थायमॉल: एक कार्बनी संयुग. रेणुसूत्र (रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांची संख्या दाखविणारे सूत्र) C10H14O. १–मिथिल–३–हायड्रॉक्सि–४–आयसोप्रोपिल बेंझीन, आयसोप्रोपिल–मेटा क्रेसॉल, थायमिक अम्‍ल, थायिम कापूर, ओव्याचे फूल इ. नावांनीही थायमॉल ओळखले जाते. ओवा (ट्रॅकिस्पर्मम ॲम्मी), रानतुळस (ऑसिमम ग्रॅटिसिमम), थायमस व्हल्गॅरिस इ. वनस्पतींच्या बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) तेलांत थायमॉल मिळते. हे तेल व सजल सोडियम हायड्रॉक्साइड यांचे मिश्रण हलविल्यास थायमॉलाचा सोडियम अनुजात (एका संयुगापासून बनविलेले दुसरे संयुग) तयार होतो. त्याची अम्‍लाशी विक्रिया होऊन थायमॉलाचा साका तयार होतो. या साक्यापासून अल्कोहॉल किंवा ईथर यांच्या साहाय्याने थायमॉलाचे स्फटिक मिळवितात.

मेटा क्रेसॉलावर आयसोप्रोपिल क्लोराइड, आयसोप्रोपिल अल्कोहॉल अथवा प्रोपिलीन याची विक्रिया करून थायमॉलाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येते. तसेच डायब्रोमोमेंथॉनामधून हायड्रोजन ब्रोमाइड काढून टाकून थायमॉल तयार करण्यात येते.

थायमॉल वर्णहीन स्फटिक असून त्याला ओव्यासारखा वास व चव असते. त्याचा वितळबिंदू ५१° से. व उकळबिंदू २३२° से. असून त्याचे वि. गु. ०·९७९ आहे. ते अल्कोहॉल, कार्बन डायसल्फाइड, क्लोरोफॉर्म, ईथर, ग्‍लेशियल ॲसिटिक अम्‍ल, स्थिर वा बाष्पनशील तेले यांत विरघळणारे असून ग्‍लिसरॉल व पाणी यांत अल्प प्रमाणात विरघळते. फॉस्फरस पेंटॉक्साइडाच्या विक्रियेने थायमॉलापासून प्रोपिलीन वायू व एस्टर मिळते. एस्टराचे क्षारकीय (अम्‍लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणारा पदार्थ बेसिक) जलीय विच्छेदन (पाण्याच्या साहाय्याने पदार्थाचे तुकडे करण्याची क्रिया) केल्यास मेटा क्रेसॉल मिळते. थायमॉल, निर्जल ईथर व झिंक सायनाइड यांच्या मिश्रणातून हायड्रोजन वायू नेल्यास पॅरा थायमॉल आल्डिहाइड तयार होते. थायमॉल व पोटॅशियम आयोडाइड यांच्या क्षारीय (अल्कलाइन) मिश्रणापासून थायमॉल आयोडाइड मिळते.

मेटा क्रेसॉल आयसोप्रोपिल अल्कोहॉल थायमॉल

जंतुनाशक म्हणून अनेक औषधांत, सुगंधी द्रव्यांत, दातांतील फटी भरण्याच्या मिश्रणात, परिरक्षक म्हणून इ. उपायोगांसाठी थायमॉलाचा व त्याच्या अनुजातांचा उपयोग करतात.

संदर्भ: Rodd, E. H. Chemistry of Carbon Compounds, Vol. III, New York, 1954.

पटवर्धन, सरिता अ.