ॲक्रिडीन : कार्बनी संयुग, रेणवीय सूत्र C13H9N. संरचना सूत्र (रेणूमध्ये अणू एकमेकांना कसे जोडले आहेत हे दाखविणारी रचना) खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे.

या त्रिवलयी (कार्बन व इतर अणूंनी तयार झालेल्या शृंखलेची मोकळी टोके एकमेकांस जोडल्यामुळे बनलेल्या तीन वलयी रचना असलेल्या) संयुगातील कार्बन अणूंना क्रमांक देण्याच्या अनेक पद्धती आहेत. वरील आकृतीत दाखविलेली पद्धत येथे वापरली आहे. ग्रेबे व कारो या शास्त्रज्ञांनी १८७० साली दगडी कोळशापासून मिळणाऱ्या डांबरापासून ॲक्रिडीन प्रथम वेगळे केले.

गुणधर्म : १००° से.ला ॲक्रिडीनाचे संप्लवन (घनरूपाचे सरळ बाष्प होणे) सुरू होते. द्रवांक (वितळबिंदू) ११०° से. क्वथनबिंदू (उकळबिंदू) ३४६° से. पाण्यात फारसे विद्राव्य (विरघळत) नाही, पण ॲल्कोहॉल, ईथर व इतर कार्बनी विद्रावकांत सहज विरघळते. याचे किंवा याच्या अनुजातांचे (एका संयुगापासून बनविलेल्या दुसऱ्या संयुगांचे) विरल विद्राव निळ्या रंगाचे अनुस्फरण (विशिष्ट तरंगलांबीचे प्रारण शोषून नंतर ते अधिक तरंगलांबीच्या प्रकाशाच्या रूपात बाहेर टाकणे) दर्शवितात. स्ट्रेप्टोमायसीन व पेनिसिलीन यांचे परिमाण मोजण्यासाठी ॲक्रिडीनाच्या काही अनुजातांच्या अनुस्फुरणाचा उपयोग करतात. शुभ्र व शुद्ध ॲक्रिडीनाच्या पत्रीचा रंग सूर्यप्रकाशात पिवळा होतो. क्षारकीय (अम्‍लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याच्या) गुणामुळे प्रबल खनिज अम्‍लाबरोबर विक्रिया होऊन यापासून पिवळ्या रंगाची लवणे मिळतात. हा क्षारकीय गुण त्याच्यातील तृतीयक नायट्रोजनामुळे येतो. ॲक्रिडीनाच्या ⇨क्षपणाने ॲक्रिडीन C13H11N (९,१० डायहायड्रो ॲक्रिडीन) मिळते.

कृती : (१) डांबराचे ३००° ते ३६०° से. तापमानास ऊर्ध्वपातन करून मिळणाऱ्या अंशाचा निष्कर्ष (अर्क) सल्फ्यूरिक अम्‍लाने काढला जातो. त्याच्यात पोटॅशियम डायक्रोमेट घालून मिळणारा अवक्षेप (साका) पाण्यात विरघळवितात व उष्ण पाण्यातून स्फटिकीभवन करून मिळणाऱ्या पदार्थाचे सौम्य अमोनियाने अपघटन (तुकडे पाडून लहान अणू बनणे) घडवून आणले जाते. त्यामुळे ॲक्रिडीन (क्षारक) मुक्त होते व त्याचे हायड्रोक्लोराइडात रूपांतर केले जाते. त्यावर पुन: अमोनियाची विक्रिया करून ॲक्रिडीन पुन्हा मिळविले जाते.

(२) डांबरातील उच्च क्वथनबिंदू असणाऱ्या तेलात क्षार (अल्कली) बायसल्फाइट किंवा सल्फ्यूरस अम्‍ल मिसळून व त्यानंतर उदासीन (अम्‍लीय वा क्षारकीय गुणधर्म नसलेल्या) सल्फाइटाच्या पाण्यातील विद्रावाशी विक्रिया करूनही ॲक्रिडीन मिळविले जाते.

वरील दोन्ही पद्धतींपासून मिळणाऱ्या ॲक्रिडिनात इतर संबंधित संयुगेही असतात. ती काढून टाकून शुद्ध ॲक्रिडीन मिळविणे कठीण असते. संश्लेषणाने (घटक अणू वा रेणू एकत्र आणून कृत्रिम पद्धतींनी पदार्थ बनविण्याच्या पद्धतीने) ॲक्रिडीन तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत व त्या पद्धतींनी मिळणारे ॲक्रिडीन सापेक्षतः अधिक शुद्ध असते. या पद्धतींपैकी महत्त्वाच्या पुढीलप्रमाणे आहेत.

(१) ॲक्रिडोनाचे (C13H9ON) (कीटो-डाय हायड्रॉक्सी ॲक्रिडीन) क्षपण करून ॲक्रिडीन मिळविणे. ॲक्रिडोन हे सुलभपणे तयार करता येण्यासारखे संयुग आहे. ते एन-फिनिल अँथ्रॅनिलिक अम्‍ल याच्यावर संहत (जास्त प्रमाण असलेल्या) सल्फ्यूरिक अम्‍लाची विक्रिया केल्याने मिळते. जस्ताच्या पुडीने [किंवा अल्कोहॉलाच्या सान्निध्यात, सोडियम किंवा सोडियम पारदमेलाने (पाऱ्याबरोबरच्या मिश्रधातूने)] ॲक्रिडोनाचे क्षपण घरून ॲक्रिडान (C13H11N) मिळते व ॲसिटिक अम्‍लातील पोटॅशियम डायक्रोमेटाने ॲक्रिडानाचे ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] करून ॲक्रिडीन मिळते.

(२) तापवून लाल केलेल्या नळीतून एन-फिनिल ऑर्थोटोल्यूडीन नेले असता बऱ्याच अंशी शुद्ध ॲक्रिडीन मोठ्या प्रमाणात मिळते.

(३) एन-बेंझिल ॲनिलिनाची वाफ लाल तापलेल्या नळीतून प्लॅटिनमाच्या सान्निध्यात नेली असता ॲक्रिडीन मिळते.

उपयोग : ॲक्रिडीनाच्या अनुजातांचा फार मोठ्या प्रमाणावर रंजकद्रव्ये म्हणून वापर केला जातो. ॲक्रिडिनाचे रंजक क्षारकीय असून ते बहुतेक पिवळे, तांबडे, नारिंगी किंवा तपकिरी असतात. त्यांचा उपयोग मुख्यत्वेकरून चामडे व सूत रंगविण्यासाठी केला जातो. ॲक्रिडिनाच्या काही रंजकांनी लोकर व रेशीम चांगली रंगविली जातात. ॲक्रिडिनापासून तयार केलेल्या फ्लाविन या रंजकातील प्रमुख घटक क्रिसॅनिलीन होय. रोझॅनिलीन तयार करताना ते उपफल (मुख्य उत्पादनाबरोबर उत्पन्न होणारा दुसरा पदार्थ) म्हणून मिळते.

बेंझाल्डिहाइड व २, ४-टोल्यूइन डाय-अमाइन यांचे संघनन (रेणूंची जोडणी) केल्यावर मिळणाऱ्या डाय-हायड्रो ॲक्रिडिनाच्या अनुजाताचे फेरिक क्लोराइडाने ऑक्सिडीकरण केल्यावर बेंझोफ्लाविन मिळते. बेंझोफ्लाविन हे पिवळ्या रंगाचे असून चामडे रंगविण्यासाठी त्याचा उपयोग करतात. बेंझाल्डिहाइड व मेटा- ॲमिनो-डाय मिथिल ॲनिलीन यांच्या संघननाने ॲक्रिडीन ऑरेंज-आर मिळते. फॉर्माल्डिहाइड व मेटा-डाय-मिथिल ॲमिनो ॲनिलीन यांच्या संघननाने ॲक्रिडीन ऑरेंज-एल हे मिळते. चामडे व सूत रंगविण्यासाठी त्याचा उपयोग करतात.

थॅलिक-ॲनहाइड्राइड व एन-एन-डाय-एथिल-मेटा-फिनिलीन-डाय-अमाइन यांच्या संघननाने फ्लाविओझाइन हे रंजक मिळते. चामडे व सूत रंगविण्यासाठी त्याचा उपयोग करतात.

ॲक्रिडिनाच्या काही अनुजातांत औषधी गुणधर्म आहेत असे अर्लिक यांनी दाखवून दिले. क्विनॅक्रीन (किंवा मेपॅक्रीन किंवा ॲटेब्रीन) [C23H30ClN3O] नावाच्या संयुगाचे स्फटिक पिवळे असतात. ते क्विनाइनापेक्षा कमी कडू असते. हिवतापावर ते गुणकारी औषध असून दुसऱ्या महायुद्धात त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला.

ॲक्रिफ्लाविन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधाचा एक घटक C14H14N3Cl व प्रोफ्लाविन (उदासीन सल्फेट) हे ॲक्रिडीन अनुजात जखमेत पू होऊ नये म्हणून वापरतात. रिव्हॅनॉल (६, ९ डाय-ॲमिनो, २ इथॉक्सि ॲक्रिडीन लॅक्टेट) हे आमांशावर गुणकारी औषध आहे.

संदर्भ : Acheson, R. M. Acridines, New York, 1956.

पटवर्धन, सरिता अ.