ॲस्पार्टिक अम्‍ल : एक ॲमिनो अम्‍ल. रेणवीय सूत्र (पदार्थाच्या रेणूत असलेले अणुप्रकार व त्यांच्या संख्या दाखविणारे सूत्र) C4H7O4N.दुसरे नाव : आल्फा ॲमिनो सक्सिनिक अम्‍ल. कोवळ्या उसात,बीट-साखरेच्या मळीत, भोपळ्याच्या कोवळ्या कोंबात, तुतीच्या पानांत, रोगग्रस्त यकृतात व काही माशांच्या विशिष्ट ग्रंथींमध्ये ॲस्पार्टिक अम्‍ल आढळते. शतावरी (ॲस्पॅरॅगस) या वनस्पतीच्या रसामधील ॲस्परजिनापासून व्होक्लँ व रॉबीके यांनी ॲस्पार्टिक अम्‍ल तयार केले (१८०६). प्रथिनांच्या जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या विक्रियेने संयुगाचे घटक सुटे करण्याने) मिळणाऱ्या पदार्थांपासून रिटहाउसेन यांनी ते वेगळे केले (१८६८). एडस्टीन व लॅक्टाल्ब्युमीन या प्रथिनांत त्याचे प्रमाण ९–१०% असते. ॲस्पार्टिक अम्‍लाचे प्रकाशीय सक्रियतेनुसार (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या म्हणजे ध्रुवित प्रकाशाच्या कंपनाचे प्रतल फिरविण्याच्या क्षमतेनुसार) एल-ॲस्पार्टिक अम्‍ल (प्रतल डाव्या बाजूस फिरविणारे) व डी – ॲस्पार्टिक अम्‍ल (प्रतल उजव्या बाजूस फिरविणारे)असे प्रकार आहेत. त्यांपैकी एल-ॲस्पार्टिक अम्‍लाची रासायनिक संरचना (रेणूमध्ये अणू एकमेकांना कसे जोडले आहेत हे दाखविणारी रचना) पुढीलप्रमाणे आहे.

१७२.५ ग्रॅ. हायड्रोक्लोरिक अम्‍ल असलेल्या विद्रावात) +२५.४

विद्राव्यता (विरघळण्याचे वजनी प्रमाण)

(ग्रॅ./१०० मिलि. पाण्यात) : ०.५०

वरील भौतिकीय स्थिरांकांच्या स्पष्टीकरणासाठी ‘ॲमिनो अम्‍ले’ या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पाहावा.

ॲस्पार्टिक अम्‍लाचे स्फटिक समचतुर्भुजी प्रचिनाच्या [→ स्फटिकविज्ञान] आकाराचे असतात. त्याची चव थोडीशी कडवट असून वितळबिंदू २७०—२७१ से. आहे.

मॅलिक, मॅलेइक किंवा फ्युमारिक अम्‍लाचे अमोनियम लवण तापवून मिळणाऱ्या पदार्थांवर उकळत्या हायड्रोक्लोरिक किंवा नायट्रिक अम्‍लाची विक्रिया करून ॲस्पार्टिक अम्‍लाचे संश्लेषण (कृत्रिम रीतीने तयार) करतात.

ॲस्पार्टिक अम्‍लाचे कॅल्शियमी लवण अल्कोहॉलात अविद्राव्य आहे. शरीरातील अनेक विक्रिया घडण्यास या अम्‍लाचा उपयोग होतो. ॲमिनोअंतरण [एका रेणूतील ॲमिनो गटाचे (NH2) दुसऱ्या रेणूमध्ये स्थलांतर] विक्रियांमधील हे महत्त्वाचे संयुग आहे.

अमोनियाच्या साहाय्याने वनस्पती किंवा सूक्ष्मजंतू,  पुढीलप्रमाणे ॲस्पार्टिक अम्‍ल तयार करतात.

फ्युमारिक अम्‍ल + अमोनिया → ॲस्पार्टिक अम्‍ल

शरीरात अमोनिया जास्त झाला तर तो कोशिकांना (शरीरातील सूक्ष्म घटकांना, पेशींना) अपायकारक असतो. म्हणून ग्‍लुटामिक अम्‍ल व अमोनिया आणि ॲस्पार्टिक अम्‍ल व अमोनिया यांचा संयोग व्हावा व अनुक्रमे ग्‍लुटामीन व ॲस्परजिन ही अमाइडे शरीरात तयार होऊन जादा अमोनियाची विल्हेवाट लावली जावी अशी योजना असते. मूत्रपिंडात अमोनियाच्या संश्लेषणासाठी ही अमाइडे उपयोगी पडतात [→ चयापचय].

आर्जिनीन, मिथिओनीन, थ्रिओनीन, आयसोल्युसीन इ. ॲमिनो अम्‍ले ॲस्पार्टिक अम्‍लापासून थोड्याफार प्रमाणात संश्लेषित होतात.

मेंदूमध्ये एन-ॲसिटील ॲस्पार्टिक अम्‍ल भरपूर प्रमाणात आढळते, पण त्याच्या तेथील कार्याविषयी विशेष माहिती नाही. ॲस्पार्टिक अम्‍लाचे चयापचयातील (शरीरातील सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींतील) विघटन मुख्यत:पुढील प्रकारे होते. एका प्रकारामध्ये अमोनिया व ऑक्झॅलो-ॲसिटिक अम्‍ल तयार होते. ही विक्रिया उलटसुलट होणारी असल्यामुळे प्रथिने व कार्बोहायड्रेटे यांचा शरीरात एकमेकांशी संबंध राखला जातो. दुसऱ्या प्रकारात कार्बन डाय-ऑक्साइड व ॲलॅनीन तयार होते.

सिस्टीन-सल्फॉनिक अम्‍ल, हायड्रॉक्सि-ॲस्पार्टिक अम्‍ल व मिथिल-ॲस्पार्टिक अम्लाची प्रतिरोधके (परिणामास  विरोध करणारी) असून त्यांच्यामुळे शरीरात विपरीत विक्रिया घडू शकतात.

पहा : ॲमिनो अम्‍ले.

हेगिष्टे, म. द.