अम्‍लराज: (ॲक्वा रेजिआ). तीन भाग संहत (तीव्र) हायड्रोक्लोरिक अम्‍ल व एक भाग संहत नायट्रिक अम्‍ल यांच्या मिश्रणाला ‘अम्‍लराज’म्हणतात. केवळ हायड्रोक्लोरिक अम्‍लात किंवा केवळ नायट्रिक अम्‍लात सोने, प्लॅटिनम यांसारख्या अभिजात (हवा, पाणी इत्यादींमुळे न गंजणाऱ्‍या) धातू विरघळत नाहीत पण या अम्‍लांच्या वरील मिश्रणात विरघळतात म्हणून त्या मिश्रणाला किमयागारांनी अम्‍लराज हे नाव दिले. त्याला कधीकधी ‘नायट्रो-हायड्रोक्लोरिक अम्‍ल’ असेही म्हणतात. सहज न विरघळणाऱ्‍या पदार्थांचा विद्राव करण्यासाठी अम्‍लराज किंवा त्यासारखी मिश्रणे प्रयोगशाळांत व उद्योगधंद्यांत वापरली जातात.

हायड्रोक्लोरिक व नायट्रिक अम्‍ले एकत्र मिसळल्यावर Cl आयनाचे नायट्रिक अम्‍लामुळे ⇨ ऑक्सिडीभवन होते व नवजात (विक्रिया झाल्याबरोबर तयार होणारा व अतिशय विक्रियाशील असणारा) क्लोरीन निर्माण होतो व त्या क्लोरिनामुळे (AuCl4), (PtCl6) यांसारखे जटिल (गुंतागुंतीचे) आयन तयार होऊन धातूंचा विद्राव घडून येतो. प्लॅटिनम व पॅलॅडियम या धातू अम्‍लराजात लवकर विरघळतात पण इरिडियम, ऑस्मियम, ऱ्होडियम व रूथेनियम या प्लॅटिनमाच्या गटातील इतर धातूंवर अम्‍लराजाचा तितकासा परिणाम होत नाही. बंद केलेल्या नळीत अम्‍लराजाची विक्रिया केल्यावरच त्यांचे पूर्ण विद्रावण होते.

कारेकर, न. वि.