फ्लॅव्होने : वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या पिवळ्या रंगद्रव्यांचा गट, ही संयुगे फ्लॅव्होन (C15H10O2) या संयुगांची अनुजात म्हणजे त्याच्यापासून बनणारी संयुगे असून वनस्पतिज रंगद्रव्यांमधील हा गट महत्त्वाचा आहे. ही संयुगे पिवळी फुले व लाकूड यांची घटक द्रव्ये असतात आणि इतर रंगद्रव्यांच्या मानाने ही जास्त विस्तृत प्रमाणात आढळतात. फ्लॅव्होनामधील बेंझो अथवा फिनील गटाचे हायड्रॉक्सिल (OH) गटाने प्रतिष्ठापन (संयुगातील एखादा अणू अथवा अणुगट काढून त्या जागी दुसरा अणुगट बसविण्याची क्रिया) केल्यास फ्लॅव्होनाचे अनुजात मिळतात. उदा., फ्लॅव्होनॉल [C15H9O2(OH)] कही महत्त्वाची फ्लॅव्होने पुढीलप्रमाणे आहेत : (१) बहानच्या कळ्या, पॉप्लर, बिशकोप्रा इत्यादींसारख्या वनस्पतींत आढळणारे क्रायसीन किंवा ५, ७ डायहायड्रोक्सी फ्लॅव्होन (वितळबिंदू २७५° से.) (२) विशेषतः डेलियाच्या पिवळ्या फुलांत आढळणारे ॲपिजेनीन किंवा ५, ७, ४’ ट्रायहायड्रॉक्सी फ्लॅव्होन (वितळबिंदू ३४७° से.) (३) वेल्ड, मिग्नोनेट इ. वनस्पतींत आढळणारे ल्युटेओलीन अथवा ५, ७, ३, ४’ टेट्राहायड्रॉक्सी फ्लॅव्होन (वितळबिंदू ३२८° से.) (४) कायफळासारख्या वनस्पतीत आढळणारे मायरिसेटीन अथवा ३, ५, ७, ३’, ४’, ५’ हेक्झॅहायड्रोफ्लॅव्होन (वितळबिंदू ३६०° से.)

 

बहुतेक फ्लॅव्होने पिवळ्या स्फटिकांच्या रूपात असून त्यांचा वितळबिंदू उच्च असतो. त्यांचे रंग हस्तीदंतासारखा ते गडद पिवळा या दरम्यानचे असतात. पुष्कळ फ्लॅव्होने पाणी, अम्ले व क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याचा गुणधर्म असलेली संयुगे) यांच्यात विरघळतात. त्यांच्या विद्रावामध्ये लेड ॲसिटेटचा विद्राव घातल्यास पिवळा, नारिंगी अथवा तांबडा साका निर्माण होतो. फ्लॅव्होने रासायनिक दृष्ट्या अँथोसायनिनांसारखी असतात [⟶ अँथोसायनिने व अँथोझँथिने].

 

फ्लॅव्होनाचे सुईसारखे स्फटिक रंगहीन असून त्याचा वितळबिंदू १००° से. आहे, तर फ्लॅव्होनालाचे असेच पिवळे स्फटिक १६९° से. ला वितळतात.

 

फ्लॅव्होने रंगद्रव्ये म्हणून वापरली जातात. रेशीम, लोकर, वगैरे रंगविण्यासाठी काही ठिकाणी अजूनही यांचा वापर केला जातो. काही फ्लॅव्होनांचा रोगोपचारातही उपयोग होतो.

  

कारेकर, न. वि. घाटे, रा. वि.