नॅप्था: द्रवरूप हायड्रोकार्बनांच्या काही विशिष्ट व जटिल मिश्रणांपैकी (नॅप्थे) कोणतेही एक [→ खनिज तेल].

इतिहास: प्रथमतः ही संज्ञा रशियातील बाकू आणि इराणातील काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडणाऱ्या व बाष्पनशील (चटकन बाष्परूप होणाऱ्या) तेलांना लावण्यात आली. किमयागार ईथर [→ ईथर –१] व एस्टर [→ एस्टरे] वर्गांतील आणि इतरही बाष्पनशील व सहज वाहू शकणाऱ्या द्रवांना नॅप्थे म्हणत. आधुनिक काळात दगडी कोळशाचे डांबर, ⇨ शेल तेल आणि खनिज तेल यांपासून ऊर्ध्वपातनाने (बंद भांड्यात घालून तापविणे व त्या वेळी होणारी वाफ थंड करून घटक पदार्थ मिळविण्याच्या प्रक्रियेने) मिळणाऱ्या विशिष्ट हायड्रोकार्बनी मिश्रणांना ही संज्ञा लावतात. म्हणून एखाद्या नॅप्थ्याचा उल्लेख करताना तो कशापासून प्राप्त झाला आहे याचा निर्देश केला जातो उदा., दगडी कोळशाच्या डांबराचा (कोल टार) नॅप्था इत्यादी.

घटक व गुणधर्म: यामध्ये ॲलिफॅटिक व ॲरोमॅटिक वर्गांची भिन्न संयुगे [→ॲरोमॅटिक संयुगे ॲलिफॅटिक संयुगे] भिन्न प्रमाणात मिश्रणरूपाने असतात. त्यामुळे यांचे उकळण्याचे पल्ले (मिश्रण उकळण्यास सुरुवात होण्याचे तापमान व उकळणे बंद होण्याचे तापमान यांमधील मर्यादा), बाष्पनशीलता, ज्वालाग्राहित्व (पेट घेण्याचा गुण), विद्रावणक्षमता (पदार्थ विरघळविण्याची क्षमता) यांमध्ये फरक असतात.

प्रकार:पेट्रोलियम नॅप्थे: खनिज तेलांच्या परिष्करणात ऊर्ध्वपातन करताना हलका नॅप्था आणि जड नॅप्था असे दोन अंश मिळतात [→ खनिज तेल]. त्यांचे पुन्हा ऊर्ध्वपातन करून इष्ट त्या तापमान मर्यादेतील अंश वेगवेगळे केला असता काही नॅप्था-प्रकार बनतात. उदा., व्हार्निशमेकर्स व पेंटर्स नॅप्था (व्ही. एम. अँड पी. नॅप्था) हे पेट्रोलियम नॅप्थ्यापासून पुन्हा ऊर्ध्वपातनाने सु. ९३° से. ते १४८° से. या तापमान मर्यादेत मिळणारे विविध अंश होत. त्यांना पेट्रोलियम स्पिरिट, पेट्रोलियम थिनर, मिनरल थिनर, टर्पेंटाइन सबस्टिट्यूट आणि मिनरल टर्पेंटाइन असेही म्हणतात. स्टॉडार्ड विद्रावक व क्लीनर्स नॅप्था हे काही निर्देशित गुणधर्माचे असेच अंश आहेत.

दगडी कोळशाच्या डांबराचा नॅप्था: दगडी कोळशाच्या डांबराचे ऊर्ध्वपातन केल्याने १७०° से. पर्यंत जो अंश मिळतो त्यास हलके तेल (लाइट ऑईल) म्हणतात. त्याचे कमी दाब वापरून अंशतः ऊर्ध्वपातन (ऊर्ध्वपातन करताना इष्ट तापमान मर्यादेत बाहेर पडणारे भाग वेगवेगळे काढण्याची प्रक्रिया) केले असता सु. १४०° से. १७०° से. या तापमान मर्यादेत मिळणारे मिश्रण म्हणजेच हा नॅप्था होय. यामध्ये झायलीन व क्युमीन आणि थोड्या प्रमाणात बेंझीन व टोल्यूइन असते. याला विद्रावक (सॉल्व्हंट) नॅप्था असेही म्हणतात.

शेल नॅप्था: शेल तेलापासून ऊर्ध्वपातनाने मिळणाऱ्या नॅप्थ्यामध्ये संतृप्त (ज्यात मुक्त संयुजा बंध–इतर अणूंशी वा अणुगटांशी जोडले जाणारे बंध–नाहीत असे) पॅराफिन व ओलेफीन वर्गांची हायड्रोकार्बने असतात [→ पॅराफिने].

वुड नॅप्था: लाकडाच्या भंजक ऊर्ध्वपातनाने मिळणाऱ्या अशुद्ध मिथिल अल्कोहॉलाचा उल्लेख कित्येकदा वुड नॅप्था म्हणून करतात.

उपयोग: रंग आणि व्हार्निशे पातळ करण्यासाठी, रबर-आसंजके (चिकटविणारे पदार्थ) बनविण्याकरिता, कोरड्या धुलाईच्या साबणांत, चर्मोद्योगात कातड्यावरील चरबी काढून टाकण्यासाठी, फर्निचरची व धातूची पॉलिशे इत्यादींमध्ये विविध नॅप्था-प्रकार वापरतात. अलीकडे पेट्रोलियम नॅप्थ्याचा उपयोग हायड्रोजनाच्या उत्पादनासाठी केला जातो. असा हायड्रोजन स्वस्त पडत असल्यामुळे अमोनिया आणि त्यापासून खते बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नॅप्थ्याचा उपयोग होतो [→खते].

वेगवेगळ्या उपयोगांसाठी आवश्यक ते गुणधर्म असलेल्या नॅप्थाप्रकारांचे प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे.

जोशी, पां. ह.