कून, रिखार्ट : (३ डिसेंबर १९००–१ ऑगस्ट १९६७). जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ. १९३८ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला व तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षण म्यूनिक येथे झाले. म्यूनिक विद्यापीठाची डॉक्टरेट (१९२६) पदवी संपादन केल्यावर त्यांनी प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ व्हिल्‌श्टेटर यांचे मदतनीस म्हणून काम केले. त्यांनी १९२६–२९ मध्ये झुरिक येथील तांत्रिक शाळेत काम केले. त्यानंतर हायड्‌लबर्ग येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूटचे संचालक व तेथील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. तसेच गॉटिंगेन येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता.

कॅरोटिनॉइडे व जीवनसत्त्वे यांच्या अन्वेषणाप्रित्यर्थ (संशोधनाप्रित्यर्थ) त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेले होते, पण जर्मन सरकारने त्यांना ते स्वीकारण्याची मनाई केली. दीर्घ शृंखलेच्या व एकांतरित द्विबंध (शृंखलेतील एकाआड एक कार्बन अणूंमध्ये असलेले द्विबंध) असलेल्या संयुगांच्या (पॉलिइने व डायफिनिल पॉलिइने) संरचनेचे (रेणूतील अणूंच्या मांडणीचे) त्यांनी अन्वेषण केले. ही संयुगे व कॅरोटिनॉइडे यांची संरचना समान असते. ही सर्व संयुगे पिवळ्या रंगाची व मेदविद्राव्य (स्‍निग्ध पदार्थात विरघळणारी) आहेत. ती निसर्गात सर्वत्र आढळतात व त्यांचे कार्यही महत्त्वाचे असते. कून यांनी आठ कॅरोटिनॉइडे शोधून काढली, ती शुद्ध अवस्थेत मिळविली व विश्लेषणाने त्यांची संरचना निश्चित केली [→ कॅरोटिनॉइडे]. काही शैवलांचे फलन होण्यासाठी, त्यातील विशिष्ट कॅरोटिनॉइड आवश्यक असते असे त्यांनी सिद्ध केले. शरीरातील साखरेच्या ऑक्सिडीकरणाशी [→  ऑक्सिडीभवन] निगडित असलेले ब जीवनसत्त्व म्हणजेच रिबोफ्लाविन यांची संरचना मांडण्याचे कार्य कून व पाउल कारर यांनी एकाच वेळी पण स्वतंत्रपणे केले. त्रेपन्न हजार लिटर दुधातून फक्त एक ग्रॅम रिबोफ्लाविन विलग करण्यात कून यांनी सर्वप्रथम यश मिळविले. आपल्या सहकाऱ्‍यांच्या मदतीने त्यांनी  ब जीवनसत्त्व हे महत्त्वाच्या त्वक्‌शोथनाशक (त्वचेची दाहयुक्त सूज नाहीशी करणारे) संयुग वेगळे केले. जैव व वैद्यकीय समस्यांमध्ये या जटिल कार्बनी संयुगांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरला आहे.

फोन लीबिक यांनी स्थापन केलेल्या Annalen der Chemie या नियतकालिकाचे कून यांनी १९४८ पासून संपादन केले. पाश्चर, पॅटर्नो व गटे ही पारितोषिके त्यांनी मिळविली. ते हायड्‍लबर्ग येथे मृत्यू पावले.  

                                                     जमदाडे, ज. वि.