डोरोथी मेरी क्रोफूट हॉजकिन

हॉजकिन, डोरोथी मेरी क्रोफूट : (१२ मे१९१०–२९ जुलै १९९४). इंग्रज महिला रसायनशास्त्रज्ञ व स्फटिकवैज्ञानिक. काही महत्त्वाच्या जीवरासायनिक पदार्थांच्या – विशेषत: १२ (कोबालामीन सायनोकोबालामीन) या जीवनसत्त्वाची – रासायनिक संरचना क्ष-किरण तंत्राद्वारे निश्चित केल्याबद्दल त्यांना १९६४ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

हॉजकिन यांचा जन्म कैरो (ईजिप्त) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सर जॉन लेमन स्कूल, बेकल्झ (इंग्लंड) आणि महाविद्यालयीन शिक्षण समरव्हिल कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाची रसायनशास्त्रातील बी.एस्. (१९३१) व एम्.एस्. (१९३२) आणि केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. (१९३७) या पदव्या संपादन केल्या. समरव्हिल कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी स्फटिकविज्ञान विषयाच्या संशोधनास सुरुवात केली होती. त्यांनी जे. डी. बर्नाल या सहकाऱ्यासोबत पेप्सीन प्रथिनाचे पहिले क्ष-किरण विवर्तन छायाचित्र घेतले (१९३३) आणि नंतर स्टेरॉलांसंबंधी अध्ययन केले. १९३७ मध्ये त्यांचा विवाह टॉमस हॉजकिन यांच्याशी झाला आणि कुमारी क्रोफूट या सौ. हॉजकिन झाल्या. त्यांनी समरव्हिल कॉलेजमध्ये शिक्षिका (१९३६–४६), रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका (१९४६–५६) आणि नंतर रसायन-स्फटिकविज्ञान या विषयाच्या प्राध्यापिका (१९५६–६०) म्हणून काम केले. त्या रॉयल सोसायटीच्या वुल्फसन संशोधन प्राध्यापिका (१९६०–७७), ब्रिस्टल विद्यापीठाच्या कुलपती (१९७०–८८), ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वुल्फसन कॉलेजच्या फेलो (१९७७–८२) होत्या. तसेच त्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या गुणश्री प्राध्यापिकाही होत्या.

हॉजकिन यांनी पेनिसिलिनाच्या संरचना विश्लेषणावर संशोधन केले (१९४२–४९). त्यांनी १९४८ मध्ये त्यांच्या सहकाऱ्यांसोबत अत्यंत जटिल व प्रथिन नसलेल्या १२ जीवनसत्त्व संयुगाचे पहिले क्ष-किरण छायाचित्र घेतले आणि त्याची आणवीय रचना ठरविली. १२ जीवनसत्त्वाच्या रेणूत केंद्रस्थानी कोबाल्ट (Co) हे मूलद्रव्य व त्याला जोडलेला सायनाइड (–CN) हा गट असतो आणि त्याचे रेणुसूत्र C63H88CoN14O14P असून कोबाल्टाचा अणू संतृप्त कार्बन अणूला जोडलेला असतो, हे त्यांनी क्ष-किरण तंत्राद्वारे दाखविले. रक्तातील तांबड्या कोशिकानिर्मितीसाठी आणि मारक पांडुरोगावरील उपचारात आवश्यक ठरलेले १२ जीवनसत्त्व हे एक महत्त्वाचे जीवरासायनिक संयुग आहे, हेही त्यांनी सिद्ध केले. पित्ताशयात हे जीवनसत्त्व आढळते. तसेच स्ट्रेप्टोमायसीन बनविणाऱ्या सूक्ष्मजंतूच्या (स्ट्रेप्टोमायसीस ग्रायसीयस) साहाय्याने हे जीवनसत्त्व संश्लेषित करता येते [→ जीवनसत्त्व १२]. त्यांनी मधुमेहावर उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या इन्शुलिनाचे विश्लेषण करून त्याची रेणवीय त्रिमितीय संरचना निश्चित केली (१९६९).

हॉजकिन यांना पुढीलप्रमाणे अनेक मानसन्मान मिळाले : रॉयल पदक (१९५६), ऑर्डर ऑफ मेरीटचा बहुमान (१९६५), कॉप्ली पदक (१९७६), म्यिखईल लमनॉसॉव्ह सुवर्णपदक (१९८२) इ. पदके रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे लाँगस्टाफ पारितोषिक (१९७८), बल्गेरियाचे डिमीट्रॉफ पारितोषिक (१९८४), लेनिन शांतता पारितोषिक (१९८७) इ. पारितोषिके. तसेच त्या अनेक परदेशी संस्थांच्या सभासदही होत्या.

हॉजकिन यांचे वॉरिकशर (इंग्लंड) येथे निधन झाले.

मगर, सुरेखा अ.; खोब्रागडे, स्नेहा दिलीप