शेंदूर : शिशाचे महत्त्वाचे ऑक्साइड. याला इंग्रजीत रेड लेड किंवा ट्रायलेड टेट्रॉक्साइड, लेड ऑर्थोप्लंबेट, लेड ऑक्साइड रेड, प्लंबोप्लंबिक ऑक्साइड, ट्राय प्लंबिक ऑक्साइड अथवा मिनियम अशी नावे आहेत. याचे रासायनिक सूत्र Pb3O4 असून हे ऑर्थोप्लंबिक अम्लाचे लवण असल्याने हे सूत्र Pb2 (PbO4) किंवा 2PbO. PbO2 असेही लिहितात.

शेंदूर ही विषारी, मातकट पूड असून तिचा रंग भडक नारिंगी तांबडा ते विटकरी तांबडा असतो. हा रंग कणांचे आकारमान व तिच्यातील अशुद्ध द्रव्ये यांच्यावर अवलंबून असतो. गरम असताना शेंदूर विटकरी काळा दिसतो परंतु गार झाल्यावर त्याला मूळ रंग येतो. याचे तांबडे किंवा पिवळे स्फटिकमय पापुद्रे आढळतात. वितळबिंदू ८३० से. आणि वि.गु. ८·३२ − ९·१६. शेंदूर पाण्यात विरघळत नाही पण शुद्ध ॲसिटिक अम्लात व सौम्य हायड्रोक्लोरिक अम्लात तो थोडा विरघळतो. बाजारात मिळणाऱ्या शेंदरात ⇨ मुर्दाडशिंगाचे म्हणजे लिथार्जचे (PbO) प्रमाण ३५ टक्क्यापर्यंत निरनिराळे असते. त्याच्या कमी-जास्त प्रमाणानुसार त्याचे प्रकार होतात. अळशीच्या तेलात मुर्दाडशिंगाचे प्रमाण जास्त असलेला शेंदूर मिसळल्यास लुकण तयार होते. हे लुकण मुख्यतः नळकाम करताना नळजोडणीसाठी वापरतात, म्हणून त्याला प्लंबर्स सिमेंट असेही म्हणतात.

भट्टीत गरम हवेच्या प्रवाहात लिथार्ज (लेड मोनॉक्साइड) हळूहळू २४ तास तापविल्यास ३५० ते ४७० से. तापमानापर्यंत शेंदूर निर्माण होतो. ४७० से. पेक्षा अधिक तापमानाला शेंदराचे अपघटन (मोठ्या रेणूचे लहान रेणूत तुकडे) होऊन लिथार्ज व ऑक्सिजन परत मिळतात, म्हणजे ही व्युत्क्रमी (उलटसुलट होणारी) विक्रिया आहे व ती पुढीलप्रमाणे दर्शवितात.

रंगलेपांत धातुसंरक्षक रंगद्रव्य म्हणून शेंदूर वापरतात. पूल, जहाजे, पाण्याच्या टाक्या आदी लोखंडी व पोलादाच्या बांधकामाच्या ठिकाणी तसेच शेतीची अवजारे व यंत्रसामग्री, रासायनिक कारखान्यातील लोखंडी यंत्रसामग्री यांना शेंदूर असलेल्या रंगलेपाचा पहिला हात देतात. यामुळे हे भाग गंजत नाहीत. तेल घट्ट करणे, अल्कोहोलचे शुद्धीकरण, रंगहीन काच, मातीच्या भांड्यांची झिलई व एनॅमलच्या वस्तू, व्हार्निश, काडीपेट्या, रबर, खनिज तेल इत्यादींच्या निर्मितीत शेंदूर कच्चा माल म्हणून वापरतात. काही देवतांच्या पूजाविधीत शेंदूर वापरतात. तसेच मारुती, गणपती, देवी, म्हसोबा यांसारख्या ग्रामदेवतांच्या मूर्तींना शेंदराचा लेप लावतात. शेंदराचा लेप सहजपणे निघत नाही. तो खरवडून काढावा लागतो. कधीकधी हा लेप अचानकपणे मूर्तीपासून अलगही होतो.

शेंदूर हा तिखट, कडू, उष्ण, व्रण भरून आणणारा असल्याचा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. विषाने दुष्ट झालेला व्रण, त्वचाविकार, कुष्ठ, धावरे, जीर्ण ज्वर, रक्तदोष यांच्यावरील उपचारांत तसेच खाज नाहीशी करण्यासाठी शेंदूर आयुर्वेदात वापरला जातो.

पहा : रंगद्रव्ये

कुलकर्णी, सतीश वि.