व्हिल्‌श्टेटर, रिखार्ट : (१३ ऑगस्ट १८७२–३ ऑगस्ट १९४२). जर्मन कार्बनी रसायनशास्त्रज्ञ. हरितद्रव्य आणि इतर वनस्पती रंगद्रव्ये यांच्या संरचनांसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १९१५ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले.    

व्हिल्‌श्टेटर यांचा जन्म कार्लझूए (जर्मनी) येथे झाला. कोकेन या ⇨ अल्कलॉइडाच्या संरचनेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना म्यूनिक विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी मिळाली (१८९४). तेथेच आडोल्फ बेयर यांच्या समवेतच्या कार्यकाळात त्यांनी अनेक अक्ललॉइडे संश्र्लेषाणाने तयार केली. १९२४ साली त्यांनी आपल्या ज्यू बांधवांवरील अन्यायाच्या निषेधार्थ म्यूनिक विद्यापीठातील प्राध्यापक पदाचा त्याग केला. झुरिक, बर्लिन येथेही त्यांनी सेवाकार्य केले. नंतर मात्र त्यांनी खाजगीरीत्याच संशोधनकाऱ्याला वाहून घेतले.    

व्हिल्‌श्टेटर यांनी आइनहॉर्न यांच्याबरोबर कोकेनच्या संरचनेसंबंधी संशोधन केले. १८९४ – ९८ या कालावधीत त्यांनी कोकेनशी संबंधित असलेल्या ट्रॉपीन अल्कलॉइडांचे संश्र्लेषाणात्मक संशोधन केले. ही अल्कलॉइडे व्द्विवलयी संयुगे असून त्यांमध्ये सात घटक असतात असे त्यांनी दाखविले. १९०० साली त्यांनी प्रोलिन हे ॲमिनो अम्ल कृत्रिम रीतीने तयार केले. १९१३ मध्ये त्यांनी सायक्लोऑक्टॅटेट्रीन हे संयुग तयार केले. १९१८ मध्ये त्यांनी इकोगोनाइन या संयुगाचे संश्र्लेषण स्पष्ट केले.

व्हिल्‌श्टेटर यांनी कार्बनी रसायनशास्त्रातील क्विनोने आणि क्विनोन इमिने या शाखेवर प्रकाश टाकला. १९०५मध्ये त्यांनी ऑर्थोबेझोक्विनोन हे संयुग तयार केले. १९०५ – १४ या कालावधीत झुरिक येथे वनस्पती रंगद्रव्याचे (विशेषत: हरितद्रव्य, कॅरोटिनॉइडे आणि अँथोसायनिने यांचे) संशोधन केले. [→ अँथोसायनिने व अँथोझँथिने]. त्यांनी हिरव्या वनस्पतींतील हरितद्रव्याचे दोन घटक (क्लोरोफिल-ए आणि -बी) वेगळे केले. हे घटक पॉर्फिरीन अनुजाताचे (फिओफायटीन) मॅग्नेशियम जटिल संयुगे असल्याचे व त्यांमधील दोन कारबॉक्सिल (-COOH) गटांपैकी एकाचे दीर्घ शृंखला अल्कोहॉलाने (फायटॉल) एस्टरीकरण होत असल्याचे त्यांनी दाखविले [→ हरितद्रव्य]. पहिल्या महायुद्धामुळे त्यांच्या काऱ्यात खंड पडला व त्यांनी वायुमुखवटा विकसित करण्याकडे लक्ष वळविले.

पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी आपले लक्ष एंझाइमांच्या स्वरूपाकडे वळविले. एंझाइमे हे जीव नसून रासायनिक द्रव्ये आहेत, हे सिद्ध करण्यास त्यांनी पुष्कळ संशोधन केले. एंझाइमांचे स्वरूप प्रथिनासारखे नाही, हे त्यांचे मत १९३० साली खोडून काढण्यात आले. १९१८ – २५मध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध एंझाइमांच्या (लायपेज, ट्रिप्सिन, पेरॉक्सिडेज आणि अमिलेज) शुद्धीकरण पद्धतींचा विकास करण्याचा प्रयत्न केला.

लोकार्नो (स्वित्झर्लंड) येथे ते मृत्यू पावले.                       

सूर्यवंशी. वि. ल.