कोलोन वॉटर : (ओ-द-कोलान). एक सुवासिक द्रवरूप मिश्रण. योहान मारिया फारिना (१६८५–१७६६) या इटालियन गृहस्थांनी जर्मनीतील कोलोन या शहरी त्याचे उत्पादन प्रथम केले म्हणून त्यास कोलोन वॉटर असे नाव पडले. या सुवासिक द्रवाच्या शोधाचे श्रेय पॉल द फेमिनीस यांनाही देण्यात येते. फेमिनीस यांनी मिलान येथून हे मिश्रण बनविण्याचे पाठ आणले आणि मरतेसमयी आपला पुतण्या योहान फारिना याला सांगितले असे म्हणतात. कोलोन तसेच इटली येथे या सुवासिक द्रवाचे अद्यापही फारिना यांच्या नावाखाली उत्पादन करण्यात येते. १७६६ च्या सुमारास हा सुवासिक द्रव चांगलाच लोकप्रिय झाला होता. विशिष्ट फुले, मसाले, औषधे इत्यादींच्या अल्कोहॉलीय मिश्रणाचे ऊर्ध्वपातन करून (वाफ करून व मग ती थंड करून) नंतर त्यात लिंबू, बर्गामॉट, नेरोली, लव्हेंडर, रोजमेरी इत्यादींची तेले विशिष्ट प्रमाणात मिसळून कोलोन वॉटर तयार करण्यात येत असे. कृत्रिम रीतीने तयार केलेल्या काही प्रकारच्या कोलोन वॉटरांचा सुवास मूळ द्रवाच्या सुवासापेक्षाही चांगला असल्याचे आढळले आहे. अलीकडे ३ ते ५ टक्के विशिष्ट सुवासिक तेले, ती विरघळण्याइतके अल्कोहॉल आणि सौम्य करण्यासाठी सु. १५ टक्के गुलाब पाणी घातलेले कोलोन वॉटर बाजारात विकले जाते. ही द्रव्ये पाण्यात मिसळलेली असल्यामुळे व पाण्याची या द्रव्यांवर विक्रिया होत असल्यामुळे तयार केलेल्या कोलोन वॉटराची टिकण्याची मर्यादा नियमित असते. विविध द्रव्यांचे प्रमाण मात्र अनुभवानेच ठरविले जाते. उत्पादनात वापरलेल्या अल्कोहॉलाच्या दर्जावर अंतिम द्रवाचा सुवास बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतो. कोलोन वॉटरमध्ये भिजविलेल्या कापडाच्या घड्या ताप कमी करण्यासाठी कपाळावर ठेवतात.

पहा : सुवासिक द्रव्ये, सौंदर्यप्रसाधने.

मिठारी, भू.‍ चिं.