व्हिर्टानेन, आर्टुरी इल्मारी : (१५ जानेवारी १८९५–११ नव्हेंबर १९७३). फिनिश जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी केलेल्या अन्वेषणामुळे प्रथिनाचे प्रमाण भरपूर असलेल्या हिरव्या चाऱ्याचे उत्पादन व साठा करण्यामध्ये सुधारणा झाली. दीर्घ काळ तीव्र हिवाळा असलेल्या प्रदेशांत चारा साठविण्यासाठी त्यांची एआयव्ही पद्धती (त्यांच्याच नावाच्या आद्याक्षरांवरून केलेले नाव) उपयुक्त ठरली. या कार्याबद्दल त्यांना १९४५ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

व्हिर्टानेन यांचा जन्म हेलसिंकी (फिनलंड) येथे झाला. ते हेलसिंकी विद्यापीठाचे एम्. एस्सी. आणि पीएच्. डी. होते. त्यांनी झुरिक येथे भौतिकीय रसायनशास्त्र (१९२०), स्टॉकहोम येथे सूक्ष्मजंतुविज्ञान (१९२१) आणि एंझाइमविज्ञान (१९२३-२४) या विषयांत संशोधन केले. ते फिनिश को-ऑपरेटिव्ह डेअरिज असोसिएशनच्या प्रयोगशाळांचे संचालक (१९२१ – ३१) आणि हेलसिंकी येथील फिनलंड्स बायोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक (१९३१ – ७३) होते. ते हेलसिंकी विद्यापीठात रसायनशास्त्राचे निदेशक (१९२४ – ३९) आणि जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक (१९३९ – ४८) होते.

इ. स. १९२४ मध्ये व्हिर्टानेन यांनी लॅक्टिक व प्रोपिऑनिक किण्वनामध्ये (आंबण्याच्या क्रियांमध्ये) को-झायमेजची आवश्यकता असल्याचे दाखविले. वनस्पति-कोशिकांमधील पुष्कळशी प्रथिने एंझाइमे [सजीव कोशिकांमध्ये रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी संयुगे → एंझाइमे] असतात, असे त्यांनी सांगितले. १९२५मध्ये त्यांनी शिंबावंत (शेंबा येणाऱ्या) वनस्पतींच्या मुळांवरील गाठींमध्ये होणाऱ्या नायट्रोजनयुक्त पदार्थांच्या निर्मितीचे अन्वेषण करण्यास सुरुवात केली. या वनस्पतींचा साठा दीर्घ काळ केल्यास पुष्कळसे नायट्रोजनयुक्त द्रव्य नाहीसे होते, हे त्यांच्या लक्षात आले. साठविलेल्या वनस्पती खराब करणाऱ्या किण्वन प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला व ताज्या चाऱ्याची गुणवत्ता टिकवून ठेवणाऱ्या पद्धतींचे अध्ययन केले. किण्वणातून निर्माण होणाऱ्या लॅक्टिक अम्लामुळे चाऱ्याची अम्लता वाढते व ही अम्लता विशिष्ट मऱ्यादेपर्यंत वाढल्यास विनाशकारी किण्वन थांबते, असे त्यांना दिसून आले.

व्हिर्टानेट यांच्या एआयव्ही या पद्धतीमध्ये नव्याने साठविलेल्या चाऱ्यावर विरल हायड्रोक्लोरिक व सल्फ्यूरिक अम्लांच्या विशिष्ट मिश्रणाची अशा प्रकारे क्रिया केली जाते की, ⇨ मुरघासाला ठरावीक मऱ्यादेपेक्षा अधिक अम्लता प्राप्त होते व त्याचे विघटन थांबते. या क्रियेमुळे चाऱ्यामधील जवळजवळ सर्व प्रथिने, कॅरिटिने आणि जीवनसत्त्व ही दीर्घ काळ टिकतात. अम्लांचा वापर केल्यामुळे चाऱ्याच्या पोषणमूल्यावर, खाण्याच्या योग्यतेत आणि तो चारा खाऊ घातलेल्या जनावरांच्या दुधापासून बनविलेल्या पदार्थांमध्ये काहीही दुष्परिणाम होत नसल्याचे त्यांनी १९२८-२९ दरम्यान अनेक प्रयोग करून दाखविले.

व्हिर्टानेन यांच्या निरीक्षणानुसार शिंबावंत वनस्पतींच्या मुळांमध्ये असलेल्या सूक्ष्मजंतूंच्या साहाय्याने नायट्रोजनयुक्त संयुगांचे संश्लेषण (निर्मिती) होण्याकरिता हीमोग्लोबिनसारख्या लाल रंगद्रव्याची आवश्यकता असते. त्यांनी जीवनसत्त्वांच्या रासायनिक संघटनांचे अध्ययन केले आणि अनेक नवीन संयुगे वेगळी काढली त्यांपैकी काही पोषणदृष्ट्या महत्त्वाची होती. यांशिवाय लोणी सुरक्षितपणे साठविण्याच्या सुधारित पद्धती, तसेच अंशतः संश्लेषित अशी स्वस्त पशुखाद्ये यांवरही त्यांनी संशोधन केले.

नोबेल पारितोषिकाखेरीज व्हिर्टानेन यांना अनेक सन्माननीय पदव्या आणि पदके मिळाली. त्यांचे एआयव्ही सिस्टिम ॲज द बेसिस ऑफ कॅटल फीडिंग (इं.शी. १९४३)हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

 हेलसिंकी येथे त्यांचे निधन झाले.    

                        सूर्यवंशी, वि. ल.