सर प्रफुल्ल चंद्र रेरे, सर प्रफुल्ल चंद्र : (२ ऑगस्ट १८६१ – १६ जून १९४४). भारतीय रसायनशास्त्रज्ञ. भारतात रासायनिक उद्योगाचा पाया घालण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली, तसेच त्यांनी मर्क्युरस नायट्रेटाचा शोध लावला. 

रे यांचा जन्म खुलना जिल्ह्यातील (आता बांगला देशामधील जेसोर जिल्ह्यातील) रारुली कतिपारा येथे व शिक्षण कलकत्त्याला झाले. त्यांना ग्रीक, लॅटिन व फ्रेंच या भाषा चांगल्या अवगत होत्या. १८८२ मध्ये त्यांना गिलख्रिस्ट शिष्यवृत्ती मिळाल्याने त्याच वर्षी ते इंग्लंडला गेले. त्यांनी एडिंबरो विद्यापीठाच्या बी.एस्सी. (१८८५) व डी.एस्सी. (१८८७) या पदव्या मिळविल्या ह्या विद्यापीठाचे होप पारितोषिक मिळाल्यामुळे त्यांनी एक वर्षभर तेथे संशोधन केले. नंतर ते कलकत्त्याला प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक (१८८९-१९१६) व युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्समध्ये रसायनशास्त्राचे पालिट प्राध्यापक (१९१६-३६) व मृत्यूपर्यंत गुणश्री प्राध्यापक होते.

इ. स. १८९६ मध्ये रे यांनी मर्क्युरस नायट्रेट हे संयुग स्फटिकरूपात प्रथम तयार केले. यासाठी त्यांनी पारा व विरल नायट्रिक अम्‍ल यांची विक्रिया केली होती. त्यांनी पारा व नायट्रोजन यांचे संयुग तयार करण्याच्या अनेक पद्धती शोधून काढल्या. त्यांनी अमाइन नायट्रेटे व क्षारीय मृत्तिका नायट्रेटेही तयार केली.

रे यांनी उपलब्ध कच्च्या मालापासून साधी औषधे तयार करण्याचा घरगुती उद्योग सुरू केला. १८९२ मध्ये त्यांनी बेंगॉल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स हा भारतातील पहिला औषधनिर्मितीचा कारखाना काढला. १९०१ मध्ये त्यांनी कारखान्याचे लिमिटेड कंपनीत रूपांतर केले. त्यांनी सल्फ्यूरिक अम्‍ल बनविणारी यंत्रणा भारतात प्रथम उभी केली.

बंगाल सरकारने रे यांना यूरोपमधील प्रसिद्ध रासायनिक प्रयोगशाळा पहाण्यासाठी अभ्यास दौऱ्यावर १९०४ मध्ये लंडनला पाठविले. १९१२ मध्ये लंडन येथे व १९२९ मध्ये केंब्रिज येथे भरलेल्या ब्रिटिश साम्राज्य विद्यापीठ परिषदेला कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून ते हजर राहिले होते.

भारतातील जुन्या संस्कृत ग्रंथांचे (उदा., आयुर्वेदाचे) संशोधन अनेक वर्षे केल्यानंतर रे यांनी १९०२ मध्ये हिस्टरी ऑफ हिंदू केमिस्ट्री या ग्रंथाचा पहिला खंड प्रसिद्ध केला. १९०९ मध्ये त्यांनी या ग्रंथांचा दुसरा खंड बर्थेलॉट यांना अर्पण केला. १९३२ मध्ये त्यांनी लाइफ अँड एक्स्पीरिअन्सेस ऑफ ए बेंगॉली केमिस्ट या आत्मचरित्राचा पहिला खंड व १९३५ मध्ये दुसरा खंड प्रसिद्ध केला. याचे बंगाली भाषांतर आत्म चरित १९३७ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केले.

इ. स. १९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने रे यांना नाइट (सर) हा किताब तर देशबांधवानी ‘आचार्य’ हा बहुमान दिला. कलकत्ता, डाक्का आणि बनारस या विद्यापीठांनी त्यांना डी.एस्सी. पदवी दिली. त्यांना डॉइश ॲकॅडेमी ऑफ म्युनिक व लंडन केमिकल सोसायटी (१९३४) यांनी सन्माननीय सदस्यत्व दिले. ते भारतीय विज्ञान परिषद (१९२०), बेंगॉल लिटररी कॉन्फरन्स (१९१०), इंडियन केमिकल सोसायटी, इंडियन सायन्स न्यूज ॲसोसिएशन (१९३५) व बंगीय साहित्य परिषद (१९३१-३४) या संस्थांचे अध्यक्ष होते.

इ. स. १९२१ मध्ये रे यांनी कलकत्त्यातील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजीमधील रसायनशास्त्र विभागाला व दोन शिष्यवृत्त्यांकरिता देणग्या दिल्या तसेच १९२२ मध्ये रसायनशास्त्राच्या नागार्जुन पारितोषिकाकरिता आणि १९३६ मध्ये प्राणिविज्ञान व वनस्पतिविज्ञान या विषयांच्या सर आशुतोष मुखर्जी पारितोषिकाकरिता त्यांनी देणग्या दिल्या. ते कलकत्ता येथे मृत्यू पावले.

संदर्भ : Calcutta University, Acharya Prafulla Chandra Ray, Calcutta, 1962.

कानिटकर, बा. मो. सूर्यवंशी, वि. ल.