निओबियम : एक धातुरूप मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Nb अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ४१ अणुभार ९२·९०६ ⇨ आवर्त सारणीतील (इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील) ५ अ गटातील मूलद्रव्य वितळबिंदू २,४६८° से. उकळबिंदू ४,९२७° से., २०° से.ला घनता ८·६ ग्रॅ./घ. सेंमी. स्थिर समस्थानिकाचा (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकाराचा) अणुभार ९३, किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) समस्थानिकांचे अणुभार ८९, ९०, ९१, ९२, ९४, ९५, ९६, ९७, ९८, ९९, १००, १०१ विद्युत विन्यास (इलेक्ट्रॉनांची अणूतील मांडणी) २, ८, १८, १२, १. संयुजा (इतर अणुंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) १, २, ३, ४, ५ भूकवचातील प्रमाण २·४ X १०-३%.

इतिहास : कोलंबाइट या खनिजापासून १८०१ मध्ये चार्ल्स हॅचेट यांनी एक नवीन मूलद्रव्य शोधून काढले व त्यास कोलंबियम (रासायनिक चिन्ह Cb) हे नाव दिले. १८०२ मध्ये ए. जी. एकबर्ग यांनी स्वीडन- फिनलंडमधील कोलंबाइटाप्रमाणे दिसणाऱ्या खनिजातून दुसरे एक नवीन मूलद्रव्य शोधून काढले व त्याला टँटलम हे नाव दिले. ही दोन्ही मूलद्रव्ये एकच असावीत असे डब्ल्यू. एच्. वुलस्टन यांना वाटले. हाइन्रिख रोझ यांनी संशोधन करून ती दोन मूलद्रव्ये आहेत हे १८४४ मध्ये सिद्ध केले व कोलंबियमाला निओबियम हे निओबी या ग्रीक देवतेच्या (टँटॅलसच्या मुलीच्या) नावावरून दिले. इंटरनॅशनल युनिअन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री या संस्थेच्या संज्ञा समितीने १९५१ मध्ये या मूलद्रव्याच्या निओबियम या नावाल संमती दिली आणि तेच नाव आता रूढ झाले आहे. पूर्वी अमेरिकेत त्याला कोलंबियम असे संबोधित पण १९५१ नंतर अमेरिकेतही निओबियम हे नाव वापरले जाऊ लागले. तथापि अमेरिकेतील धातु-उद्योगात मात्र अद्यापि कोलंबियम हेच नाव वापरले जाते.

आढळ : निसर्गात निओबियम हे कोलंबाइट खनिजात सापडते [⟶ कोलंबाइट-टँटॅलाइट] तसेच जास्त प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या पण निओबियमाचे प्रमाण कमी असणाऱ्या पायरोक्लोर (NaCaNb2O6) या खनिजातही ते सापडते. आफ्रिका, ब्राझील, कॅनडा व नॉर्वे येथे हे खनिज मुख्यत्वे आढळते.

निर्मिती : खनिजांपासून निओबियम मिळविताना ते टँटॅलमापासून वेगळे करणे कठीण असते. व्यापारी पद्धतीने हे अलगीकरण करण्यासाठी विद्रावक निष्कर्षण पद्धत (योग्य अशा विद्रावकात म्हणजे विरघळविणाऱ्या द्रवात विरघळवून मिश्रणातील घटक द्रव्ये वेगळी करण्याची पद्धत) वापरतात. याकरिता हायड्रोफ्ल्युओरिक अम्ल आणि सल्फ्यूरिक अम्ल यांच्या मिश्रणात केलेल्या धातुविद्रावात मिथिल आयसोब्युटील कीटोनासारखा कार्बनी विद्रावक वापरतात. (अधिक माहितीसाठी ‘टँटॅलम’ ही नोंद पहावी.) फेरोनिओबियमाचे क्लोरिनीकरण (संयुगात क्लोरिनाचा समावेश करण्याची क्रिया) करून मिळणाऱ्या क्लोराइडाचे भागश: ऊर्ध्वपातन [⟶ उर्ध्वपातन] करूनही निओबियम टँटॅलम यांचे अलगीकरण करण्यात येते. शुद्ध केलेल्या संयुगांचे ⇨ क्षपण करून धातू मिळविण्यासाठी निर्वातात ऑक्साइडाचे कार्बनाने वा निओबियम कार्बाइडाने क्षपण करणे, क्लोराइडाचे हायड्रोजनाने व मॅग्नेशियमाने क्षपण करणे इ. पद्धती वापरतात. अधिक शुद्ध व सांद्रित (एकत्रित) स्वरूपात निओबियम धातू मिळविण्यासाठी इलेक्ट्रॉन शलाकेने वा निर्वात विद्युत् प्रज्योतीने वितळविण्याच्या पद्धतीखेरीज धातुचूर्णाचे निर्वातात तापपिंडन करण्याची (भाजून सांद्रित करण्याची) पद्धतही वापरतात.

गुणधर्म : शुद्ध धातू पोलादासारखी दिसते. तिला चकाकी आणल्यास फ्लॅटिनमासारखी पांढरी दिसते. शुद्ध धातू मऊ व तन्य (तार काढण्यायोग्य) असते. ही धातू उत्तम गंजरोधी असली, तरी ४००° से.च्या वरील तापमानास ⇨ ऑक्सिडीभवन होऊ नये म्हणून उच्च तापमानाला दीर्घकाळ वापरताना तिला संरक्षण देणे (मिश्रधातूच्या रूपात वापरणे, संरक्षक मुलामा देणे इ.) आवश्यक असते. ती लोंखडाशी पूर्णत: मिसळते. वितळजोडकामात (वेल्डिंगमध्ये) व उष्णतेला टिकण्यासाठी काही अंगज (स्टेनलेस) पोलादात फेरोनिओबियमाच्या स्वरूपात मिसळतात. तसेच इतर धातूंबरोबर तिच्या मिश्रधातू तयार करतात. हायड्रोफ्युओरिक अम्ल वगळता इतर अम्लांचा तिच्यावर परिणाम होत नाही. कारण तिच्या पृष्ठभागावर तयार होणाऱ्या ऑक्साइडाच्या थरामुळे पुढील क्रिया थांबविली जाते. ऑक्सिजनाबरोबर तापविल्यास ऑक्साइड व हॅलोजनाबरोबर तापविल्यास हॅलाइडे तयार होतात, तर कार्बनाबरोबर तिची कार्बाइडे तयार होतात.

निओबियमापासून बरीच संयुगे तयार करण्यात आली आहेत, पण ती फारशी उपयुक्त नाहीत.

अभिज्ञान : संहत (जास्त प्रमाण असलेले) सल्फ्यूरिक अम्ल व फॉस्फोरिक अम्ल यांच्यातील नमुन्याच्या विद्रावात ३०% हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळल्यास पेरॉक्सिनिओबेट रंग आल्यास नमुन्यात ९०% वा त्याहून जास्त निओबियम आहे हे ओळखता येते. या परिस्थतीत पेरॉक्सिटँटॅलेट रंग येत नाही.

उपयोग : निओबियमाच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे तिच्या मिश्रधातू बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातात. औष्णिक न्यूट्रॉनांना नीच रोध, युरेनियमाबरोबर वापरण्याची सुलभता, सामर्थ्य, गंजरोधकता इ. गुणधर्मांमुळे निओबियमाच्या काही मिश्रधातू अणुभट्टीत वापरतात. अणूऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीत युरेनियन इंधन घटकांना वेष्टन म्हणून निओबियमाच्या मिश्रधातू सुरुवातीच्या काळात वापरीत असत. केवळ ५% निओबियम कार्बनयुक्त पोलादात मिसळल्यास त्याचे इष्ट गुणधर्म सुधारता येतात. इंधन वायू वाहून नेणारे शेकडो किमी.चे नळ निओबियमयुक्त पोलादाचे करतात. निओबियम-झिर्कोनियम व निओबियम-कथिल या मिश्रधातू अतिसंवाहक (अतिनीच तापमानाला विद्युत् प्रवाह वाहण्याला जवळजवळ अजिबात रोध न होणाऱ्या) असल्यामुळे तसेच त्यांची घडाई सुलभतेने करता येत असल्याने कमी विद्युत‌् दाबावर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनीय उपकरणांतील चुंबकीय वेटोळी तयार करण्यासाठी लागणाऱ्या बारीक तारेकरिता या मिश्रधातू उपयुक्त आहेत. टँटॅलम वा टंगस्टन कार्बाइड मिसळलेल्या निओबियम कार्बाइडापासून उच्च तापमानाला वापरण्यात येणारी सेरमेटे (दाब देऊन व तापपिंडन करून तयार करण्यात येणारी उष्णता-रोधी व टिकाऊ मिश्रधातू) तयार करतात.

  

मिठारी, भू. चिं.