पिक्रिक अम्‍ल : एक कार्बनी अम्‍लधर्मी संयुग. याला लिडाइट आणि मेलिनाइट असेही म्हणतात. रेणुसूत्र (संयुगाच्या रेणूतील अणूंचे प्रकार व संख्या दर्शविणारे सूत्र) C6H307N संरचना सूत्र (रेणूतील अणूंची जोडणी दाखविणारे सूत्र) H0-C6H2 – (NO2)3. शास्त्रीय नाव २, ४, ६ – ट्रायनायट्रोफिनॉल. जे.बी.ए. द्यूमा यांनी १८३६ मध्ये याचे रेणुसूत्र ठरविले आणि पिक्रिक अम्‍ल हे नाव दिले. १८४१ मध्ये ऑग्यूस्त लॉरां यांनी ते फिनॉलाचा नायट्रो अनुजांत आहे, असे सिद्ध केले आणि फिनॉलापासून ते प्रथम बनविले. नीळ, रेशीम, सॅलिसिलिक अम्‍ल यांवर नायट्रिक अम्‍लाची विक्रिया होऊन ते बनते. रेशमाला रंग देण्यासाठी याचा उपयोग १८४९ मध्ये करण्यात आला. रंगधंद्यात कृत्रिम रंग वापरल्याचे हे पहिले उदाहरण होय.

पिक्रिक अम्‍लनिर्मिती : (१) सल्फूरिक अम्‍लाने फिनॉलापासून प्रथम फिनॉल २, ४ डाय-सल्फॉनिक अम्‍ल बनवितात. नंतर त्यावर नायट्रिक अम्‍लाची विक्रिया केली म्हणजे पिक्रिक अम्‍ल बनते.  

(२) क्‍लोरोबेंझिनाचे नायट्रीकरण केले म्हणजे २, ४ – डायनायट्रोक्‍लोरोबेंझीन बनते. त्याचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे करणे)केले म्हणजे २, ४ – डायनायट्रोफिनॉल मिळते. त्यापासून आणखी नायट्रीकरण करून पिक्रिक अम्‍ल बनवितात. 

गुणधर्म : पिवळ्या रंगाचा स्फटिकी पदार्थ. चव कडू, अती विषारी. वितळबिंदू १२१.८ से. थंड पाण्यात जवळजवळ अविद्राव्य (न विरघळणारे). कढत पाणी, कढत बेंझीन आणि अल्कोहॉल यांत विद्राव्य. नायट्रो गटाच्या (NO2) उपस्थितीमुळे यातील हायड्रॉक्सी (0H) गटाचे विपुल आयनीभवन (ऋण व धन विद्युत् भारित घटक असे विभाग पडणे) होते. त्यामुळे हे अम्‍ल जवळजवळ खनिज अम्‍लाइतके प्रबळ अम्‍ल आहे. ते कार्बोनेटांचे विघटन (घटक वेगळे होणे) घडविते. अरोमॅटिक हाटड्रोकार्बन, अमाइने व फिनॉले यांच्या विक्रियेने मिळणारी संयुगे स्फटिकरूप व काटकोर वितळबिंदूंची असल्यामुळे त्या त्या संयुगाच्या निश्चितीकरिता त्यांचा फार उपयोग होतो. धातू व ऑक्साइडे यांच्या उपस्थितीत याचा स्फोट होतो.

उपयोग : पूर्वी स्फोटकात वापरीत असत. यापासून सोडियम पिक्रॅमेट हे रंगधंद्यात आणि क्‍लोरोपिक्रिन हे ⇨पीडकनाशक व संश्लेषणात उपयोगी पडणारे संयुग तयार करतात. 

देशपांडे, ज.र.