प्रीस्टली, जोसेफ : (१३ मार्च १७३३ – ६ फेब्रुवारी १८०४). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि शैक्षणिक व राजकीय विचारवंत. वायूंच्या रसायनशास्त्रात त्यांनी मौलिक भर टाकली.

जोसेफ

त्यांचा जन्म लीड्सजवळील ब्रिस्टल येथे झाला. लहानपणी आजारपणामुळे त्यांचे शिक्षण व्यवस्थित झाले नाही परंतु धर्मोपदेशकांच्या मदतीने त्यांनी तर्कशास्त्र, धर्म, तत्त्वमीमांसा या विषयांमध्ये आणि ग्रीक, हिब्रू, अरबी इ. परकीय भाषांमध्ये प्रावीण्य मिळविले. १७५६ मध्ये नीडम येथील चर्चमध्ये त्यांनी धर्मोपदेश म्हणून प्रवेश केला. त्यानंतर दोन वर्षांनी ते नँटविच चर्चचे प्रमुख झाले. १७६१ मध्ये वॉरिंग्टन येथील शाळेत शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. येथील वास्तव्यात त्यांनी शिक्षण व इंग्रजी व्याकरण यासंबंधी लेखन केले व ए चार्ट ऑफ बायॉग्राफी हे पुस्तक १७६५ मध्ये लिहिले. हे पुस्तक व शास्त्रीय संशोधन यांबद्दल १७६६ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड करण्यात आली, तसेच एडिंबरो विद्यापीठाची एल्एल्. डी. पदवी त्यांना देण्यात आली.

वॉरिंग्टन येथील नोकरीत असताना लंडन येथे त्यांचा बेंजामिन फ्रँकलिन यांच्याशी परिचय झाला व त्यांच्या प्रोत्साहनाने द हिस्टरी अँड प्रेझेंट स्टेट ऑफ इलेक्ट्रिसिटी हा ग्रंथ त्यांनी १७६७ मध्ये पूर्ण केला. मद्य बनविण्याच्या किण्वन (आंबविण्याच्या) प्रक्रियेत जी ‘स्थिर हवा’ (कार्बन डाय-ऑक्साइड) निर्माण होते, तिचे संशोधन त्यांनी याच सुमारास आरंभिले. हाच वायू त्यांनी खडूवर (कॅल्शियम कार्बोनेटावर) अम्लाची विक्रिया करून मिळविला व तो पाण्यात विरघळून बुडबुडे निघत असल्याने फसफसणारे व काही नैसर्गिक झऱ्यांच्या पाण्यासारखे रूचकर असे एक पेय तयार केले. या शोधाबद्दल रॉयल सोसासटीने त्यांना १७७३ मध्ये कॉप्ली पदक बहाल केले.

याच सुमारास त्यांनी चर्चचे काम सोडले व लॉर्ड शेलबर्न या श्रीमंत गृहस्थांकडे ग्रंथपाल म्हणून काम स्वीकारले. त्यामुळे शास्त्रीय प्रयोग करण्यास पुरेसा अवसर त्यांना मिळू लागला. १७७४ मध्ये त्यांनी बहिर्गोल भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरण केंद्रित करून मर्क्युरिक ऑक्साइड तापविले व त्यामधून निघणारा वायू जमवून तपासला. तो हवेपेक्षा ५-६ पटींनी शुद्ध आहे, असे आढळून आले. त्याचे संभाव्य उपयोगही त्यांनी वर्तविले. ए. एल्. लव्हॉयझर व इतर शास्त्रज्ञ यांच्याशी त्यांचा परिचय झाला व लव्हॉयझर व प्रीस्टली यांचा प्रयोग स्वतः करून पाहिला व त्यापासून मिळालेल्या वायूला ‘ऑक्सिजन’ हे नाव दिले. त्या काळी ज्वलनाचे स्पष्टीकरण फ्लॉजिस्टॉन या काल्पनिक तत्त्वाने केले जात असे [ज्वलन]. या तत्त्वाचा पाडाव करण्यास लव्हॉयझर यांना ऑक्सिजनाचा शोध फार उपयोगी पडला. तथापि प्रीस्टली स्वतः मात्र फ्लॉजिस्टॉन तत्त्वाचे पुरस्कर्ते होते.

इ. स. १७८० मध्ये त्यांनी शेलबर्न यांची नोकरी सोडली व ते बर्मिंगहॅम येथे पुन्हा धर्मोपदेश बनले. येथेच ऑन डिफरंट काइंड्स ऑफ एअर या पुस्तकाचे पाचवा व सहावा हे अखेरचे खंड त्यांनी पूर्ण केले. हिस्टरी ऑफ द करप्शन्स ऑफ ख्रिश्चॅनिटी या १७८२ मध्ये त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे आणि अमेरिकेतील वसाहती व फ्रेंच राज्यक्रांती यांबद्दल त्यांना वाटत असलेल्या सहानुभूतीमुळे ते लोकांत अप्रिय झाले. १७९१ मध्ये लोकांनी त्यांचे घर, चर्च आणि प्रयोगशाळा यांना आग लावली व त्यांना बुस्टर येथे पळून जावे लागले. नंतर ते लंडनला गेले व तेथून १७९४ मध्ये अमेरिकेत नॉर्थम्बरलंड (पेनसिल्व्हेनिया) येथे स्थायिक झाले.

वायूसंबंधीच्या प्रयोगात पाण्याऐवजी पाऱ्याचा उपयोग करून त्यावर ते वायू जमा करीत. त्यामुळे जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारे) असलेले अनेक वायू त्यांना मिळविता आले. ऑक्सिजन, नायट्रोजन, अमोनिया, नायट्रोजन-डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, हायड्रोजन क्लोराइड आणि सल्फर डाय-ऑक्साइड हे वायू त्यांनी शोधून काढले. वनस्पती हवेचे शुद्धीकरण कसे करतात व सूर्यप्रकाशाचा त्या प्रक्रियेवर कसा परिणाम होतो, यांसंबंधीचे त्यांचे संशोधनही महत्त्वाचे आहे. या संशोधनामुळे ⇨ प्रकाशसंश्लेषण आणि वनस्पतींचे श्वसन यांसंबंधी नंतर झालेल्या अभ्यासास चालना मिळाली.

प्रीस्टली आपल्या रासायनिक संशोधनात गणिती संबंधाकडे मात्र लक्ष देत नसत. हा दोष त्यांच्या हिस्टरी ऑफ द प्रेझेंट स्टेट ऑफ द डिस्कव्हरीज रिलेटिंग टू व्हिजन, लाइट अँड कलर्स या १७७२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथातही आढळतो. हा ग्रंथ हिस्टरी ऑफ ऑप्टिक्स या नावाने अधिक ओळखला जातो.

त्यांच्या रसायनशास्त्रातील कामगिरीच्या स्मरणार्थ अमेरिकन केमिकल सोसायटीने ‘प्रीस्टली पदक’ या पारितोषिकाची योजना केली आहे.

जमदाडे, ज. वि.

प्रीस्टली हे अठराव्या शतकातील पश्चिमी ज्ञानोदय युगाचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधी होते. ख्रिस्ती धर्मविचार, शिक्षण, राजकीय तत्त्वविचार व तत्त्वज्ञान या सर्वच क्षेत्रांत कसलेच पूर्वग्रह न बाळगता, एका विमुक्त, चिकित्सक व निर्भय विवेकवाद्याची भूमिका विलक्षण प्रामाणिकपणे त्यांनी आमरण स्वीकारली आणि त्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र विचारसरणी प्रतिपादन केली. शाळेतून विज्ञानाचे सप्रयोग शिक्षण देण्याचा उपक्रम त्यांनी केला. इतिहास, सार्वजनिक प्रशासन यांसारख्या कालोचित गरज-विषयांना अभ्यासक्रमातून प्राधान्य द्यावे, हा विचार हिरिरीने त्यांनी मांडला. लेक्चर्स ऑन हिस्टरी अँड जनरल पॉलिसी (१७८८) हा त्यांचा दोन खंडी ग्रंथ इतिहासाचे पाठ्यपुस्तक म्हणून इंग्लंड-अमेरिकेत मान्य झाला. रूडिमेंट्स ऑफ इंग्लिश ग्रामर (१७६१) या ग्रंथात पारंपरिक व्याकरणाची पद्धत बदलून त्यांनी इंग्रजी लेखकांच्या भाषाप्रयोगांच्या आधारे, इंग्रजी व्याकरणाची नवी मांडणी केली.

प्रीस्टली अनिर्बंध अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. नागरी व धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखूनच कायदे केले जावेत, असा त्यांचा आग्रह होता, उपयुक्ततावादी विचारप्रणालीचे ‘अधिकात अधिक लोकांचे अधिकात अधिक सुख’ हे प्रसिद्ध सूत्र बेंथँम यांना प्रीस्टली यांच्या विचारांतून सुचले. ॲन एसे ऑन द फर्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ गव्हर्न्मेंट (१७६८) यात प्रीस्टली यांच्या राजकीय व आर्थिक विचारांचे दर्शन घडते.

तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रीस्टली हे जडवादी होते व जडचेतनातील द्वंद्व त्यांना मान्य नव्हते. चेतनतत्त्वाचा आधार असलेली मुक्त संकल्पशक्ती ही आध्यात्मिक दृष्टीने अनाकलनीय व नैतिक दृष्टीने अनिष्ट आहे, अशी त्यांची धारणा होती.

पारंपरिक ख्रिस्थी तत्त्वसरणीचा नव्याने मागोवा घेऊन प्रीस्टली यांनी आत्माचे स्वतंत्र अस्तित्व, देवभयाची कल्पना इ. पारंपरिक कल्पना अमान्य केल्या. ख्रिस्ती धर्मतत्त्वांची ऐतिहासिक मीमांसा करून ख्रिस्ती धर्म हा सद्‌गुणसंपन्न रीतीने जगण्याचा एक जीवनमार्ग आहे, असा अभिप्राय त्यांनी सूचित केला. हिस्टरी ऑफ द करप्शन्स ऑफ ख्रिश्चॅनिटी (१७८२) या ग्रंथात त्यांचे हे विचार व्यक्त झालेले आहेत. ते नॉर्थम्बरलंड येथे मरण पावले.

जाधव, रा. ग.