अमाइने : अमोनियाच्या (NH3)एक, दोन किंवा तिन्ही हायड्रोजन अणूंच्या जागी एकसंयुजी हायड्रोकार्बन मूलकांची [®मूलके संयुजा] प्रतिष्ठापना करून अमोनियापासून मिळणाऱ्या .कार्बनी संयुगांचा एक गट. अमोनियातील एका अणूचे प्रतिष्ठापन केल्यास प्राथमिक अमाइने, दोन अणूंचे प्रतिष्ठापन केल्यास व्दितीयक अमाइने व तिन्ही अणूंचे प्रतिष्ठापन केल्यास तृतीयक अमाइने मिळतात. उदा., एथिल अमाइन (प्राथमिक अमाइन, C2H5NH2), डायएथिल अमाइन

ॲलिफॅटिक [®ॲलिफॅटिक संयुगे], ॲलिसायक्लिक [®ॲलिसायक्लिक संयुगे], ॲरोमॅटिक [® ॲरोमॅटिक संयुगे], विषमवलयी [®विषमवलयी  संयुगे] किंवा मिश्र प्रकारांचा असतो. काही वेळा एकाच किंवा भिन्न प्रकारांच्या एकाहून अधिक मूलकांची प्रतिष्ठापना करण्यात येते. अमोनियातील हायड्रोजनांच्या जागी एकाच प्रकाराच्या मूलकांची प्रतिष्ठापना केल्यास मिळणाऱ्या द्वितीयक व तृतीयक अमाइनांना साधी अमाइने असे म्हणतात. भिन्न प्रकारांचे मूलक असल्यास मिळणाऱ्या अमाइनांना मिश्र अमाइने असे म्हणतात. अमोनियाच्या दोन हायड्रोजन अणूंचे प्रतिष्ठापन द्विसंयुजी हायड्रोकार्बन मूलकांनी केल्यास मिळणाऱ्या संयुगांना इमाइने असे म्हणतात. ही संयुगे अमाइनांहून वेगळ्या प्रकाराची असतात, तसेच तीन हायड्रोजन अणूंचे प्रतिष्ठापन त्रिसंयुजी हायड्रोकार्बन मूलकांनी केल्यास सायनाइडे वा नायट्राइले ह्या प्रकारांची संयुगे मिळतात. ज्या संयुगांमधील नायट्रोजन अणू हा वलयी संयुगाचाच एक घटक असतो, अशा संयुगांनाही अमाइने म्हटले जाते. परंतु सामान्यतः त्यांचा समावेश विषमवलयी संयुगांमध्ये करतात.

सामान्यतः अमाइनांची अम्‍लांबरोबर विक्रिया होऊन लवणे मिळतात. हा गुणधर्म अमाइनांमध्ये कमीजास्त प्रमाणात आढळतो. तसेच अमाइनांपासून समन्वयी संयुगे [®रासायनिक संयुगे] मिळतात. हायड्रोक्लोरिक अम्‍ल, सल्फ्यूरिक अम्‍ल ह्यांसारख्या अकार्बनी अम्‍लांमुळे अमाइनांपासून स्फटिकी लवणे मिळतात.

अम्‍लांशी विक्रिया होऊन लवणे तयार होण्याच्या अमाइनांच्या गुणधर्मामुळे, गंजनिरोधक म्हणून सजल विद्रावांमध्ये त्यांचा उपयोग करण्यात येतो. हायड्रोजन सल्फाइड, कार्बन डाय-ऑक्साइड ह्यांसारखे वायू इतर वायूंपासून वेगळे करण्यासाठी, तसेच विविध प्रकारांची ðपायसे बनविण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. काही रसायनांच्या निर्मितीत बऱ्याच अमाइनांचा महत्त्वाचा पदार्थ म्हणून उपयोग करतात. रंजक निर्मितीत [®रंजक व रंजकद्रव्ये] व ðरबर रसायनांच्या निर्मितीत ॲरोमॅटिक अमाइनांचा उपयोग करण्यात येतो.

पहा : अमिनीकरण एथॅनॉल अमाइने.

 मिठारी, भू. चिं.