यूरी, हॅरल्ड क्लेटन : (२९ एप्रिल १८९३ – ६ जानेवारी १९८१). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. ड्यूटेरियमाच्या [⟶ ड्यूटेरियम, ट्रिटियम व जड पाणी] शोधाबद्दल त्यांना १९३४ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

यूरी यांचा जन्म अमेरिकेतील वॉकरटन (इंडियाना) शहरी व शालेय शिक्षण वॉटर्लू (इंडियाना) येथे झाले. १९११ – १४ दरम्यान त्यांनी तेथेच शिक्षक म्हणून काम केले. १९१७ साली त्यांनी माँटॅना विद्यापीठाची पदवी मिळविली. नंतर दोन वर्षे त्यांनी युद्धसामग्री तयार करण्याच्या कारखान्यात व पुढे दोन वर्षे (१९१९ – २१) माँटॅना विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. कॅलिफोर्निया विद्यापीठात जी. एन्‌. लूइस यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी १९२३ साली रसायनशास्त्रातील डॉक्टरेट पदवी मिळविली. तदनंतर एक वर्ष नील्स बोर यांच्याबरोबर कोपनहेगन येथे संशोधन केल्यावर १९२४ – २९ या काळात त्यांनी अमेरिकेतील जॉन हॉप्‌किन्स विद्यापीठात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. ते कोलंबिया (१९२९ – ४५), शिकागो (१९४५ – ५८) व तदनंतर कॅलिफोर्निया या विद्यापीठांत प्राध्यापक होते. शिवाय दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते कोलंबिया विद्यापीठातील एस ए एम प्रयोगशाळेचे संचालक होते.

इ. स. १९३१ साली त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ड्यूटेरियमाचा शोध लावला व त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. ड्यूटेरियम व जड पाणी यांचा अणुबाँब तयार करण्याच्या कामी फार उपयोग होतो किंबहुना ड्यूटेरियमामुळेच अणुबाँबची शक्यता निर्माण झाली [⟶ ड्यूटेरियम, ट्रिटियम व जड पाणी अणुऊर्जा]. ड्यूटेरियमाचा शांततामय कामासाठी उपयोग केल्यास त्यापासून तयार होणारी ऊर्जा जगाला अब्जावधी वर्षे पुरू शकेल, असे त्यांचे मत होते.

मूलद्रव्यांच्या समस्थानिकांच्या [अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांच्या] रासायनिक गुणधर्मांतील फरकांवरून यूरी यांनी जुरासिक (सु. १८·५ ते १३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील पृथ्वीवरच्या महासागरांचे तेव्हाचे तापमान काढण्याची पद्धती शोधून काढली. या अभ्यासामुळे ते भूरसायनशास्त्राकडे वळले आणि त्यांनी मूलद्रव्ये व त्यांचे समस्थानिक यांच्या पृथ्वीवरील विपुलतेची कोष्टके तयार केली. १९५० च्या सुमारास त्यांनी या विषयावरील संशोधनपर लेख प्रसिद्ध केले. त्यामुळे पृथ्वीचा जन्म कसा झाला असावा, तिच्यावर आढळणारी मूलद्रव्ये कशी निर्माण झाली असावीत इ. बाबींवर चांगलाच प्रकाश पडला.

जीवोत्पत्तीसंबंधी त्यांनी व त्यांचे विद्यार्थी स्टॅन्ली मिलर यांनी १९५१ साली शिकागो विद्यापीठात एक अभिजात प्रयोग केला. त्यांनी एका बंद नळीत मिथेन, अमोनिया व पाण्याची वाफ यांच्या मिश्रणातून वरचेवर विद्युत्‌ स्फुल्लिंगांचे विसर्जन केले. एका आठवड्यात त्या मिश्रणाला तांबडा रंग आला आणि त्याचे विश्लेषण केले असता त्यात ॲमिनो अम्लांचे जटिल मिश्रण तयार झाल्याचे आढळले. ॲमिनो अम्ले प्रथिनांचे मूलभूत घटक आहेत [⟶ ॲमिनो अम्ले] या प्रयोगाने पृथ्वीवरील मूळ वातावरण क्षपक [⟶ क्षपण] होते व क्षपक वातावरणात जीवोत्पत्ती झाली असावी, या कल्पनेला आधार मिळाला [ जीवोत्पत्ति]. यांशिवाय यूरी यांनी विश्वोत्पत्ती, रेणूंची संरचना, शोषण मर्णपट [⟶ वर्णपटविज्ञान] इ. विषयांचेही संशोधन केले.

ॲटम्स, मॉलिक्यूल्स अँड क्वांटा (१९३०) व द प्लॅनेट्स (१९५२) ही पुस्तके त्यांनी लिहिली असून अनेक विद्यापीठांनी त्यांचा सन्मान केला होता. ते ला हॉइया (कॅलिफोर्निया) येथे मृत्यू पावले.

घाटे, रा. वि. जमदाडे, ज. वि.