फ्लोरी, पॉल जॉन : (१९ जून १९१० – ). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. रसायनशास्त्राचे १९७४ चे नोबेल पारितोषिक यांना बृहत्‌रेणूंच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक ज्ञानात मौलिक भर टाकण्याच्या कामगिरीबद्दल देण्यात आले. यांचा जन्म स्टर्लिंग (इलिनॉय)येथे व शिक्षण मँचेस्टर कॉलेज व ओहायओ स्टेट युनिव्हर्सिटी येथे १९३४ मध्ये त्यांनी पीएच्.डी. पदवी मिळविली. त्यांनतर ई. आय्. द्यू पाँ यांच्या विल्मिंग्टन येथील प्रयोगशाळेत त्यांनी वॉलिस ह्यूम कारदर्स यांच्याबरोबर ४ वर्षे संशोधन कार्य केले. १९३८ ते १९४० या कालखंडात ते सिनसिनॅटी विद्यापीठात आणि १९४० ते १९४३ मध्ये स्टँडर्ड ऑइल कंपनीत संशोधक होते. त्यांनतर पाच वर्षे ते गुडइयर टायर अँड रबर कंपनीच्या संशोधन व विकास खात्याचे प्रमुख होते व तेथून ते १९४८ मध्ये कॉर्नेल विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून गेले. १९५६ मध्ये मेलन इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली व १९६१ मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठात रसायनशास्त्राचे ‘जॅकसन-वुड प्राध्यापक’ म्हणून ते नेमले गेले. तेथून सेवानिवृत्त झाल्यावर (१९७५) ते मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी (झुरिक) या संस्थांचे अभ्यागत प्राध्यापक आहेत.

बृहत्‌रेणू हे उच्च रेणुभार असलेले रेणू सहसंयुजी बंधांनी जोडल्या गेलेल्या कार्बन अणूंच्या लांबच लांब साखळ्यांचे (बहुवारिकांचे म्हणजे एकाच प्रकारच्या अनेक साध्या रेणूंपासून बनलेल्या जटिल रेणूंचे) बनलेले असतात [⟶ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके]. ते त्रिमितीय असून त्यांच्यातील अणू मांडले जाण्यात विविधता असते. त्यांचे गुणधर्म समजण्यासाठी त्यांच्यातील अणूंच्या मांडणीची वैशिष्ट्ये माहीत असावी लागतात. फ्लोरी यांनी त्यांचे विश्लेषण करण्याच्या पद्धती शोधून काढल्या.

बहुवारिकीकरणाची (एकाच प्रकारच्या अनेक साध्या रेणूंच्या संयोगाने जटिल रेणू बनविण्याच्या क्रियेची) यंत्रणा, संरचना, भौतिक व यांत्रिक गुणधर्म यांसंबधीचे त्यांचे संशोधन बहुमोल आहे. एखाद्या लांबी वाढत असलेल्या बहुवारिकाच्या रेणूची लांबी वाढणे थांबवून लांबी वाढण्याचा गुण दुसऱ्या रेणूला प्रदान करण्याच्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या. अशा प्रकारे बहुवारिकांसंबंधी त्यानी केलेले प्रयोग व शोधलेल्या विविध पद्धती यांच्यामुळे ‘प्लॅस्टिक युगा’चा पाया घातला गेला. विद्रुत (विरघळलेल्या) अवस्थेत असलेल्या बहुवारिकाचे घनफळ तापमानाच्या फरकानुसार बदलते. ज्या तापमानाला ते इतके वाढते की, विद्रुतावस्थेत राहणे त्याला जवळजवळ अशक्य होते त्या तापमानाचा उल्लेख ‘फ्लोरी तापमान’ किंवा ‘ थीटा’ (θ) तापमान असा केला जातो. वायुविश्वस्थिरांकासारखाच बहुवारिकांचाही एक स्थिरांक असून त्याला ‘फ्लोरी विश्वस्थिरांक’ असे म्हणतात.

फ्लोरी यांना नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन केमिकल सोसायटी, अमेरिकन फिजिकल सोसायटी, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस, नॅशनल रिसर्च कौन्सिल इ. संस्थांनी सभासदत्व अमेरिकन ॲसोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सने फेलोपद मँचेस्टर कॉलेज व पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट (मेलन) यांनी सन्माननीय पीएच्.डी. पदवी आणि मँचेस्टर (इंग्लंड) व ओहायओ विद्यापीठांनी डी.एस्‌सी. पदवी देऊन त्यांचा बहुमान केला. १९७४ चे प्रीस्टली पारितोषिकही त्यांना बहाल करण्यात आले.

संशोधनावर आधारित असे त्यांचे अनेक लेख विविध शास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. कॉर्नेल विद्यापीठात असताना त्यांनी लिहिलेले प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिमर केमिस्ट्री हे पुस्तक प्रमाणभूत पाठ्यपुस्तक म्हणून मान्यता पावले आहे.

ठाकूर, अ. ना.