ स्थिती, ०.२४२ व्होल्ट) दाखविते.  म्हणून याचा उपयोग संदर्भ विद्युत्‌ अग्र म्हणून करतात.  पूर्वी याचा उपयोग रेचक म्हणून करीत असत.  बाहेरुन लावण्याच्या मलमांमध्ये सौम्य जंतुनाशक म्हणून याचा अजूनही उपयोग केला जातो.

कारेकर, न. वि.