टोल्यूइन : कार्बनी संयुगांच्या ॲरोमॅटिक वर्गातील [⟶ ॲरोमॅटिक संयुगे] एक हायड्रोकार्बन संयुग. यास मिथिल बेंझीन किंवा फिनिल मिथेनही म्हणतात. १८३५ मध्ये पेल्ट्ये व वॉल्टर यांनी काही नैसर्गिक रेझिनांचे शुष्क ऊर्ध्वपातन (कोरडा पदार्थ बंद पात्रात घालून तापविणे व निर्माण झालेले बाष्प थंड करून वेगवेगळे पदार्थ मिळविणे) करून हे प्रथम मिळविले. टोल्यू बालसम या पदार्थात ते असते म्हणून त्याला टोल्यूइन ही संज्ञा मिळाली.

याचे रेणवीय सूत्र (रेणूमध्ये असणाऱ्या अणूंचे प्रकार व संख्यादर्शक सूत्र) C7H8 व रेणूभार ९२·१३ आहे. याच्या संरचनेत (रेणूमध्ये अणू एकमेकांस जोडले जाण्याच्या पद्धतीत) एक बेंझीन वलय हा गाभा असून त्याला एक मिथिल गट (–CH3) जोडलेला आहे.

सूत्र १. टोल्यूइन

हा एक वर्णहीन, बेंझिनासारखा पण किंचित सौम्य वासाचा बाष्पनशील (वाफ होऊन उडून जाणारा) व पेट घेणारा द्रव पदार्थ आहे. हा  –९५° से. ला वितळतो व ११०·६° से. तापमानास उकळतो. याचा प्रज्वलन बिंदू (ज्या तापमानास पदार्थ पेट घेतो ते तापमान) ६–१०°से. आहे. हा पाण्यात विरघळत नाही पण अल्कोहॉल, बेंझीन व ईथर यांमध्ये विरघळतो. आकारमानाने एक दशलक्ष भाग हवेत २०० भागांपेक्षा जास्त टोल्यूइन असल्यास ते आरोग्यास अपायकारक ठरते.

प्राप्ती : डामरी (बिट्युमेनस) कोळशाचे भंजक ऊर्ध्वपातन केल्याने मिळणाऱ्या ‘लाइट ऑइल’ या खंडापासून [⟶ ऊर्ध्वपातन डांबर] व खनिज तेलाच्या परिष्करणातील उत्प्रेरकी हायड्रोजन पुनर्घटना प्रक्रियेपासून [⟶ खनिज तेल] टोल्यूइन मिळते. लाइट ऑइलामध्ये १२–२०% (घनफळाने) टोल्यूइन असते, तर खनिज तेलात ते ०·०५% पेक्षाही कमी असते. तथापि पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांच्या दरम्यान खनिज तेलापासून टोल्यूइन मिळविण्याच्या पद्धतीत पुष्कळच सुधारणा झाल्यामुळे खनिज तेल हाही टोल्यूइनाचा एक महत्त्वाचा उद्‌गम ठरला आहे. व्यापारी प्रतीच्या टोल्यूइनाला टोल्यूऑल म्हणतात.

रासायनिक गुणधर्म : याच्या विक्रियांमध्ये (१) बेंझीन गाभ्याच्या विक्रिया आणि (२) CH3 या पार्श्वशाखेच्या विक्रिया ह्या दोहोंचा प्रत्यय येतो.

सूत्र २. ऑर्थो-टोल्यूइन सूत्र ३. पॅरा-टोल्यूइन सूत्र ३. पॅरा-टोल्यूइन

थंड स्थितीत व उत्प्रेरकामुळे (विक्रिया त्वरेने अथवा कमी तापमानास घडून यावी म्हणून वापरलेल्या पण शेवटी तशाच राहणाऱ्या पदार्थामुळे) बेंझीन गाभ्यातील हायड्रोजन अणूंचे प्रतिष्ठापन (एका अणूच्या जागी दुसरा अणू अथवा अणुगट येणे) क्लोरीन अणूंनी होते आणि ऑर्थो-क्लोरोटोल्यूइन (सूत्र २ X=CI) व पॅरा-क्लोरोटोल्यूइन (सूत्र ३ X=CI) ही संयुगे मुख्यतः होतात.

त्याचप्रमाणे नायट्रीकरणाने(NO2 गट संयुगात घालण्याने) ऑर्थोनायट्रोटोल्यूइन (सूत्र २ X=NO2 )वपॅरा-नायट्रोटोल्यूइन (सूत्र ३ X=NO2)ही संयुगे आणि सल्फॉनीकरणानेवरीलप्रमाणेच अनुक्रमे ऑर्थो-टोल्यूइन सल्फॉनिक (सूत्र २ X=SO3H)वपॅरा-टोल्यूइन सल्फॉनिक (सूत्र ३ X=SO3H)ही  अम्ले प्रामुख्याने मिळतात.

उच्च तापमान मात्र क्लोरिनाच्या योगाने पार्श्वशाखेतील हायड्रोजन अणूंचे, एका पाठोपाठ एक, याप्रमाणे क्लोरीन अणूंनी प्रतिष्ठापन होऊन बेंझील क्लोराइड C6H5CH2CI, बेंझल क्लोराइड C6H5CHCI2 व बेंझोट्रायक्लोराइड C6H5CCI3 ही संयुगे बनतात.

त्याचप्रमाणे क्षारकीय (अल्कलाइन) पोटॅशियम परमँगॅनेट, विरल नायट्रिक अम्ल यांच्या विक्रियांनी पार्श्वशाखेचे ⇨ऑक्सिडीभवन होते व बेंझॉइक अम्ल C6H5COOH बनते.

मँगॅनीज डाय-ऑक्साइड व सल्फ्यूरिक अम्ल वापरून ४० से. तापमानास किंवा टोल्यूइन बाष्पस्थितीत घेऊन व्हॅनेडियम पेंटा-ऑक्साइडाच्या उपस्थितीत ऑक्सिडीकरण केल्यास बेंझाल्डिहाइड  C6H5CHO हे संयुग बनविता येते.

उपयोग : दारुगोळ्यासाठी लागणारे ⇨ ट्रायनायट्रोटोल्यूइन (टीएनटी), बेंझॉइक अम्ल, बेंझाल्डिहाइड ही आणि दुसरी कित्येक उपयुक्त संयुगे बनविण्यासाठी तसेच रंगलेप, रेझिने इत्यादींसाठी विद्रावक (विरघळविणारा द्रव) म्हणून पॉलियूरेथेन रेझिने व निर्मलके (डिटर्जंट) यांच्या निर्मितीत टोल्यूइन उपयोगी पडते.

मिठारी, भू. चिं.