फुरफुराल : हे एक कार्बनी संयुग असून याची फुराल, फुरफुराल्डिहाइड, पायरोग्युसिक आल्डिहाइड, फ्युरोल व २-फुराल्डिहाइड अशीही नावे आहेत. याचे रेणुसूत्र C4H3O·CHO असे असून चार कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू असलेली वलये ज्यांत असतात अशा ⇨ फ्यूरान या विषमवलयी संयुगांमधील हे महत्त्वाचे संयुग आहे. फुरफुराल सहज वाहणारा द्रव असून शुद्ध स्थितीत ते रंगहीन असते परंतु हवेत वा प्रकाशात उघडे पडले असता ते लालसर तपकिरी किंवा गर्द अंबर रंगाचे होते. याला कडू बदामाच्या तेलासारखा विशिष्ट झोंबणारा वास येतो. याचे वि. गु. १·१५९८ असून त्याचा उकळबिंदू १६१°·७ से. व वितळबिंदू – ३६°·५ से. आहे. हे अल्कोहॉल, बेंझीन व ईथर यांच्यात विरघळते अथवा मिसळते. तसेच बहुतेक कार्बनी विद्रावकांमध्येही (विरघळविणाऱ्या पदार्थामध्येही) ते मिसळते पण ग्लिसरॉलामध्ये ते मिसळत नाही. पाण्यात ते अल्प प्रमाणात विरघळते.

निर्मिती : ओक वृक्षाच्या लाकडाचे भंजक ऊर्ध्वपातन (हवारहित स्थितीत लाकूड उच्च तापमानाला तापवून त्यातील घटक अलग करण्याची क्रिया), कार्बोहायड्रेटांचे किण्वन (आंबविण्याची क्रिया) वगैरेंसारख्या विविध कार्बनी विक्रियांमध्ये अल्प प्रमाणात फुरफुराल तयार होते. तथापि मक्याचे बुरगुंड, सातू व भाताचे तूस आणि सरकीचे फोल यांचे जलीय विच्छेदन करून (पाण्याच्या साहाय्याने रेणूंचे तुकडे करून) मिळणाऱ्या पेंटोजाचे निर्जलीकरण करून फुरफुराल मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते. १९२२ पासून याच्या अशा उत्पादनास सुरूवात झाली आहे.

अशा प्रक्रियेत कच्चा माल दळून विरल (विद्रावातील प्रमाण कमी-येथे ५ ते १०%-असलेल्या) सल्फ्यूरिक अम्लाबरोबर एका फिरत्या पाचक यंत्रात (वाफेच्या साहाय्याने पदार्थ मऊ करण्याच्या वा त्याचे अपघटन म्हणजे रेणूचे तुकडे करण्याच्या उपकरणात) दाबाखाली वाफेमध्ये दोन तास शिजवितात. यामुळे पेंटोजापासून पुढीलप्रमाणे फुरफुराल निर्माण होते.

याच वेळी गौण विक्रियांमुळे थोड्या प्रमाणात मिथेनॉल, ॲसिटाल्डिहाइड व ॲसिटिक अम्ल तयार होतात. अशा तऱ्हेने बनलेले फुरफुराल वाफेसह एकसारखे काढून घेतले जाते व ऊर्ध्वपातनाने (द्रवांचे मिश्रण तापवून व बनलेले बाष्प थंड करून घटक अलग करण्याच्या क्रियेने) फुरफुरालाचे प्रमाण वाढविण्यात येते. वाफेचे द्रवात रूपांतर झाल्यावर त्याचे दोन थर बनतात. त्यांपैकी वरच्या अधिक पाणी असणाऱ्या थराचे वेगळे ऊर्ध्वपातन करून मिथेनॉल व ॲसिटाल्डिहाइड मिळवितात. खालचा सु. ६% पाणी असणारा फुरफुरालाचा थर निर्जलीकरण स्तंभात पाठवितात, थंड करतात आणि गाळून ९९·५% फुरफुराल असलेला विद्राव मिळतो. याचे ऊर्ध्वपातन व विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करून शुद्ध फुरफुराल मिळते. याचे स्वयंऑक्सिडीभवन [⟶ ऑक्सिडीभवन] होऊ नये म्हणून त्याच्यात ऑक्सिडीभवनास विरोध करणारा पदार्थ घालतात.

रासायनिक गुणधर्म : याच्यामध्ये आल्डिहाइड गट (CHO), तसेच ईथर-अनुबंध ( C-O-C) आणि एकाआड एक अशा एकबंध व द्विबंध यांची प्रणालीही आहे. यांच्यामुळे इतर संयुगांशी विक्रिया होण्याच्या दृष्टीने याच्या रेणूत अनेक अनुकूल जागा उपलब्ध होतात. विक्रियांच्या दृष्टीने हे जवळजवळ बेंझाल्डिहाइडाप्रमाणे आहे (उदा., जलीय सोडियम हायड्रॉक्साइडाबरोबर यापासून फुरफुरिल अल्कोहॉल व फ्युरोइक अम्ल तयार होतात अल्कोहॉलिक पोटॅशियम सायनाइडाबरोबर यापासून फ्यूरोइन मिळते व पुढे ऑक्सिडीकरण केल्यास फ्यूरिल तयार होते याची अमोनियाशी विक्रियाही होऊन फुरफुरामाइड मिळते वगैरे). आल्डिहाइड गटाच्या नेहमीच्या विक्रियाही याच्याबाबतीत घडतात [⟶ आल्डिहाइडे]. याची विशिष्ट विक्रिया म्हणजे ॲनिलीन व हायड्रोक्लोरिक अम्लाबरोबर ते तांबडा रंग देते, ही होय.

उपयोग : फुरफुराल व त्याचे अनुजात (त्यापासून बनविलेली संयुगे) यांचा उद्योगधंद्यांत मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो आणि त्यांच्या वापराचे क्षेत्र वाढतच आहे. औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची अनेक द्रव्ये वा संयुगे कृत्रिम रीतीने तयार करताना सुरूवातीचे संयुग म्हणून फुरफुरालाचा वापर होतो व हा त्याचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग आहे. लायसीन, पायरोल, पायरोलिडीन, मिथिल फ्यूरान, टेट्राहायड्रो फुरफुरिल ओलिएट, पिरिडीन, फ्युरोइक अम्ल, फ्यूमेरिक अम्ल, मॅलेइक अम्ल, हायड्रोफुरामाइड इ. औद्योगिक महत्त्वाची संयुगे त्यापासून बनविण्यात येतात. नायलॉननिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ॲडिपिक अम्ल आणि हेक्झॅमिथिलीन डायअमाइन यांच्या निर्मितीतही फुरफुराल वापरले जाते. फुरफुरालाची फिनॉलाबरोबरची रेझिने व्हार्निश, अपघर्षक (खरवडून व घासून पृष्ठ गुळगुळीत करणारी) चाके वगैरेंमध्ये वापरतात. याचा विरघळविण्याचा गुणधर्म असाधारण प्रकारचा असल्याने वनस्पतिजन्य तेले, वंगण तेले, रेझिने इत्यादींच्या परिष्करणामध्ये (शुद्धीकरणामध्ये) फुरफुराल वापरतात. खनिज तेलाच्या भंजनाद्वारे (भारी घटकांपासून हलके घटक मिळविण्याच्या प्रक्रियेद्वारे) मिळणाऱ्या वायूंपासून ब्युटाडाइनासारखी हायड्रोकार्बने मिळविण्याकरिताही फुरफुरालाचा उपयोग होतो. डीझेल तेलाची प्रत सुधारण्यासाठी पाव, कॉफी, बीअर यांना कृत्रिम स्वाद देण्यासाठी सुवासिक द्रव्यांचा घटक, परिरक्षक, कवकनाशक (बुरशीसारख्या हरितद्रव्यविरहित वनस्पतींचा नाश करणारा पदार्थ), जंतुनाशक, वाळवीरोधक, विद्रावक म्हणून, तसेच काही धातूंच्या शुद्धीकरणात फुरफुराल आणि त्याचे अनुजात यांचा उपयोग केला जातो.

फुरफुरालाचे सर्वाधिक उत्पादन अमेरिकेत होते व भारतात त्याचे उत्पादन १९५१ पासून करण्यात येत आहे.

जमदाडे, ज. वि.