अमेरिसियम : एक रासायनिक मूलद्रव्य. या मूलद्रव्याचा शोध अमेरिकेमध्ये लागल्यामुळे त्याला हे नाव देण्यात आलेले आहे. आवर्त सारणीच्या (मूलद्रव्यांची एका विशिष्ट पद्धतीने मांडणी करून तयार केलेल्या कोष्टकाच्या,⟶ आवर्त सारणी) ‘ॲक्टिनाइड’ नावाच्या मालेतील धातू. रासायनिक चिन्ह Am. अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ९५. समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेला त्या मूलद्रव्याचा प्रकार,⟶ समस्थानिक) एकूण दहा, द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील न्यूट्रॉन व प्रोटॉन यांची मिळून एकूण संख्या) २३७ ते २४६. सर्वांत अधिक अर्धायुकाल (किरणोत्सर्गी पदार्थातील मूळ अणुसंख्या विघटनामुळे निम्मी होण्यास लागणारा काल) असणाऱ्‍या समस्थानिकाचा द्रव्यमानांक २४३ आहे. निरनिराळ्या स्थानांतील नमुन्यांपासून काढलेल्या अमेरिसियमात समस्थानिकांचे प्रमाण निरनिराळे असल्यामुळे तिच्या निरनिराळ्या नमुन्यांचा अणुभार सारखाच नसतो व सर्वांत स्थिर अशा समस्थानिकाचा द्रव्यमानांक २४३ हाच सारणीत दिलेला अणुभार असतो. हे सर्व समस्थानिक किरणोत्सर्गी आहेत.

 

वेगवान मूलकणांचा मारा करून अणूचे मूलद्रव्यांतरण (एका मूलद्रव्याचे दुसऱ्‍या मूलद्रव्यात रूपांतर होणे) करता येते असा शोध लागल्यावर ९२ पेक्षा अधिक अणुक्रमांक असणारी अशी जी अकरा युरेनियमोत्तर मूलद्रव्ये गेल्या काही वर्षांत तयार करण्यात आली, त्यांपैकी अमेरिसियम हे एक आहे. ते नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. अणुकेंद्रीय विक्रियकात [⟶ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी] प्‍लुटोनियम–२४१ वर न्यूट्रॉनांचा भडिमार केल्यावर पुढील अणुकेंद्रीय विक्रिया अनुक्रमाने होऊन अमेरिसियम–२४१ तयार होते :

 

        Pu239 + nPu240 +γ

       Pu240 + nPu241 + γ

        Pu241 + nAm241 + e

 

येथे n हा न्यूट्रॉन आणि γ व e- हे अनुक्रमे गॅमा किरण व इलेक्ट्रॉन यांचे उत्सर्जन दर्शवितात.

 

अमेरिसियम–२४१ चा शोध जी. टी सीबॉर्ग, आर्. ए. जेम्स व एल्. ओ. मॉर्गन यांनी लावला (१९४४–४५). त्याचा अर्धायुकाल ४५८ वर्षे आहे. अमेरिसियमाचे बराच दीर्घ अर्धायुकाल असणारे इतर समस्थानिक आहेत. परंतु ते मिळविण्यास कठीण असल्यामुळे त्यांचा उपयोग केला गेलेला नाही. मूलकणांचा भडिमार करून किंवा अपघटन (लहान घटकांत रूपांतर करणारी) विक्रिया घडवून ते तयार केले जातात.

 

अमेरिसियम व ⇨विरल मृत्तिका  यांच्यात बरीच साम्ये आढळतात. अमेरिसियमाची काही संयुगे विरल मृत्तिकांपैकी काहींच्या तत्सम संयुगांशी समाकृतिक (सारखी स्फटिकरूपे असणारी, समरूपता) असतात व जलीय विद्रावात (पाण्यात संयुग विरघळवून तयार होणारा द्रव) अमेरिसियमाची ⇨ऑक्सिडीभवनाची सर्वांत प्रमुख अशी अवस्था ३+ असते. ही अमेरिसियम व विरल मृत्तिका यांच्यातील साम्ये होत. परंतु जलीय विद्रावात अमेरिसियमाचे ५+व ६+या अवस्थांप्रत ऑक्सिडीभवन होणे शक्य असते, हा त्यांच्यातील भेद होय.

 

AmO2, Am2O3, AmCl3, AmBr3 व AmF4 ही या धातूची प्रमुख संयुगे होत. अमेरिसियम ट्राय-

-फ्ल्युओराइड व बेरियम ही सु. १,२०० से. पर्यंत तापवून अमेरिसियम धातू मिळविता येते. तिचा रंग रूपेरी व विशिष्टगुरुत्व सु. ११·७ असते.

पहा : युरेनियमोत्तर मूलद्रव्ये.

ठाकूर, अ. ना.