बार्टन, डेरेक हॅरोल्ड रिचर्ड : (८ सप्टेंबर १९१८ – ). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. कार्बनी संयुगाचा प्रत्यक्षात असलेला त्रिमितीय आकार निश्चित करण्याच्या संबंधात त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले आहे, यासंबंधीच्या विक्रियांच्या केलेल्या अभ्यासाबद्दल त्यांना व ⇨ ऑड हॅसेल यांना १९६९ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. बार्टन यांचा जन्म ग्रॅव्हझेंड (केंट, इंग्लंड) येथे व शिक्षण लंडन येथे झाले. त्यांनी बी. एस्.सी (१९४०), पीएच्. डी. (१९४२) व डी. एस्सी. (१९४९) या पदव्या संपादन केल्या. ते इंपीरिअल कॉलेज (लंडन) येथे साहाय्यक व्याख्याते (१९४५) व नंतर संशोधक अधिछात्र (१९४६-४९) म्हणून होते. १९४९-५० साली ते हार्व्हर्ड विद्यापीठात अभ्यागत व्याख्याते होते. तेथे असतानाच त्यांनी ठराविक कार्बनी संयुगांच्या रासायनिक वर्तनाविषयी अभ्यास केला. त्यातूनच त्यांना घूर्णनविन्यास विश्लेषणाची (एकबंधाभोवती ज्याचे घूर्णन होऊ शकेल अशा अणूंची रेणूमधील अवकाशीय मांडणी कशी झाली आहे हे अभ्यासण्याची) कल्पना स्फुरली. इंग्लंडला परतल्यावर प्रथम त्यांची बर्कबेक कॉलेजात (लंडन) प्रपाठक म्हणून तर १९५५ साली ग्लासगो विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९५७ साली ते इंपीरिअल कॉलेजमध्ये कार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून गेले व १९७८ साली सेवानिवृत्त होईपर्यंत ते तेथेच होते.

इ. स. १९४९ साली हार्व्हर्ड विद्यापीठात गेले असताना तेथे त्यांच्या सहकाऱ्यांनी काही विक्रियांच्या अभ्यासात त्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम त्यांच्यापुढे मांडला. त्यांना असे दिसून आले होते की, स्टेरॉइडे व ट्रायटर्पिनॉइडे या संयुगांच्या समघटकात (एकच रेणवीय संघटन पण भिन्न संरचना असलेल्या संयुगांत) क्रियाशील गट एकाच स्थितीत असूनदेखील त्यांच्या विक्रिया गतीत फरक आढळून येतो. या शंकेचे बार्टन यांनी योग्य स्पष्टीकरण दिले. त्यांच्या मते हा फरक क्रियाशील गटाच्या निरनिराळ्या दैशिक विन्यासामुळे (मांडणीमुळे) होतो. हे स्पष्टीकरण बरोबर असल्याचे सिद्ध झाले व त्यामुळे कार्बनी रसायनशास्त्रात अध्ययनाचे एक नवीन क्षेत्र निर्माण झाले. १९४७ साली नॉर्वेमधील ऑड हॅसेल यांनी सायक्लोहेक्झेन व त्याचे अनुजात (त्यापासून बनविलेली संयुगे) यांचा ⇨इलेक्ट्रॉन विवर्तन पद्धतीने अभ्यास करून त्याची रेणू रचना मुख्यत्वे खुर्चीरूप असते, हे सिद्ध केले [⟶ त्रिमितीय रसायनशास्त्र]. कार्बनला जोडलेले हायड्रोजन अणू किंवा क्रियाशील गट एक तर केंद्रापासून दूरत्व दर्शविणाऱ्या विषुववृत्तीय दिशेला किंवा वलयाच्या कक्षेला समांतर अशा दिशेला असू शकतात. बार्टन यांना दिसून आले की, ज्या संयुगांचा घूर्णनविन्यास बद्ध (स्थिर) आहे, अशा संयुगांतील गटाची क्रियाशीलता, तो गट अक्षीय (वलयाच्या अक्षाला समांतर अशा दिशेत) आहे की विषुववृत्तीय आहे यावर अवलंबून असते. ही कल्पना सिद्ध करण्याकरिता बार्टन यांनी स्टेरॉइड व टर्पिन यांच्याविषयी खूप संशोधन केले. रासायनिक विक्रिया व घूर्णनविन्यास यांचा महत्वाचा संबंध त्यांनी विशद केला [⟶ स्टेरॉल व स्टेरॉइडे]. बार्टन यांच्या या महत्वपूर्ण संशोधनामुळे नैसर्गिक फिनॉले, अल्कलॉइडे इ. जटिल (गुंतागुंतीच्या) संयुगांच्या संरचनेबाबतच्या समस्या दूर झाल्या, इतकेच नव्हे, तर कोणत्याही संयुगाच्या संरचनेसंबंधी भाकित करता येऊ लागले. त्यांच्या संशोधनामुळे जैव संश्लेषणावरही (सजीवाकडून होणाऱ्या संयुगाच्या निर्मितीवरही) चांगलाच प्रकाश पडला. जैव संश्लेषणाचा अभ्यास त्यांनी दोन तऱ्हांनी केला. एक म्हणजे प्रयोगशाळेत अशा तऱ्हेची संयुगे साध्या व संरचना माहीत असलेल्या संयुगापासून संश्लेषित करणे (कृत्रिम रीतीने तयार करणे) आणि दुसरे म्हणजे वनस्पतींच्या चयापचयातून (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतून) ही संयुगे कशी तयार होतात, हे पाहाण्याकरिता वनस्पतीला लागणाऱ्या पोषक पदार्थातील एखाद दुसऱ्या संयुगात किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारा) पदार्थ घालून मार्गण (मागोवा घेण्याच्या) पद्धतीने जैव संश्लेषणाचे निरीक्षण करणे. या पद्धतींनी त्यांना जैव संश्लेषणाचा अभ्यास करता आला. बार्टन यांच्या संशोधनामुळे वैद्यकीय संशोधनास चालना मिळाली व नवनवीन औषधे अस्तित्वात येऊ लागली. त्यांच्या संशोधनामुळे डी-ऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाच्या संरचनेचा अभ्यास होऊन त्या क्षेत्रात मोलाची भर पडली [⟶ न्यूक्लिइक अम्ले]. ॲल्डोस्टेरॉन या हॉर्मोनाचे [वाहिनीविहीन ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्त्रावाचे ⟶ हॉर्मोने] संश्लेषण करण्याची एक प्रक्रिया त्यांनी शोधून काढली (१९६०). त्यामुळे हे हॉर्मोन कृत्रिम रीतीने बनविण्याचा सोपा मार्ग उपलब्ध झाला. या प्रक्रियेला ‘बार्टन प्रक्रिया’ म्हणतात.

बार्टन यांना १९५९ मध्ये रॉजर ॲडम्स पुरस्कार व १९६१ मध्ये डेव्ही पदक मिळाले. १९५४ मध्ये त्यांची फेलो ऑफ द रॉयल सोसायटी म्हणून निवड झाली. त्यांना माँटपील्यर व डब्लिन विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या मिळाल्या आहेत.

धुमाळ, रा. रा. घाटे, रा. वि.