मेंथॉल : एक कार्बनी संयुग. रेणुसूत्र (रेणूतील अणूंचे प्रकार व संख्या दर्शविणारे सूत्र) C10H20O. हेक्झॅहायड्रोथायमॉल, १–मिथिल –४– आयसोप्रोपिल सायक्लोहेक्झेन, पेपरमिंट कॅम्फर इ. नावांनीही हे संयुग ओळखले जाते. याच्या संरचनेत ३ असममित (चार वेगवेगळ्या अणूंना अथवा अणुगटांना जोडलेले) कार्बन अणू आहेत. त्यामुळे याचे प्रकाशत: सक्रिय (ज्यांची कंपने एकाच प्रतलात आहेत अशा प्रकाशाचे प्रतल उजवीकडे अथवा डावीकडे फिरविण्याचा गुण असलेले) असे ८ प्रकार होतात. त्यांपैकी l -मेंथॉल हा एक वामवलनी (प्रकाशत: सक्रिय पदार्थाचा प्रकाशाचे प्रतल डावीकडे फिरविणारा) प्रकार असून त्याची त्रिमितीय मांडणी (लांबी, रुंदी आणि उंची या त्रिमितींचा विचार करून दर्शविलेली) पुढे दिल्याप्रमाणे आहे. या आकृतीतील तारांकित ठिकाणचे कार्बन अणू असममित असून जाड रेषेने जोडलेले अणूक्रमांक दिलेल्या कार्बन अणूंच्या प्रतलाच्या वरच्या बाजूस आणि तुटक रेषेने जोडलेले अणू प्रतलाच्या खालच्या बाजूस येतात. [→ त्रिमितीय रसायनशास्त्र].

जपानी मिंटच्या (मेंथा अर्व्हेन्सिस) तेलात याचे प्रमाण ७५–९० टक्के व पेपरमिंटच्या (मेंथा पायपेरेटा) तेलात ५०–६५ टक्के असते. इतर बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) तेलांतही ते अल्प प्रमाणात आढळते.

 l – मेंथॉल शुद्ध रूपात वेगळे करण्यासाठी जपान मिंट तेल प्रथम १५° से.तापमानाइतके थंड करतात व अलग झालेले स्फटिक केंद्रोत्सारणाने (यांत्रिक साहाय्याने जोराने घूर्णन करून मिश्रणातील जड व हलके पदार्थ वेगळे करण्याच्या तंत्राने) काढून घेतात. त्यानंतर उरलेले तेल अनुक्रमे ५° से. व –१०° से. याप्रमाणे थंड करून दर वेळी बाहेर पडणारे स्फटिक वरीलप्रमाणेच वेगळे काढतात. शेवटी राहिलेल्या तेलात ४०–५० टक्के मेंथॉल व मेंथोन यांचे मिश्रण असते. त्यातील मेंथॉल काढून घेण्यासाठी मेंथोनाचे ऑक्झाइम बनवितात व मिश्रण ईथरमध्ये विरघळवितात. या विद्रावातून मेंथोन ऑक्झाइम विरल सल्फयूरिक अम्लात विरघळवून घेता येते व l – मेंथॉल शिल्लक राहते.

संश्लेषणाने (योग्य प्रारंभिक पदार्थापासून रासायनिक क्रियांनी) मेंथॉल बनविण्याच्या कृतीत थायमॉलचे हायड्रोजनीकरण (रेणूमध्ये हायड्रोजन अणू मिळविणे) करतात. मेंथॉल व त्याचे समघटक (घटक अणू तेच परंतु त्यांची संरचना वेगळी असल्यामुळे गुणधर्मांत भेद असलेले पदार्थ) मिळून ८ संयुगे ४ बहिःपूरित (एक प्रतली प्रकाशाचे मूळचे प्रतल उजवीकडे फिरविण्याच्या गुण असलेला पदार्थ व ते तितकेच परंतु डावीकडे फिरविण्याचा गुण असलेला त्याचा प्रकार यांचे मिश्रण) प्रकारांच्या रूपाने निर्माण होतात. त्यांपैकी d l – मेंथॉल यापासून l – मेंथॉल वेगळे करतात. सिट्रोनेलाच्या तेलातील d – सिट्रोनेलल या पदार्थापासूनही l – मेंथॉल बनविता येते.

l – मेंथॉल हे एक एकवलयी (कार्बन अणूंच्या मालिकेची टोके एकमेकांस जोडल्यामुळे बनणारे एकच वलय असलेले), संतृप्त (द्विबंध अथवा त्रिबंध नसलेले) द्वितीयक टर्पिनी अल्कोहॉल [ज्यामध्ये CHOH गट आहे असे टर्पिन वर्गाचे अल्कोहॉल → टर्पिने अल्कोहॉल] आहे. याचे स्फटिक पांढरे, तीव्र वासाचे, जिभेला थंड वाटणारे व स्वादिष्ट असतात. याचा वितळबिंदू ४२°·५से. आणि उकळबिंदू २१६°·३ से. असून ते पाण्यात न विरघळणारे पण अल्कोहॉल व ईथर यांमध्ये विरघळणारे आहे. वितळलेल्या स्थितीत याचे विशिष्ट घूर्णन (१ मिलि. पदार्थाने सोडियमाच्या प्रकाशात व दर्शविलेल्या तापमानास, एक प्रतली प्रकाशाचे प्रतल जितक्या अंशाने फिरविले जाते तो आकडा उणे चिन्ह प्रतल डावीकडे जाते हे व्यक्त करते) [α]D४६°  : – ४९·५२ असते.

त्वचेवर लावण्याच्या व चोळण्याच्या औषधांत, श्वसन मार्गाचे पूतिरोधक, तसेच स्थानिक शुद्धिहारक म्हणून ते वापरले जाते. दंतधावने, गुळण्या करण्याची द्रावणे, च्युइंग गम, मेवामिठाई व काही सिगरेटींमध्ये स्वाददायक म्हणून त्याचा उपयोग केला जातो.

मिठारी, भू. चिं.