अँथ्रॅसीन

अँथ्रॅसीन : कार्बनी संयुग. त्रिवलयी (कार्बन व इतर अणूंनी तयार झालेल्या शृंखलेची मोकळी टोके एकमेकांस जोडल्यामुळे बनलेल्या तीन वलयी रचना असलेल्या) ॲरोमॉटिक हायड्रोकार्बन [→ ॲरोमॅटिक संयुगे]. सूत्र C14H10. वर्णहीन, स्फटिकी पदार्थ. पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे) अल्कोहॉलात व ईथरात किंचित विद्राव्य पण उष्ण बेंझिनामध्ये विद्राव्य. शुद्ध अँथ्रॅसिनाच्या अंगी निळसर अनुस्फुरणाचा (विशिष्ट तरंगलांबीचे प्रारण शोषून नंतर ते अधिक तरंगलांबीच्या प्रकाशाच्या रूपात बाहेर टाकण्याचा) गुण असतो. द्रवांक (वितळबिंदू) २१६से., क्वथनांक (उकळबिंदू) ३४० से. अँथ्रॅसिनाच्या ऑक्सिडीकरणाने [→ऑक्सिडीभवन] अँथ्रेक्विनोन व संहत (जास्त प्रमाणात असलेल्या) सल्फ्यूरिक अम्‍लाच्या विक्रियेने अनेक अँथ्रेसीन-सल्फॉनिक अम्‍ले तयार होतात. अँथ्रॅसिनाची रासायनिक संरचना खाली दाखविल्याप्रमाणे आहे :

दगडी कोळशापासून मिळणाऱ्या डांबराचे ३००ते ५००से. तापमानास ऊर्ध्वपातन करून (तापवून व बाष्परूप पदार्थ थंड झाल्यावर गोळा करून) मिळालेल्या अंशात ५ ते १०% अँथ्रॅसीन असते. ते एखाद्या विद्रावकात विरघळवून नंतर स्फटिकीकरणाने मिळविले जाते. अँथ्रॅसिनाचा अँथ्रॅक्विनोन हा अनुजात (एका संयुगापासून मिळविलेले दुसरे संयुग) रंगद्रव्ये बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जात होता, पण बेंझिनाच्या अनुजातांपासून संश्लेषणाने (घटक अणू वा रेणू एकत्र आणून त्यापासून पदार्थ बनवून) अँथ्रॅक्विनोन तयार करण्याच्या कृतीचा शोध लागल्यापासून अँथ्रॅसिनाला व्यापारी महत्त्व राहिलेले नाही.

मिठारी, भू. चिं.