फ्यूमेरिक अम्‍ल : एक कार्बनी अम्‍ल. हे मॅलेइक अम्‍लाचा समघटक [रेणुसूत्र तेच पण संरचना भिन्न असलेले संयुग ⟶ त्रिमितीय रसायनशास्‍त्र] असून दोन्हीअम्‍ले द्विक्षारकीय [रेणूमध्ये दोन मूलके—रासायनिक विक्रियेत कायम राहणारे पण स्वतंत्र अस्तित्वात नसलेले अणुगट-(-COOH) असलेली] व अतृप्त (दोन कार्बन अणूंमध्ये एकापेक्षा जास्त बंध, येथे द्विबंध असलेली) आहेत. फ्यूमेरिक अम्‍लाचे रासायनिक सूत्र C4H4O4 असून मॅलेइक अम्‍लाच्या या विपक्षरूप (अणुगट विरूद्ध दिशांना असलेल्या) समघटकाचे संरचना सूत्र खालीलप्रमाणे दर्शवितात.

फ्यूमेरिक अम्‍ल

पित्तपापडा (फ्यूमॅरिया ऑफिसिनॅलिस), अफूच्या कुलातील वनस्पती (ग्‍लाउसियम फ्‍लेव्हम) सारख्या काही वनस्पती, आइसलँड मॉस, शैवाक (दगडफूल), काही कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यविरहित सूक्ष्म वनस्पती) वगैरेंमध्ये फ्यूमेरिक अम्‍ल आढळते. १८३२ साली आर्‌. विंक्लर यांनी फ्यू. ऑफिसिनॅलिस या वनस्पतीपासून हे प्रथम तयार केले व त्याला ‘फ्यूमेरिक ॲसिड’ हे नावही दिले. मॅलेइक अम्‍ल १५०º से.ला तापवून, ब्रोमोसक्स‌िनिक अम्‍ल पाण्याबरोबर उकळून अथवा बेंझिनाचे उत्प्रेरकाच्या (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिचा वेग बदलणाऱ्या पदार्थाच्या) उपस्थितीत ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन] करून हे मिळते. तसेच फुरफुरालाचे सोडियम क्लोरेटाने ऑक्सिडीकरण केल्यासही फ्यूमेरिक अम्ल मिळते.

मॅलेइक अम्‍ल हायड्रोक्‍लोरिक अम्‍लाबरोबर अथवा सोडियम हायड्रॉक्साइडबरोबर उकळून, तसेच साखर मळीचे किण्वन करून (आंब‌विण्याची क्रिया करून) फ्यूमेरिक अम्‍लाचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन केले जाते व स्फटिकीकरणाने शुद्ध फ्यूमेरिक अम्‍ल मिळविण्यात येते.

फ्यूमेरिक अम्ल

फ्यूमेरिक अम्‍लाचे स्फटिक लोलकाकृती सुईसारखे असून ते रंगहीन अथवा पांढरे असतात. त्याला वास नसून त्याचे वि. गु. १·६५ असते. बंद नळीमध्ये त्याचा वितळबिंदू २८७º से. असून २००º से.ला. त्याचे संप्लवन होऊन (घन अवस्थेतून सरळ वायुरूप अवस्थेत बदल होऊन) मॅलेइक ॲनहायड्राइड व पाणी तयार होतात. ते पाण्यात व अल्कोहॉलमध्ये काही प्रमाणात विरघळते; मात्र बेंझीन व क्‍लोरोफॉर्म यांच्यात ते विरघळत नाही. ते विषारी नाही. त्याच्या अल्कली (अम्‍लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याचा गुणधर्म असलेल्या) विद्रावाच्या विद्युत् विच्छेदनाने (विजेच्या साहाय्याने रेणूचे तुकडे केल्याने) ॲसिटीलीन मिळते, तर त्याच्या क्षपणाने [⟶ क्षपण] सक्सिनिक अम्‍ल तयार होते.

औद्योगिकदृष्ट्या फ्यूमेरिक अम्‍ल मॅलेइक अम्‍लाएवढे महत्त्वाचे नाही, मात्र फ्यूमेरिक अम्‍ल निसर्गात आढळते व त्याच्यापासून मॅलेइक ॲनहायड्राइड तयार करता येत असल्याने फ्यूमेरिक अम्‍लाला महत्त्व आले आहे. लॅकर, व्हार्निश, एनॅमल इत्यादींच्या उत्पादनात लागणारी रेझिने तयार करण्यासाठी ते वापरतात [⟶ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके]. छपाईची शाई, रंगलेप इत्यादींच्या निर्मितीतही ते वापरतात. तसेच ते विषारी नसल्याने खाद्यपदार्थांमध्ये अम्‍लकारक म्हणून त्याचा उपयोग होतो (उदा., काही पेयांत टार्टारिक अम्‍लाऐवजी ते वापरतात). याची रेझिने, पॉलिएस्टरे व तंतुरूप काच यांचा वापर शीतकपाटे, मोटारी, जहाजे, फर्निचर इत्यादींमध्ये केला जातो.

पहा : मॅलेइक अम्‍ल.

देशपांडे, ज. र.