विद्रावक:विद्रावात मोठ्या प्रमाणात असलेला घटक पदार्थ. सामान्यतः अशा शुद्ध अवस्थेतील पदार्थात (विद्रावकात) दुसरा घटक पदार्थ (विद्रुत) विरघळला जातो व सामान्यपणे विद्रुत पदार्थाचेविद्रावातील प्रमाण कमी असते. वायू, द्रव किंवा घन यांपैकी कोणत्याही स्थितीत विद्रावक असू शकतो. सामान्यतः विद्रावक हा द्रव स्थितीत व विद्राव्य (विरघळणारा) पदार्थ घन, वायू किंवा द्रवरूप असतो. रंगलेप, लॅकर, छपाईची शाई, वस्त्रनिर्मिती, औषधनिर्मिती इ. उद्योगधंद्यांत विद्रावकांचा फार उपयोग होतो. वैश्लेषिक रसायनशास्त्र, रासायनिक शुद्धीकरण आणि खनिज तेल परिष्करण (शुद्धीकरण) यांमध्ये विद्रावकांचा वापर करतात.

वर्गीकरण:ध्रुवीय व अध्रुवीय असे विद्रावकांचे दोन प्रकार आहेत. ध्रुवीय विद्रावकाचे रेणू विद्युत् क्षेत्रात दिशिक गुणधर्म दर्शवितात मात्र अध्रुवीय विद्रावकाचे रेणू असे गुणधर्म दर्शवीत नाहीत. अल्कोहॉले, कीटोने इ. ध्रुवीय विद्रावकांचा विद्युत् अपार्यता स्थिरांक उच्च असतो तर हायड्रोकार्बनांसारख्या अध्रुवीय विद्रावकांचाविद्युत् अपार्यता स्थिरांक कमी असतो [⟶विद्युत् अपारक पदार्थ]. रासायनिक घटक आधारभूत धरूनसुद्धा विद्रावकांचे प्रकार करतात. पाणी,अल्कोहॉलमिश्रित पाणी, लवणमिश्रित पाणी हा एक प्रकार आहे. तसेच हायड्रोकार्बने, अल्कोहॉले, ईथरे, कीटोने, एस्टरे, क्लोरोफॉर्मसारखे क्लोरीन गट असलेले विद्रावक, नायट्रोबेंझिनासारखे नायट्रो गट असलेले विद्रावक, पिरिडिनासारखी अमाइने, अमोनिया व सल्फर डायऑक्साइडासारखे द्रवरूपातील वायू असे रासायनिक गुणधर्मावरून व गटांवरून पडलेले विद्रावकांचे प्रकार आहेत.

यांशिवाय विद्रावकांचे जलीय, जलेतर व कार्बनी असे तीन स्थूल वर्गही केले जातात. उद्योगधंद्यात वापरल्या जाणाऱ्या व रासायनिक संश्लेषणात माध्यम म्हणून वापरण्यात येणाऱ्याकार्बनी संयुगांना सामान्यपणे कार्बनी विद्रावक म्हणतात. जलेतर विद्रावकांमध्ये सर्वसाधारणपणे अकार्बनी द्रव्ये तसेच कमी रेणुभाराची कार्बनी द्रव्ये (उदा., ॲसिटिक अम्ल, मिथेनॉल, डायमिथिल सल्फॉक्साइड) येतात. जलीय विद्रावकात पाण्यातील विद्रावकांचा समावेश असतो.

जलीय विद्रावक:पाणी हे सर्वात सामान्य व उत्तम विद्रावक आहे. विविध द्रव्यांचे पाण्यातील विद्राव हेही विद्रावक म्हणून वापरले जातात. याकरिता पाणी सापेक्षतः शुद्ध असावे लागते. पाणी स्वस्त, बिनविषारी व अज्वालाग्राही आहे. अनेक द्रव्ये त्यात चांगली विरघळू शकतात. त्याचा उकळबिंदू उच्च असल्याने कोठी तापमानाला ते हाताळता येते. तसेच योग्य कालावधीत त्याचे बाष्पीभवन होते. पाण्याच्या रेणूंच्या ध्रुवीय वैशिष्टयामुळे ते त्यांच्याभोवतीच्या धन वा ऋण आयनांना (विद्युत् भारित अणू, रेणू किंवा अणुगटांना) सहजपणे जोडले जाऊ शकतात. यामुळे विरघळण्याची क्रिया होण्यास मदत होते. आयनांदरम्यान असणाऱ्याविद्युतीय प्रेरणांच्या संदर्भात पाण्याची विद्युत् अपार्यता किंवा निरोधनक्षमता उच्च असते. यामुळे पाण्याच्या रेणूंद्वारे (विद्युत् भारित) आयन दूर ठेवले जातात. परिणामी विरघळण्याची क्रिया विस्तृत क्षेत्रात होऊ शकते. अशा प्रकारे आदर्श विद्रावकाचे पुष्कळ गुणधर्म पाण्यात आहेत. मात्र बाष्पीभवनासाठी त्याला इतर द्रवांपेक्षा अधिक उष्णता लागते तसेच पुष्कळ पदार्थातून ते काढून टाकणे अवघड असते, हे त्याचे विद्रावकाच्या दृष्टीने असणारे तोटे होत.

जस्ताचे भाजलेले धातुक (कच्चा रूपातील धातू) व कमी प्रतीचे तांब्यांचे ऑक्साइड धातुक यांच्या निक्षालनासाठी विरल सलफ्यूरिक अम्ल हे विद्रावक वापरतात. धातुकांपासून चांदी व सोने मिळविण्यासाठी सायनाइड विद्राव वापरतात.

औषधि-उद्योगांत वापरावयाचे पाणी अगदी शुद्ध असावे लागते, तर रक्तप्रवाहात वापरावयाचे असल्यास पाण्यात ताप निर्माण करणारी द्रव्ये असता कामा नयेत. कापड, मद्य इ. खास उद्योगांसाठी वापरावयाच्या पाण्यात लोहाचे प्रमाण अल्प असावे लागते.

विरघळविण्याची क्षमता हा पाण्याचा एक सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म आहे, पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यात भूकवकातील विविध द्रव्ये विरघळतात. अशा रीतीने प्रचंड खडक हळूहळू झिजतात. पाण्यात विरघळलेली खनिजे वनस्पती शोषतात व त्यांचा उपयोग नवीन ऊतके (समान रचना व कार्य असणारे कोशिकांचे-पेशींचे-समूह) निर्माण करण्यासाठी करतात. ⇨प्रकाशसंश्लेषणाद्वारे वनस्पतीने बनविलेले अन्नपदार्थ पाण्यात विरघळून तिच्या सर्व भागांकडे वाहून नेले जातात. माणसाच्या रक्तात पाणी हा मुख्य घटक असून पाण्यात विरघळलेले अन्नपदार्थ रक्तप्रवाहातील कोशिशिकांकडे नेले जातात व मग त्यांचे शोषण होते. [⟶पाणी].

जलेतर विद्रावक : हे विद्रावक धन (उदा., वितळलेले लिथियम आयोडाइड), द्रव (सल्फूरिक अम्ल) किंवा वायुरूप (उदा. द्रवरूप अमोनिया) असतात. या विद्रावकांचे वर्गीकरण बहुधा स्वेच्छ रीतीने विविध घटकांनुसार केले जाते. प्रोटॉनांशी सहसंबद्ध होण्याच्या क्षमतेनुसार यांचे सामान्यपणे पुढीलप्रमाणे चार गट केले जातात : (१) क्षारकीय : यांत अम्लीय विद्रावकाच्या तुलनेत प्रोटॉन मुक्त करण्याची प्रवृत्ती कमी असते. हे सामान्यपणे अमोनियापासून (उदा., अमाइने, हायड्रॅझिने, पिरिडिने) किंवा पाण्यापासून (उदा., अल्कोहॉले, ईथरे) बनलेली संयुगे (अनुजात) असतात. (२) अम्लीय विद्रावक : यांच्यात क्षारकीय विद्रावकांपेक्षा प्रोटॉन मुक्त करण्याची प्रवृत्ती जास्त असते. निर्जलीय ॲसिटिक अम्ल, हायड्रक्लोरिक अम्ल ही यांची उदाहरणे होत. (३) अप्रोटिक विद्रावक : या विद्रावकांना प्रोटॉनांविषयी अगदी थोडीच आसक्ती असते. तसेच विच्छेदनक्षम नसल्याने ते प्रोटॉन देऊ शकत नाहीत. त्यांना अक्रिय अविच्छेदनक्षम आयनीभवनक्षम नसलेले विद्रावक असेही म्हणतात. सल्फर डाय-ऑक्साइड हे यांचे एक उदाहरण आहे. (४) उभयप्रोटिक विद्रावक: हे प्रोटॉन समाविष्ट करू शकतात किंवा देऊ शकतात. उदा., अमोनिया एक प्रोटॉन देऊ किंवा स्वीकारू शकतो.

कार्बनी विद्रावक : पुष्कळ कार्बनी संयुगे पाण्यात विरघळत नाहीत त्याच्याबरोबर विक्रिया करीत नाहीत. म्हणून कार्बनी संयुगांची निर्मिती व शुद्धीकरण करणाऱ्याऱ्याकारखान्यांमध्ये पुष्कळ कार्बनी विद्रावकांचा उपयोग करतात. डांबर किंवा खनिज तेल यांपासून मिळविण्यात आलेली⇨हायड्रोकार्बन सर्वांत साधी आहेत (उदा., हेक्झेन, हेप्टेन, आयसोऑक्टेन इ.). ही द्रव्ये स्वस्त असल्यामुळे जास्त प्रमाणात वापरली जातात. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बने (उदा., बेंझीन, टोल्यूइन, झायलिने इ.) बरीच महाग असतात. ही बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारी) हायड्रोकार्बने आहेत. या हायड्रोकार्बनांचे तोटे म्हणजे ती ज्वालाग्राही असून विशिष्ट द्रव्यांच्या बाबतीत ती सापेक्षतः कमी विद्रावकक्षम आहेत [⟶ॲरोमॅटिक संयुगे]. क्लोरिनीकृत हायड्रोकार्बनांमध्ये (उदा.,क्लोरिनीकृत पॅराफिने, कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफॉर्म इ.) विविध प्रकारची द्रव्ये विरघळतात. ती पुष्कळ कमी प्रमाणात ज्वालाग्राही असतात. तथापि ती अल्कोरिनीकृत हायड्रोकार्बनांपेक्षा अनेक पटींनी महाग असतात. या श्रेणीतील काही विद्रावक विषारी असल्यामुळे त्यांच्या व्यावहारिक उपयोगांवर बंधने येतात. सर्वसामान्यपणे ऑक्सिजनाचा समावेश असलेले विद्रावक (उदा., अल्कोहॉले, कीटोने, ईथरे, एस्टरे इ.) हायड्रोकार्बनांपेक्षा अधिक महाग आहेत.

औद्योगिक विद्रावक खनिज तेलासारखे नैसर्गिक किंवा अल्कोहॉल, ईथर यांसारखे संश्लिष्ट (घटक एकत्र आणून कृत्रिम रीतीने तयार केलेले) असू शकतात. उद्योगधंद्यांत विद्रावक कमी-जास्त अशुद्ध असले तरी चालतात. बहुतेक औद्योगिक विद्रावांत दोनपेक्षा जास्तघटक व पुष्कळदा एकापेक्षा जास्त विद्रावक असतात. असे मिश्रविद्रावक कधीकधी जास्त उपयुक्त असतात. कमी क्रियाशील पण स्वस्त विद्रावक विरलकारक म्हणून मौल्यवान क्रियाशील विद्रावकाबरोबर वापरतात. फार महाग असलेल्या विद्रावकांच्या विद्रावांऐवजी पाण्यामधील पायसे (एकमेकांत न मिसळणाऱ्याद्रवांपासून बनलेली दृढ मिश्रणे) नेहमी वापरली जातात. पायसीकारक मिसळून पुष्कळ द्रवरूप पदार्थांची चांगली स्थिर पायसे तयार करता येतात. [⟶ पायस].

ॲरोमॅटिक संयुगांची विद्रावकक्षमता ओळखण्यासाठी कौरी ब्युटेनॉल अनियंत्रित परीक्षा वापरतात. कौरी गोंद ब्युटिल अल्कोहॉलामध्ये (ब्युटेनॉलामध्ये) विद्राव्य आहे पण हायड्रोकार्बनामध्ये अविद्राव्य (न विरघळणारा) आहे. ज्ञात कौरी गोंद असलेली ब्यिटिल अल्कोहॉलामध्ये हायड्रोकार्बनाने मलिनता येते. तेव्हा हायड्रोकार्बनाच्या घनफळास ‘कौरी व्युटेनॉल मूल्य’ असे म्हणतात. हे मूल्य नॅफ्थाचे ३० व टोल्यूइनाचे १०५ आहे.

ॲनिलीन मूल्य किंवा मिश्रॲनिलीन मूल्य याचाही विद्रावकक्षमतेसाठी उपयोग करतात. या परीक्षेत ॲनिलीन व ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन यांचे समसमान घनफळ घेऊन ते तापविले असता पारदर्शक विद्राव मिळतो. नंतर तो सावकाश निववला तर ज्या तापमानाला विद्राव भुरकट दिसू लागतो, त्या तापमानाला ‘ॲनिलिनांक’ असे म्हणतात. ही त्याची विद्रावकक्षमता होय.

आठ ग्रॅम नायट्रोसेल्युलोज १०० मिली. क्रियाशील विद्रावकात विरघळवून त्याच्या एक घनफळाला मलिनता येण्यासाठी लागणाऱ्याहायड्रोकार्बनच्या कमाल घनफळ पटीला ‘विरलता प्रमाण’ असे म्हणतात. उदा., आठ ग्रॅम नायट्रोसेल्युलोज १०० मिलि. ब्युटिल ॲसिटेटामध्ये विरघळविले. या एक घनफळ विद्रावामध्ये २·७ पट घनफळ टोल्यूइन हा विरलकारक घातला असता मलिनता आली तर ब्युटिल ॲसिटेटाच्या बाबतीत टोल्यूइनाची सहनसीमा २·७ आहे. त्याच परिस्थितीत मिथिल ॲसिटेट वापरून १·४ पट घनफळ लागते. यावरून नायट्रोसेल्युलोजाकरिता ब्युटिल ॲसिटेट हे मिथिल ॲसिटेटापेक्षा जास्त प्रबल क्रियाशील विद्रावक आहे.


उपयोग: रासायनिक उद्योग, त्याच्याशी निगडीत उद्योग व वैज्ञानिक संशोधन यांत विद्रावक वापरतात. रंगलेप, लॅकर, व्हार्निशे, छपाईची शाई आणि इतर विविध प्रकारच्या पृष्ठभागावरील वैशिष्ट्यपूर्ण संरक्षक लेपांमध्ये विद्रावक सर्वाधिक वापरले जातात. रंगलेपनात रंजक विरल करण्यासाठी व रंगलेपाची श्यानता कुंचल्याने पृष्ठभागाला लावण्याइतपत होण्याकरिता विद्रावक वापरतात. रंगलेपनामध्ये सुघट्य मिश्रण द्रवरूप स्थितीत असताना ते पृष्ठभागावर पसरतात व शेवटी तेथे सुका स्तर (लेप) शिल्लक राहतो [⟶रंगलेप]. वस्त्रनिर्मिती उद्योगात रेयॉनासारखे कृत्रिम तंतू विद्रावातून कातले जातात. या उद्योगात विद्रावक परत मिळविले जातात. म्हणून तुलनात्मक दृष्टीने त्यांचा खर्च कमी असतो. सेल्युलोज ॲसिटेट रेयॉन तयार करण्याकरिता ॲसिटोन हा प्रमुख विद्रावक वापरतात. कमी उकळबिंदूचे विद्रावक असलेल्या सुधारित लॅकरांचा कापड व कातडी यांवर लेप देण्यासाठी वापर होतो.

विद्रावकांचा मोठ्या प्रमाणात वापर विविध धुलाई क्रियांसाठी करतात. निर्जल धुलाईत कपड्यावरील धूळ व शाई, ग्रीज इत्यादींचे डाग तर निघतील पण त्याचा तंतूवर किंवा रंगावर परिणाम होणार नाही, असे विद्रावक वापरावे लागतात. गॅसोलिनापेक्षा (पेट्रोलपेक्षा) उच्च उकळबिंदू असलेला व खनिज तेलापासून मिळविण्यात आलेला स्टोडार्ड विद्रावक पुष्कळ धुलाई क्रियांकरिता वापरता येतो परंतु तो ज्वालाग्रही असल्यामुळे यासाठी कार्बन टेट्राक्लोराइड व ट्रायक्लोरोएथिलीन यांसारखी कमी ज्वालाग्राही क्लोरीन गट असलेली हायड्रोकार्बने वापरली जातात. ट्रायक्लोरोएथिलीन आणि परक्लोरोएथिलीन यांचा वापर धातू व कातड्यावरील तेलकटपणा घालविण्यासाठी केला जातो. [⟶धुलाई].

रासायनिक विक्रियांचे माध्यम म्हणूनही काही विद्रावक किंवा त्यांच्यापासून बनविलेले पदार्थ वापरतात. योग्य विद्रावक निवडून विक्रियेतून मिळणाऱ्या पदार्थांचे उत्पादन वाढविता येते. तसेच विक्रियेचा ओघही बदलता येतो.

अन्नपदार्थ, औषधे, सौंदर्यप्रसाधने यांत वापरण्यात येणारे विद्रावक विषारी नसावेत तसेच त्यांना असह्य होईल असा स्वाद वा गंध असता कामा नये. म्हणून त्यांकरिता एथिल अल्कोहॉल (एथॅनॉल) हा विद्रावक मुख्यत्वे वापरला जातो. कधीकधी ग्लिसरीन आणि प्रॉपिलीन ग्लायकॉलेयांसारखी कमी बाष्पनशील पॉलिहायड्रिक अल्कोहॉलेसुद्धा यासाठी वापरतात. एथिल आणिॲमिल ॲसिटेटे यांना आल्हाददायक सुवास असल्यामुळे त्यांचा वापर कृत्रिम स्वाद आणि मधुर गंध आणणारा घटक पदार्थ म्हणून होतो.

आसंजके (चिकटविणारे पदार्थ) ही रंगलेपासारखीच असतात, फक्त त्यांत रेझीनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असतात. आसंजक पदार्थात रबर हे मुख्य द्रव्य असून त्यात हायड्रोकार्बन हा विद्रावक वापरतात. पॉलिव्हिनिल अमिल असिटेटव त्याचे अनुजात यांसाठी एस्टर आणि अल्कोहॉल हे विद्रावक असलेली काही आसंजके वापरतात. [⟶आसंजके].

निष्कर्षणासाठी विद्रावकाचा उपयोग करतात. जेव्हा विरघळलेले पदार्थ (विद्रुत) एका विद्रवकापेक्षा दुसऱ्या विद्रावकात जास्त विद्राव्य असतात आणि ते दोन्ही विद्रावक एकमेकांत विद्राव्य नसतात, तेव्हा पदार्थांच्या विद्राव्यतेचा फायदा घेऊन ते अलग करतात. यालाच निष्कर्षण पद्धत म्हणतात. या पद्धतीत नको असलेले पदार्थ विद्रावकाने काढून टाकता येतात व पाहिजे असलेले पदार्थ मिळविता येतात. उत्पन्न होणाऱ्या पदार्थाच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम न होता ऊर्ध्वपातनाद्वारे विद्रावक निष्कर्षित पदार्थापासून सहजपणे अलग करता येणे आवश्यक असते. या पद्धतीचा उद्योगांमध्ये मोठया प्रमाणात वापर होतो. खनिज तेल अनुजातांचा उपयोग सरकी किंवा सोयाबिनापासून तेलाचे व आल्फाआल्फा या वनस्पतीपासून हरितद्रव्याचे निष्कर्षण करण्यासाठी होतो. औषधी अल्कलॉइडांचे ईथराबरोबर व हॉर्मोनांचे ब्युटेनॉलाबरोबर निष्कर्षण करतात. मिथेनॉल विद्रावक अधिर स्थिर अम्लांनी खवट बनलेल्या मेदाम्लांचे निष्कर्षण करण्यासाठी वापरतात. तसेच गॅसोलिनामधील नको असलेली गंधकाची संयुगे काढून टाकण्यासाठी त्याचा वापर करतात. वनस्पती तेलांचे शुद्वीकरण करण्यासाठी ट्रायक्लोरोएथिलीन व इतर क्लोरिनी कृत विद्रावकांचा वापर करतात. ब्युटिल व ॲमिल ॲसिटेटे किण्वन (आंबविण्याच्या क्रियेसाठीच्या) विद्रावातून पेनिसिलिनाचे निष्कर्षण करण्यासाठी वापरतात.

अणुऊर्जेसाठी लागणाऱ्या युरेनियमातील अशुद्धी काढून टाकण्यासाठी विद्रावक निष्कर्षणाचा उपयोग होतो. त्यासाठी डायएथिल ईथर, ट्रायब्युटिल फॉस्फेट इ. विद्रावक वापरतात. प्लुटोनियम परत मिळविण्यासाठी अणुऊर्जानिर्मितीतील इंधनावर करण्यात येणारी फेरप्रक्रिया, तसेच अणुसंयोगातून निर्माण झालेले पुष्कळ इतर पदार्थ (उदा., विरल मृत्तिका धातू) अलग करण्यासाठी विद्रावक निष्कर्षण मोठया प्रमाणावर वापरतात. शिवाय झिर्कोनियम-हाफनियम व निओबियम-टॅटॅलम धातू वेगळे करण्याचे अवघड काम करण्यासाठीही हे तंत्र वापरतात.

सामान्य परिस्थितीत द्रवरूप विद्रावकांशिवाय काही द्रवीकृत वायूसुद्धा निष्कर्षण पद्धतीत वापरतात. द्रवीकृत प्रोपेन माशांच्या यकृत तेलामधून जीवनसत्त्वांचे निष्कर्षण करण्यासाठी वापरतात. याच विद्रावकाच्या साह्याने वंगण तेल साठ्यातील अस्फाल्ट काढून टाकले जाते. सल्फर डाय-ऑक्साइड आणि अमोनिया हे दोन द्रवीकृत वायूसुद्धा निष्कर्षणासाठी योग्य विद्रावक योग्य विद्रावक आहेत. [⟶निष्कर्षण].

सुरक्षितता : विद्रावकांपासून होऊ शकणारे धोके निश्चित कऱण्यासाठी व विद्रावक सुरक्षितपणे वापरण्यासाठी त्यांचे भौतिक व शरीर क्रियवैज्ञानिक गुणधर्म लक्षात घेतात. धोकादायक विद्रावकांची जहाजातून वाहतूक करणे, ते साठविणे, ते वापरण्यासाठी लागणारी सामग्री बनविणे इत्यादींचा सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करावा लागतो. याकरिता विद्रावकाचे प्रज्वलन तापमान, स्फोट होण्याची शक्यता इ. गोष्टी लक्षात घेतात. तोंडावाटे वा श्वसनातून विद्रावकाची वाफ शरीरात जाते तसेच त्वचा अथवा श्लेष्मल (बुळबुळीत) पटलातून विद्रावक किंवा त्याची वाफ शोषली जाते. काही विद्रावक अशा प्रकारे शरीरात गेल्यावर चयापचयात (शरीरात सतत चालणाऱ्याभौतिक व रासायनिक घडोमोडींत) समाविष्ट होतात तर काही जसेच्या तसे शरीराबाहेर टाकले जातात आणि काही विद्रावक (उदा., ॲनिलीन) विशिष्ट ऊतकांत शोषले जाऊन शरीरात साचत जातात. यामुळे अवयवाला किंवा तंत्राला हानी पोहोचू शकते. काही विद्रावकांची प्राण्यांना विषबाधक ठरू शकणारी मात्रा किती असेल ते लक्षात घ्यावे लागते. विद्रावकाच्या संपर्कात राहूनही त्याचा कामगारांच्या स्वास्थ्यावर हानिकारक परिणाम होणार नाही, हे पहावे लागते. आरोग्याच्या दृष्टीने घातक असणाऱ्याविद्रावकांचे हवेतील प्रमाण हे कायद्याने ठरवून दिलेल्या कमाल मर्यादेपेक्षा कमी राखण्यासाठी शोषण, पृष्ठशोषण व प्रशीतन या तंत्राचा वापर करतात. अशा प्रकारे विद्रावक परत मिळविताही येतात [⟶औद्योगिक अपशिष्ट]. रासायनिक विद्रावकांमुळे माणसामध्ये किंवा जनावरामध्ये कर्करोग उदभवू शकेल की काय, याविषयीची दक्षता घ्यावी लागते. 

पहा: अम्लराज अल्कोहॉल ॲसिटोन ईथर-१ कार्बन टेट्राक्लोराइड कार्बन डायसल्फाइड टर्पेटाइन बाष्पनशील तेले रंगलेप लॅकर विद्राव. 

संदर्भ:1. Lagowski, J. J., Ed., The Chemistry of Non-aqucous Solvents, Vols. 1-5, New York, 1966-1978.

         2. Riddick, J, A. Bunget, W. B. Organic Solvents, New York, 1970.

सुर्यवंशी, वि. ल.च कारेकर, न. वि.