हेर्श्को, ॲव्हरम : (३१ डिसेंबर १९३७). हंगेरीत जन्मलेले इझ्राएली जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांना २००४ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक आरॉन जे. सीशानोव्हर व आयर्विन रोझ यांच्याबरोबर विभागून देण्यात आले. बहुतेक सजीव ज्या यंत्रणेद्वारे अवांच्छित किंवा उपयुक्त नसलेली प्रथिने काढून टाकतात, त्या यंत्रणेचा शोध या तिघांनी संयुक्तपणे लावल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक देण्यात आले. 

 

ॲव्हरम हेर्श्को
 

हेर्श्को यांचा जन्म हंगेरीतील कॉर्टसॉग येथे झाला. त्यांचे मूळनाव फेरेंट्झ हेर्स्को होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या कुटुंबाचा ज्यू असल्यामुळे नाझींकडून छळ झाला होता. त्यामुळे हे कुटुंब नंतर इझ्राएलला स्थलांतरित झाले. हेर्श्को यांचे शिक्षण जेरूसलेममधीलहिब्रू विद्यापीठातील हॅडासा मेडिकल स्कूल येथे झाले. तेथून त्यांनी एम्.डी. (१९६५) व पीएच्. डी. (१९६९) या पदव्या संपादन केल्या. १९७२ मध्ये ते हैफा येथील टेक्निऑन–इझ्राएल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे रुजू झाले. 

 

हेर्श्को यांनी १९७८–८३ दरम्यान फिलाडेल्फिया येथील फॉक्स चेस कॅन्सर सेंटर येथे सीशानोव्हर व रोझ यांच्याबरोबर संशोधन केले.जी प्रथिने उपयुक्त राहिलेली नाहीत त्यांचा अपकर्ष (र्‍हास) वा विनाश कोशिकांकडून (पेशींकडून) कसा होतो, याचे संशोधन या तिघांनी केले. युबिक्विटीन नावाचा रेणू र्‍हासाकडे जाणाऱ्या प्रथिनाला जोडला जातो, तेव्हा ही र्‍हासाची प्रक्रिया सुरू होते. नंतर हे प्रथिन प्रोटिएसोमाकडे जाते. प्रोटिएसोम ही ⇨ एंझाइमां ची संरचना असून तिच्यामुळे प्रथिनाचे त्याच्या घटक ॲमिनो अम्लांमध्ये विभाजन होते. प्रोटिएसोमाच्या बाह्य पटलात केवळ युबिक्विटीनवाहक प्रथिनांनाच प्रवेश मिळतो. कारण युबिक्विटीन रेणू प्रोटिएसोमामध्ये प्रविष्ट होण्याआधी वेगळा (विभक्त) होतो. 

 

हेर्श्को व त्यांच्या सहकार्यांनी मध्यस्थ युबिक्विटिनाद्वारे होणाऱ्या प्रथिनांच्या र्‍हासामुळे कोशिकाविभाजनासारख्या इतर महत्त्वाच्या जीवरासायनिक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, असे दाखवून दिले. जेव्हा प्रथिनाच्या र्‍हासाची यंत्रणा सामान्य (प्राकृतिक) रीतीने कार्य करीत नाही, तेव्हा द्रवार्बुदी तंत्वात्मकतेसारखे विकार होतात आणि या शोधलेल्या गोष्टींचा उपयोग अशा आजारांवरील उपचारांकरिता औषधे तयार करण्यासाठी करता येईल, अशी आशा संशोधकांना वाटते आहे. 

ठाकूर, अ. ना.