सँगर, फ्रेडरिक  : ( १३ ऑगस्ट, १९४८–). इंग्रज जीवरसायनशास्त्रज्ञ.⇨ इन्शुलीन रेणूची संरचना व या प्रथिनामधील ॲमिनो अम्लांचा क्रम निश्चित केल्याबद्दल त्यांना १९५८ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. तसेच मध्ये सँगर यांनी लहान व्हायरसामधील डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाच्या( डीएनए) रेणूतील न्यूक्लिओटाइडांचा क्रम निश्चितकेल्याबद्दल त्यांना⇨ पॉल बर्ग आणि वॉल्टर गिल्बर्ट यांच्यासमवेत १९८० सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. सँगर हे दोन वेळा नोबेल पारितोषिक मिळविणारे चौथे विजेते व रसायनशास्त्रात दोन वेळा नोबेल पारितोषिक मिळविणारे एकमेव शास्त्रज्ञ आहेत.

सँगर यांचा जन्म रेंडकोंब( ग्लॉस्टरशर) येथे झाला. त्यांचे शिक्षण सेंट जॉन्स कॉलेज, केंबिज येथे झाले. तेथे त्यांनी निसर्गविज्ञान या विषयातील बी.ए. पदवी १९३९ मध्ये मिळविली. लायसीन या ॲमिनो अम्लाच्या चयापचयासंबंधी( शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक प्रकियांसंबंधी) अन्वेषण केल्यानंतर त्यांना १९४३ मध्ये जीवरसायनशास्त्राची पीएच्.डी.पदवी मिळाली. ते युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज येथे बाइट मेमोरियल फेलो होते( १९४४- ५१). नंतर ते मेडिकल रिसर्च कौन्सिलच्या संशोधकांच्या संघात सहभागी झाले व एम्.आर्.सी.लॅबोरेटरी फॉर बायॉलॉजीमधील डिव्हिजन ऑफ प्रोटीन केमिस्ट्री चे विभागप्रमुख झाले ( १९५१).

सर्व प्रथिने ॲमिनो अम्लांपासून तयार झालेले जटिल रेणू आहेत, असे⇨ एमिल हेरमान फिशर यांनी प्रयोगाने सिद्घ करून दाखविले होते. एंझाइमे, व्हायरस, प्रतिपिंडे, विषे आणि इन्शुलिनासारखी काही हॉर्मोने या रासायनिक द्रव्यांचा समावेश प्रथिनांमध्ये होत असून त्यांमध्ये सु.२० ॲमिनो अम्ले तीच असतात. त्यामुळे जैव प्रकियेमधील प्रथिनांचीक्रि याशीलता समजण्याकरिता ॲमिनो अम्लांच्या मांडणीचे ज्ञान अत्यावश्यक असते. सँगर यांना गोवंशोत्पन्न( बोव्हाइन) इन्शुलिनाच्या संरचनेच्या मांडणीचे संशोधन करण्यास व स्पष्टीकरण मिळविण्यास दहा वर्षे लागली. १९५५ मध्ये त्यांनी इन्शुलीन रेणूतील सर्व ॲमिनो अम्लांचा सम्यकक्रम दोन वा अधिक प्रथिन-अपघटकी एंझाइमांचा वापर करून ठरविला. या कार्यामुळे इन्शुलिनाचे प्रयोगशाळेत संश्लेषण करणे शक्य झाले. सँगर यांनी प्रथिनांमध्ये जोडलेल्या ॲमिनो अम्लांचा क्रम ठरविण्याकरिता विकसित केलेल्या प्रयोगशालेय तंत्रामुळे इतर पुष्कळ जटिल प्रथिनांची संरचना ठरविणे सोपे झाले.

प्रथिनांसंबंधीच्या संशोधनानंतर सँगर यांनी⇨ न्यूक्लिइक अम्लाच्या संरचनेसंबंधी अध्ययन करण्याकडे लक्ष वळविले. त्यांना रिबोन्यूक्लिइक अम्ल( आरएनए) आणि डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल यांमधील न्यूक्लिओटाइडांचा क्रम ठरविण्याच्या पद्घती शोधून काढण्यात विशेष रस होता. त्यांनी किरणोत्सर्गी चिन्ह असलेल्या‘ आरएनए’चे निम्नीकरण उत्पाद वेगळे करणाऱ्या तंत्राचा विकास केला. त्यामुळे आरएनए रेणूतील न्यूक्लिओटाइडांचा क्रम ठरविणे सोपे झाले( उदा., ५ एस रिबोसोमल आरएनए आणि आर १७ सूक्ष्मजंतू व्हायरसाचे आरएनए). नंतर त्यांनी⇨ जीन( जनुक) तयार करणारे रासायनिक द्रव्य डीएनए याचा क्रम ठरविणाऱ्या जलद व साध्या पद्घतींचा विकास केला(१९७५). या पद्घतीला डायडीऑक्सिटर्मिनेशन मेथड किंवा सँगर मेथड असेही नाव आहे. त्यांनी F X 174 या सूक्ष्मजंतुभक्षी व्हायरसामधील डीएनएच्या५३८६ – न्यूक्लिओटाइड क्रमाचा शोध लावला.

सँगर यांची १९५४ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. १९७९ मध्ये त्यांना पॉल बर्ग व वॉल्टर गिल्बर्ट यांच्याबरोबर कोलंबिया विद्यापीठाचा‘ लुसिया ग्रॉ स हॉर्विच’ पुरस्कार मिळाला. १९८१ मध्ये त्यांना कंपॅनिअन ऑफ ऑनर असे संबोधण्यातआले. १९८६ मध्ये ते‘ ऑर्डर ऑफ मेरिट’ चे मानकरी झाले.

सूर्यवंशी, वि. ल.