ॲट्रोपीन : रासायनिक संयुग. सूत्र C17H23O3N. एक ⇨ अल्कलॉइडॲट्रोपा बेलाडोना, खोरासनी ओवा, धोत्रा, नांद्रू (फायसोक्लाइना प्रिॲल्टा) इ. ⇨ सोलॅनेसी कुलातील वनस्पतींत असणाऱ्या एल-हायसायमीन या संयुगापासून ॲट्रोपीन तयार केले जाते. क्वचित या वनस्पतीतही अल्पसे ॲट्रोपीन निसर्गत:च असते.

ॲट्रोपिनाचे स्फटिक वर्णहीन, सुईसारखे, पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे) व अल्कोहॉलात विद्राव्य असतात. वितळबिंदू ११४–११६°से. ॲट्रोपिनाची संरचना (अणूंची मांडणी) पुढीलप्रमाणे आहे:

ॲट्रोपीन

हायसायमीन हे प्रकाशत: सक्रियक (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या प्रकाशाच्या म्हणजे ध्रुवित प्रकाशाच्या कंपनाचे प्रतल फिरवणारे) वामावर्ती (कंपन प्रतल डाव्या बाजूस वळविणारे) असते. एथिल अल्कोहॉली सोडियम हायड्रॉक्साइडाने त्याचे रॅसिमीकरण (प्रकाश-क्रियाशील पदार्थाचे निष्क्रिय पदार्थ बनणे) होऊन ॲट्रोपीन तयार होते, म्हणून ॲट्रोपीन हे (±) हायसायमीन असते.

वर उल्लेख केलेल्या वनस्पतींपासून तयार केलेली औषधे भारतात व यूरोपात प्राचीन कालापासून वापरण्यात आलेली आहेत. आधुनिक वैद्यकातही ॲट्रोपिनाचा उपयोग केला जातो. बेलाडोना प्लॅस्टर या नावाने ओळखण्यात येणारी जखमा, गळवे वगैरेंवर लावावयाची चिकटपट्टी सर्वपरिचित आहे. ॲट्रोपिनाचा उपयोग मुख्यत: डोळ्यातील बाहुलीचा विस्तार करण्यासाठी व मृदू स्‍नायूंचा अंगग्रह (लुळे पडणे) व आकुंचन शमविण्यासाठी तसेच त्वचा, पचनमार्ग व श्वसनमार्ग यांच्यातील ग्रंथींचा स्राव थांबविण्याकरिता केला जातो.

ॲट्रोपीन अत्यंत विषारी असून प्रमाणित मात्रेतच द्यावे लागते. ताप, दृष्टिमांद्य, अंतर्बाह्य कोरडेपणा, लाली व मनोविभ्रम ही ॲट्रोपिनाच्या विषबाधेची लक्षणे होत. ॲट्रोपिनाच्या विषावर पंपाने जठर धुणे व उत्तेजक पेये, मॉर्फीन, पायलोकार्पीन ही द्रव्ये उतारा म्हणून देतात.

मिठारी, भू. चिं.