मायर, व्हिक्टॉर : (८ सप्टेंबर १८४८–८ ऑगस्ट १८९७). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. बाष्पाची घनता मोजण्याची महत्त्वाची पद्धती त्यांनी विकसित केली, तसेच कार्बनी रसायनशास्त्र व ⇨ त्रिमितीय रसायनशास्त्र या विषयांतील त्यांचे संशोधनही महत्त्वाचे आहे.

मायर यांचा जन्म व आधीचे शिक्षण बर्लिन येथे झाले. नंतर त्यांनी हायडल्‌बर्ग येथे अध्ययन केले व अठराव्या वर्षी पीएच्. डी. पदवी मिळविली. एक वर्षभर ते आर्. डब्ल्यू. बन्सन यांचे साहाय्यक होते व या काळात त्यांनी बाडेन येथील खनिज जलाचे विश्लेषण केले. १८६८–७१ काळात त्यांनी बर्लिन येथील ए. बायर यांच्या प्रयोगशाळेत काम केले. १८७१ साली ते स्टटगार्ड पॉलिटेक्‍निकमध्ये प्राध्यापक होते, तर १८७२ साली ते झुरिक येथील रासायनिक प्रयोगशाळेत प्राध्यापक व संचालक झाले. १८८५–८८ या काळात त्यांनी गटिंगेन विद्यापीठाची प्रयोगशाळा उभारली आणि १८८९ पासून मृत्यूपावेतो ते हायडल्‌बर्ग येथे होते.

सोडियम फॉर्मेट व अरोमॅटिक सल्फोनिक अम्‍लाचे पोटॅशियम लवण एकत्र तापविल्यास अरोमॅटिक संयुगांत (वलयात) कार्‌बॉक्सिल (–COOH) गटाचे प्रतिष्ठापन होते, असे त्यांनी १८७० मध्ये प्रसिद्ध केलेल्या प्रबंधात विशद केले. अद्यापिही ही विक्रिया अरोमॅटिक अम्‍लांचे संश्लेषण (कृत्रिम रीत्या निर्मिती) करण्यासाठी वापरतात. १८७२ मध्ये त्यांनी अलिफॅटिक हायड्रोकार्बनांची नायट्रो संयुगे शोधून काढली. अरोमॅटिक नायट्रो संयुगे सहज तयार करता येतात, तसेच ती परिचित आहेत. मात्र अलिफॅटिक नायट्रो संयुगे सहज बनत नाहीत, योगायोगानेच तयार होतात. मायर यांनी नायट्राइट व नायट्रो अशी दोन प्रकारची संयुगे असतात असे सुचविले. यावरच त्यांनी पुढे संशोधन केले. सिल्व्हर नायट्राइट व अल्किल आयोडाइडे यांची विक्रिया होऊन खरी नायट्रो संयुगे मिळतात, तर प्राथमिक व द्वितीयक नायट्रोपॅराफिने व नायट्रस अम्‍ल यांची विक्रिया होऊन अनुक्रमे लाल नायट्रोलिक अम्‍ले (अम्‍लीय) व निळसर स्यूडोनायट्रोल्स (वि-अम्‍लीय) अशी संयुगे मिळतात, हे त्यांनी दाखवून दिले व त्यांची संरचनात्मक सूत्रे तयार केली. या विक्रियेचा उपयोग नायट्रोपॅराफिने ओळखण्यासाठी करण्यात येतो. १८८२ मध्ये त्यांनी ऑक्झाइमे शोधून काढली. हायड्रॉक्सिल अमाइनाची आल्डिहाइडे व कीटोने यांवर विक्रिया करून त्यांनी ऑक्साइमे मिळविली व ती त्रिमितीय समघटक रूपांत असू शकतात, हे दाखविले [→ त्रिमितीय रसायनशास्त्र].

मायर यांचे नाव बाष्पाची घनता मोजण्याच्या पद्धतीशी निगडीत झाले आहे. १८७१ साली त्यांनी विकसित केलेली ही व्हिक्टॉर मायर पद्धती आजही वापरण्यात येते. बाष्प-घनतेवरून एखाद्या द्रवाची वा घनाची संरचना ठरविण्यासाठी त्यांची पद्धत उपयुक्त ठरली. अल्प प्रमाणातील संयुगासाठी व उच्‍च तापमानातही ही पद्धत वापरता ययेईल, असे मायर यांना वाटले. १८७६–७८ या काळात त्यांनी तीन टप्प्यांत बाष्प-घनता मोजण्याचे उपकरण तयार केले. त्यांनी ३,०००° से. तापमानापर्यंत बाष्पांचा अभ्यास केला. या पद्धतीने बऱ्याच मूलद्रव्यांची व अकार्बनी संयुगांची रेणवीय स्थिती समजू शकली. १८८३ मध्ये त्यांनी डांबरापासून मिळालेल्या बेंझिनापासून थायोफीन हे संयुग तयार केले. १८८७ मध्ये त्यांनी संयुगाच्या ऋण मूलकाविषयी संशोधन करून ते विद्युत् स्‍नेही असतात, असे प्रतिपादले.

बेंझॉइक अम्‍ल व त्याचे त्रि-प्रतिष्ठापित अनुजात (मूळ पदार्थांपासून मिळणारे पदार्थ) यांचे ⇨ एस्टरीकरण केल्यास बेंझीन वलयातील ऑर्थो, मेटॅ व पॅरा या तिन्ही जागांवर गट असतील वा फक्त ऑर्थो जागेवर गट असेल, तर अशा बेंझॉइक अम्‍लाचे एस्टरीकरण होत नाही, असे त्यांना दिसून आले याला कारण ‘त्रिमितीय अडथळा’ हे आहे, असे त्यांनी प्रतिपादले.

मायर बर्लिन, अप्साला व गटिंगेन येथील अकॅडेमींचे सदस्य होते, तसेच जर्मन केमिकल सोसायटीचे अध्यक्ष होते. १८९१ साली त्यांना डेव्ही पदक मिळाले. मायर यांनी Pyrochemische Untersuchungen (१८८५, कार्ल मायर या आपल्या बंधूसमवेत), Die Thiophengruppe (१८८८) व Lehrbuch der organischen Chemie (२ खंड १८९३–१९०३, पॉल जॅकोबसन यांच्याबरोबर) ही तीन पुस्तके व सु. ३०० च्या वर संशोधनात्मक प्रबंध लिहिले आहेत. १८८० नंतर त्यांची प्रकृती ढासळली व ते सतत आजारी पडू लागले. प्रदीर्घ आजाराला कंटाळून त्यांनी प्रुसिक अम्‍ल घेऊन हायडल्‌बर्ग येथे आत्महत्या केली.

मिठारी, भू. चिं. घाटे, रा. वि.