रासायनिक संयुगे : ज्या पदार्थाचे रेणू दोन अथवा अधिक व भिन्न अशा मूलद्रव्यांच्या अणूंचे बनलेले असतात त्याला रासायनिक संयुग म्हणतात. हे अणू रासायनिक संयोगाने एकत्र झालेले असतात. रासायनिक संयोग म्हणजे मूलद्रव्ये एकमेकांत केवळ मिसळल्याने बनलेले मिश्रण नव्हे. मिश्रण व संयुग यांमध्ये पुढील भेद महत्त्वाचे आहेत. मिश्रणातील घटकांची प्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे आपण हवी तशी बदलू शकतो पण संयुगातील घटकांची सापेक्ष वजनी प्रमाणे निश्चित असतात. उदा., पाण्याच्या रेणूमध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन यांची प्रमाणे नेहमी ८:१ असतात.

मिश्रणाचे गुणधर्म म्हणजे त्यातील घटकांच्या गुणधर्मांची गोळाबेरीज असते, याउलट संयुगाचे गुणधर्म त्याच्या घटकांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. उदा., मीठ हे सोडियमव क्लोरीन या मूलद्रव्यांचे संयुग आहे. यातील सोडियम हा एक विक्रियाशील धातू आहे, तर क्लोरीन हा एक विषारी वायू आहे पण मीठ हे बिनविषारी व जीवनावश्यक घन पदार्थ आहे.

मिश्रणाचे घटक साध्या भौतिक किंवा यांत्रिक क्रियांनी वेगळे करता येतात.उदा., लोखंडाचा कीस व गंधक यांच्या मिश्रणातील लोखंडाचे कण लोहचुंबकाने वेगळे काढता येतात पण लोखंड व गंधक यांपासून बनलेल्या संयुगाचे घटक वेगळे करण्यास रासायनिक संस्कार करावे लागतात आणि ते भौतिक व यांत्रिक क्रियांपेक्षा जास्त गुंतागुंतीचे असतात.

संयुग बनताना घटकांमध्ये जी रासायनिक विक्रिया होते तीमधून उष्णता, प्रकाश यांसारखी ऊर्जा निर्माण होते अथवा त्या विक्रियेसाठी ऊर्जा पुरवावी लागते. मिश्रण होताना असे होत नाही. [⟶ मिश्रण].

रासायनिक संयुगाचे संघटन म्हणजे त्या संयुगाचा रेणू ज्या मूलद्रव्यांच्या अणूंचा बनला आहे ती मूलद्रव्ये आणि रेणूतील त्यांच्या अणुसंख्या व्यक्त करणारे सूत्र होय. उदा., सोडियम कोर्बोनेट याचे संघटन Na2CO3 आहे. याचा अर्थ त्याच्या रेणूत सोडियमाचे २, कार्बनाचा १ व ऑक्सिजनाचे ३ अणू असतात. यालाच संयुगाचे रेणूसूत्र असेही म्हणतात. संयुगाचे गुणधर्म त्याच्या रेणूतील मूलद्रव्ये व त्यांच्या अणुसंख्या एवढ्यावरच केवळ अवलंबून नसतात. रेणूमध्ये ते अणू एकमेकांस कसे जोडले गेले आहेत यावरूनही ते ठरतात. जोडणीप्रकार स्पष्ट करणार्याच सूत्राला ‘संरचना’ ही संज्ञा लावतात.उदा.,C2H6O संघटनेच्या, H3C−CH2–OH (एथिल अल्कोहॉल ) व H3C–O–CH3 (डायमिथिल ईथर) अशा दोन संरचना होतात. त्यामुळे या एकाच संघटनेची दोन भिन्न संयुगे अस्तित्वात आहेत. त्यांचे गुणधर्म वरील संरचनांनी स्पष्ट होतात. या आविष्काराला ‘समघटकता’ असे म्हणतात. एथिल अल्कोहॉल व डायमिथिल ईथर ही संयुगे एकमेकांचे सममेकांचे समघटक होत. [⟶ समघटकता].

संयुगांचे संघटन व संरचना निश्चित असतात तसेच त्यांचे गुणधर्म, उदा., घनता, प्रणमनांक (निर्वातातील प्रकाशाचा वेग व दिलेल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग याचे गुणोत्तर) इ. विशिष्ट परिस्थितीत कायम असतात व त्यांचा उपयोग संयुगाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केला जातो . संयुगांचे स्थैर्य घटकद्रव्यांच्या विक्रियाशीलतेवर अवलंबून असते. एखाद्या संयुगाच्या अपघटनासाठी (रेणूचे तुकडे करण्यासाठी) किती ऊर्जा (उष्णता किंवा विद्युत् प्रवाह) लागते ते निश्चित करता येते. स्थिर संयुगाच्या अपघटनासाठी लागणारी ऊर्जा अस्थिर संयुगाच्या अपघटनाकरिता लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्त असते.

वर्गीकरण : संयुगांचे वर्गीकरण हे संयुगाचे संघटन, त्याची संरचना, ते कोणत्या प्रकारे निर्माण झाले आहे व त्याच्या विविध विक्रिया कोणत्या यांना अनुसरून मुख्यतः केले जाते.

संघटनानुसार वर्गीकरण : एकोणिसाव्या शतकाच्या आधीच्या काळात सजीवांत म्हणजेच इंद्रिये असलेल्या कोटीमध्ये आढळणाऱ्या अथवा त्यांच्यापासून मिळणाऱ्या संयुगांना (उदा., वनस्पतिज व प्राणिज तेले) सेंद्रिय किंवा जैव (ऑर्गॅनिक) तर खनिजांसारख्या निर्जीव पदार्थापासून मिळणाऱ्या संयुगांना (उदा., मीठ, चुनखडी) निरिंद्रिय किंवा अजैव (इनऑर्गॅनिक) संयुगे असे म्हणण्यात येई. सेंद्रिय संयुगे सजीवाच्या मदतीविना खनिजापासून मिळणाऱ्या संयुगांपासून प्रयोगशाळेत कृत्रिम रीतीने तयार करता येणार नाहीत असा समज प्रथम होता. तो चुकीचा आहे असे फ्रीड्रिख व्हलर यांनी लेड सायनेट व अमोनियम क्लोराइड यांच्या विक्रियेने यूरिया हा प्राणिज पदार्थ १८२८ मध्ये तयार केल्यावर सिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी वापरण्यात येणारे सेंद्रिय हे नाव जरी टिकून राहिले तरी त्याचा अर्थ कार्बनी संयुगे असा करण्यात आला आहे. तथापि कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डाय-ऑक्साइड यांसारख्या कार्बनाच्या ऑक्सिजनाबरोबरच्या साध्या संयुगांचा तसेच कार्बाइडे, कार्बोनेट व कार्बनयुक्त खनिजे यांचा समावेश (उदा., कॅल्साइट, डोलोमाइट) कार्बनी संयुगांत करीत नाहीत. कार्बनाशिवाय इतर मूलद्रव्यांच्या संयुगांना निरिंद्रिय संयुगे म्हटले तरी त्याचा अर्थ अकार्बनी संयुगे असाच घेण्यात येतो.

कार्बनी संयुगे : आज माहीत असलेल्या शंभराहून थोड्या जास्त मूलद्रव्यांपैकी कार्बन हे एक मूलद्रव्य असले, तरी कार्बनच्या संयुगांची संख्या इतर सर्व मूलद्रव्यांच्या संयुगांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त आहे. कार्बनाचा अघातवीय मूलद्रव्यांबरोबरच नव्हे तर स्वतःच्या अणूंबरोबरही रासायनिक संयोग होऊ शकत असल्याने त्याची एवढी संयुगे तयार होऊ शकतात. कार्बनाचे अणू एकमेकींना साखळीच्या रूपात किंवा वलयाच्या अथवा या दोन्हींच्या रूपांत जोडले जाऊन संयुगाच्या रेणूचा मूळ सांगाडा (साटा) तयार होतो. त्याला इतर मूलद्रव्यांचे अणू विविध प्रकारे जोडले जाऊन असंख्य कार्बनी संयुगे बनतात. कार्बन अणूंच्या शृंखलेतील कार्बन अणूंची संख्या शेकडो कार्बन अणू इतकी मोठी असू शकते. साध्या सरळ शृंखलांची बनलेली कार्बनी संयुगे वसायुक्त (स्नियग्ध पदार्थयुक्त) द्रव्यात आढळत असल्याने त्यांना ॲलिफॅटिक ( ॲलिफार या ग्रीक शब्दाचा अर्थ वसा आहे त्यावरून) संयुगे म्हणतात. कधीकधी या शृंखलांमध्ये शाखा आणि इतर अणूही असू शकतात. त्याचप्रमाणे कार्बनी शृंखलेची टोके एकमेकांस जोडली जाऊन वलयी संरचना बनतात. अशा संरचनेच्या संयुगांना ॲरोमॅटिक (सुवासिक) संयुगे म्हणतात. कारण प्रथम ही संयुगे दगडी कोळशाच्या डांबरापासून मिळविण्यात येत असत व त्यांना एक प्रकारचा वास (कधी सौम्य तर कधी उग्र असा) असतो असे आढळले. बेंझीन हे सरळ शृंखला असणारे संयुग नसून सहा कार्बन अणूंचे वलय आहे, हा एस् ‍एफ्. फोन केकूले यांचा शोध रसायनशास्त्रातील एक मूलभूत शोध ठरला. कार्बनी संयुगांचे ॲलिफॅटिक (शृंखलायुक्त) व ॲरोमॅटिक (वलयी) असे वर्गीकरण करणे स्वाभाविक ठरते कारण या दोन प्रकारच्या संयुगांमध्ये बराच भेद आहे.

कार्बनी संयुगात पुष्कळदा अणूंचे विशिष्ट गट आढळतात. ते विक्रियेत सुकरतेने भाग घेतात म्हणून या गटांना कार्यकारी गट म्हणतात.या गटांचा रासायनिक संयुगाच्या वर्तनावर प्रभाव पडत असल्याने त्यांना अनुसरूनही कार्बनी संयुगांचे वर्गीकरण करणे सोयीचे ठरते. अशा वर्गीकरणानुसार कार्बनी संयुगांचे पुढील मुख्य प्रकार होतात : अल्कोहॉले, ईथरे, आल्डिहाइडे , कीटोने, कार्बॉक्सिलिक अम्ले इत्यादी.

प्राण्यांच्या आहारातील महत्त्वाचे घटक (वसा, प्रथिने व कार्बोहायड्रेटे), महत्त्वाची जीवरासायनिक द्रव्ये (हीमोग्लोइबिन, हरितद्रव्य, एंझाइमे, हॉर्मोने व जीवनसत्त्वे), नेहमीच्या वापरण्यातील कित्येक वस्तू (सुती, लोकरी, रेशमी व कृत्रिम तंतू, विविध इंधने (लाकूड, दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू), वस्तू टिकावी म्हणून तिच्या पृष्ठावर लावण्याचे संरक्षण लेप (व्हार्निश, रंगलेप , लॅकर व एनॅमल), प्रतिजैव (अँटिबायॉटिक) व संश्लेषित (कृत्रिम रीत्या तयार एनॅमल), औषधे, रबर, रंजकद्रव्ये, प्लॅस्टिके आणि पीडकनाशके ही सर्व कार्बनी संयुगे होत. यांपैकी काही संश्लेषित द्रव्यांची निर्मिती व वापर करताना जी द्रव्ये निर्माण होतात त्यांनी प्रदूषण होण्याचा संभव असतो म्हणून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उग्र होत चालला आहे आणि त्यासाठी भौतिक व जैव प्रक्रियांचाही एकत्रितपणे वापर केला जातो .

स्वतःच्या अणूंच्या शृंखला व वलये बनविणे हा वैशिष्ट्यपूर्ण गुण कार्बनाच्या अंगी असल्यामुळे त्याची असंख्य संयुगे बनतात. कार्बनी संयुगांचे नामकरण अचुकतेने व सुटसुटीतपणे करता यावे यासाठी एक नामकरण पद्धती वापरली जाते. ही पद्धती कमीत कमी गुंतागुंतीची असून बहुसंख्य कार्बनी संयुगांसाठी वापरता येते. या नामकरण पद्धतीचा विचार प्रथम १८९२ सालच्या जिनीव्हा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत झाला. १९३० साली ल्येझ (बेल्जियम) येथे झालेल्या इंटरनॅशनल युनियन ऑफ केमिस्ट्रीच्या बैठकीत या पद्धतीत सुधारणा करून ती व्यापक करण्यात आली. १८४९ सालानंतर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री या संघटनेच्या देखरेखीखाली या पद्धतीचा विकास करण्यात येत आहे. [⟶ कार्बनी रसायनशास्त्र].

कार्बनी संयुगांचे प्रमुख गट पुढीलप्रमाणे आहेत : हायड्रोकार्बने, अल्कोहॉले, फिनॉले, ईथरे, आल्डिहाइडे व कीटोने, कार्बॉक्सिलिक अम्ले व त्यांचे अनुजात (त्यांपासून बनलेली इतर संयुगे), कार्बनी हॅलोजनी संयुगे तसेच नायट्रोजनयुक्त, फॉस्फरसयुक्त, गंधकयुक्त कार्बनी संयुगे, अल्कलॉइडे, आयसोप्रिनॉइडे, स्टेरॉइडे, रंजकद्रव्ये, रंगद्रव्ये, विषमवलयी संयुगे व बहुवारिके.

वनस्पती, प्राणी, दगडी कोळसा, खनिज तेल इ. नैसर्गिक पदार्थांतपासून अनेक कार्बनी संयुगे मिळविण्यात येतात व कित्येक संश्लेषित केली जातात. संयुगाची संरचना म्हणजेच त्याच्या रेणुमधील अणु एकमेकांना कोणत्या तऱ्हेने जोडले आहेत ती तऱ्हा ठरविण्यासाठी अवरक्त प्रारण शोषण वर्णपटाचा [⟶ अवरक्त प्रारण] उपयोग रासायनिक विक्रियांबरोबर करणे फार उपयुक्त ठरते. संयुगांचा उकळबिंदू, वितळबिंदू, विविध विद्रावकांतील (विरघळविणाऱ्या द्रव्यांतील) विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) यांच्या मदतीने विशिष्ट संयुग ओळखता येते. कधीकधी यासाठी घनता, बाष्पदाब व श्यानता (दाटपणा) हे गुणधर्मही मोजतात. [⟶ कार्बनी रसायनशास्त्र].

अकार्बनी संयुगे : यांच्या वर्गीकरणाला आवर्त सारणीची [मुलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या काष्टकरूप मांडणीची ⟶ आवर्त सारणी] मदत होते. एका विशिष्ट मूलद्रव्याच्या सर्व संयुगांचा मिळून एक गट करणे हा या संयुगांच्या वर्गीकरणाचा एक सोयीस्कर मार्ग आहे. असे वर्गीकरण दोन मूलद्रव्यांच्या अणूंपासून बनलेल्या (द्वि-अंगी) संयुगांच्या बाबतींत विशेष उपयोगी आहे. सोडियम व क्लोरीन या दोन मूलद्रव्यांपासून सोडियम क्लोराइड (मीठ) बनते. इतर धातूंची क्लोराइडे माहीत असून या सर्व क्लोराइडांचा एक गट बनतो व तो विशिष्ट प्रकारच्या वर्गीकरण पद्धतीत उपयुक्त ठरतो. असे वर्गीकरण क्लोरिनाशी संबंधित असलेल्या मूलद्रव्यांनाही लागू करून व्यापक बनविता येते. क्लोरिनाशी संबंधित असलेल्या आयोडिन, ब्रोमीन इ. मूलद्रव्यांना हॅलोजने म्हणतात आणि त्यांच्यापासून बनणाऱ्या अशा द्वि-अंगी संयुगांना हॅलोइडे म्हणतात. हॅलाइडे हा विस्तारित वर्गीकरणाचा एक गट होतो. अशाच प्रकारच्या एका मूलद्रव्याच्या द्वि-अंगी संयुगांच्या गटाची ऑक्साइडे, हायड्राइडे व सल्फाइडे ही उदाहरणे होत. हॅलोजनांप्रमाणे आवर्त सारणीच्या उभ्या गटातील मूलद्रव्यांच्या संयुगांमध्ये साधर्म्य आढळते व त्यांचे गट होऊ शकतात. उदा., सर्व क्षार (अल्कली) धातूंची क्लोराइडे किंवा क्षारीय मृत्तिका ऑक्साइडे वगैरे.

दोनापेक्षा अधिक मूलद्रव्यांच्या बनलेल्या अकार्बनी संयुगांच्या वर्गीकरणासाठी या वर्गीकरणाच्या तत्त्वासारखेच तत्त्व लागू पडते. उदा., सल्फेटे, सिलिकेटे, क्षार स्लफेटे, क्षारीय मृत्तिका सिलिकेटे, संरचनात्मक वर्गीकरणानुसार अकार्बनी संयुगांची लवणे, ऑक्साइडे, ॲनहायड्राइडे, अम्ले, क्षारक, शृंखलाबद्ध बहुवारिके इ. प्रकार होतात.

द्वि-अंगी संयुगांना नावे देण्याच्या अनेक स्वाकार्य पद्धती आहेत. कोणत्या पद्धतीचा उपयोग करावयाचा हे त्या त्या विशिष्ट संयुगातील मूलद्रव्यांच्या रसायनशास्त्राच्या जटिलतेवर आणि त्या संयुगाच्या संरचनेच्या जटिलतेवरही अवलंबून असते.

धन-विद्युती [ज्यांच्या ऑक्सिडीकरण अवस्था फक्त धन आहेत अशा ⟶ ऑक्सिडीभवन] व ज्यांच्या ⇨संयुजा बदलत नाहीत अशा मूलद्रव्यांच्या (उदा., क्षार व क्षारीय मृत्तिका मूलद्रव्यांच्या) संयुगांच्या नावाच्या बाबतीत प्रथम धन-विद्युती मूलद्रव्यांचे नाव व त्यानंतर उच्चारण्यास सुलभ होईल असे बनविलेले ऋण-विद्युती (ऑक्सिडीकरण अवस्था ऋण असलेल्या) मूलद्रव्यांचे- ‘आइड’ (−ide) असा शेवट होणारे रूपांतरित नाव देण्यात येते. उदा., सोडियम व क्लोरीन यांच्या साध्या संयुगाला सोडियम क्लोराइड (NaCl), कॅल्शियम व गंधक यांच्या संयुगाला कॅल्शियम सल्फाइड (CaS), मॅग्नेशियम व नायट्रोजन यांच्या संयुगाला मॅग्नेशियम नायट्राइड (Mg3N2) आणि ॲल्युमिनियम व बोरॉन यांच्या संयुगाला ॲल्युमिनियम बोराइड (AIB12) अशी नावे देण्यात येतात.

जर द्वि-अंगी संयुगातील धन-विद्युती मूलद्रव्यांच्या अनेक ऑक्सिडीकरण अवस्था शक्य असतील, तर त्या धन-विद्युती मूलद्रव्याच्या नावानंतर कंसात ऑक्सिडीकरण अवस्था दर्शविणारा रोमन अंक देतात. उदा., FeCI2 असे रेणुसूत्र असलेल्या संयुगाला आयर्न (II) क्लोराइड व FeCI3 असे रेणुसूत्र असलेल्या संयुगाला आयर्न (III) क्लोराइड अशी नावे देतात. याचप्रमाणे CuCl म्हणजे कॉपर (I) क्लोराइड, SnBr4 म्हणजे टिन (IV) ब्रोमाइड, NO2 म्हणजे नायट्रोजन (IV) ऑक्साइड आणि SF6 म्हणजे सल्फर (VI) फ्ल्युओराइड होय. यापूर्वीच्या जुन्या पद्धतीत धन-विद्युती मूलद्रव्याची ऑक्सिडीकरण अवस्था दर्शविण्यासाठी त्याच्या नावाला निरनिराळे प्रत्यय जोडीत असत. उदा., या जुन्या पद्धतीत आयर्न (II) क्लोराइड याचे नाव फेरस क्लोराइड आणि आयर्न (III) क्लोराइड याचे नाव फेरिक क्लोराइड असे देण्यात येत असे. मराठी विश्वकोशात सर्वसाधारणपणे ही जुनी पद्धतच वापरलेली आहे.

दुसऱ्या एका पद्धतीप्रमाणे जेव्हा त्याच दोन मूलद्रव्यांची निरनिराळी संयुगे ज्ञात असतील तेव्हा दिलेल्या संयुगातील मूलद्रव्यांची प्रमाणे दर्शविण्यासाठी लॅटिन व ग्रीक पूर्वप्रत्यय वापरण्यात येतात. या पद्धतीप्रमाणे N2O याला डायनायट्रोजन ऑक्साइड, N2O3 याला डायनायट्रोजन ट्राय-ऑक्साइड, N2O4 याला डायनायट्रोजन टेट्रोक्साइड. N2S6 याला डायनायट्रोजन पेंटासल्फाइड, S2Cl2 याला डायसल्फर हायक्लोराइड, AI2Cl6 याला डायॲल्युमिनियम हेक्झॅक्लोराइड व CIo3 याला क्लोरीन ट्रायॉक्साइड अशी नावे देण्यात येतात.

द्वि-अंगी अम्‍लांची नावे नमुनेदार द्वि-अंगी संयुगाप्रमाणे (उदा., HCI करिता हायड्रोजन क्लोराइड, H2S करिता हायड्रोजन सल्फाइड) किंवा हायड्रो-हा पूर्वप्रत्यय व −इक (-ic) अम्लद हा प्रत्यय (उदा., HCI करिता हायड्रोक्लोरिक अम्ल,, H2S करिता हायड्रोजन सल्फ्यूरिक अम्लय) लावून देण्यात येतात.

द्वि-अंगी संयुगाच्या काही वर्गांच्या बाबतीत, विशेषतः हायड्रोजनाच्या अनुजातांच्या बाबतीत, सर्व सामान्य नावांवर आधारलेली पद्धती वापरण्यात येते. उदा., H2O पाणी, NH3 अमोनिया, N2H4 हायड्रॅझीन, B2H6 डायबोरेन, SiH4 सिलेन.

बोरॉनाच्या हायड्राइडांना बोरेन म्हणतात आणि त्यांची नावे देताना त्यातील बोरॉन अणूंची संख्या लॅटिन वा ग्रीक पूर्वप्रत्ययाने व हायड्रोजन अणूंची संख्या संख्यात्मक प्रत्ययाने देतात. उदा., B2H6 डायबोरेन−६, B5H9 पेंटाबोरेन−९, B5H11 पेंटाबोरेन−११, B18H22 ऑक्टॅडेकाबोरेन−२२.

अनेक त्रि-अंगी संयुगे ही ऑक्सिजन अम्ले वा त्यांची लवणे मानता येतात. बहुतेक सर्वसामान्य ऑक्सिजन अम्लांची नावे हीच नामकरण पद्धती वापरून बनविलेली प्रचलित आहेत. ती नावे सुपरिचित असल्याने तीच प्रचारात राहिलेली आहेत.उदा., सहसंबद्ध संयुगांच्या (यांची माहिती पुढे दिलेली आहे) नामकरण पद्धतीनुसार या संयुगांना पद्धतशीर नावे देता येणे शक्य आहे पण अशी नावे फार अवघड होत असल्याने सामान्य नावे वापरणेच पसंत केले जाते. काही सुपरिचित त्रि-अंगी अम्लांची व संबंधित धनायनांची (विद्युत् विच्छेदनात धनाग्राकडे जाणार्याव ऋण विद्युत् भारित अणुगटांची) यादी कोष्टकात दिलेली आहे.

लवणांची (मूळ अम्लांतील हायड्रोजनाच्या जागी इतर मूलद्रव्ये येऊन तयार होणाऱ्या त्रि-अंगी संयुगांची) नावे द्वि-अंगी संयुगांच्या नावाच्या नियमांप्रमाणेच देण्यात येतात. मात्र यात अम्लातील धनायन जास्त ऋण-विद्युती घटकांप्रमाणे कार्य करतो. जर एक वा अधिक हायड्रोजन अणू उरलेले असतील, तर हायड्रोजनाचा दुसरा धनविद्युती घटक म्हणून निर्देश करतात. उदा., KHSO4 पोटॅशियम हायड्रोजन सल्फेट, Na2H2P2O1 डायसोडियम डायहायड्रोजन पायरोफॉस्फेट, KNO3 पोटॅशियम नायट्रेट, NiSO3 निकेल (II) सल्फाइट.

एखाद्या द्रव्याच्या संघटनेत पाणी वा तत्सम रेणू असतील, तर त्याचा निर्देश पाण्याकरिता हायड्रेट (किंवा उदा., अमोनियासाठी अमोनिएट) या शब्दाचा नावात समावेश करून त्याच्या रेणूंची संख्या लॅटिन वा ग्रीक पूर्वप्रत्यय लावून निर्देशित करतात. उदा., Na2SO4.10H2O सोडियम सल्फेट डेकाहायड्रेट, NiSO4.7H2O निकेल (II) सल्फेट हेप्टाहायड्रेट, PtCl4.2NH3 प्लॅटिनम (IV) क्लोराडड डायअमोनिएट.

कार्बनी-धातू संयुगे : कार्बनी संयुगातील कार्बन अणूला जोडलेल्या एका अथवा अधिक हायड्रोजन अणूंच्या जागी धातूंचे अणू ज्यामध्ये आहेत, अशा संयुगांना कार्बनी-धातू संयुगे म्हणतात. उदा.,(C2H5)2Zn. अशी अनेक संयुगे सजीनांमध्ये आढळतात. उदा., रक्तातील हीमोग्लोलबीन हा लोह अणूचा संयोग झालेला एक मोठा कार्बनयुक्त रेणू आहे. हिरव्या वनस्पतींमधील हरितद्रव्यामध्ये एका मोठ्या कार्बनी रेणूशी मॅग्नेशियम अणूचा संयोग झालेला असतो, तर ब१२ जीवनसत्त्व हे कोबाल्टयुक्त कार्बनी-धातू संयुग आहे. अनेक कृत्रिम कार्बनी-धातू संयुगेही विशिष्ट उपयोगासाठी निर्माण केली जातात. उदा., पेट्रोलामध्ये टाकण्यात येणारे टेट्रोएथिल लेड [Pb(C2H5)4]. [⟶ कार्बनी-धातू संयुगे].

त्रि-अंगी अम्लांची सामान्य नावे व संबंधित धनायन

रेणुसूत्र अम्‍लाचे नाव धनायनाचे नाव धनायनाचे सूत्र
H3BO3 ऑर्थोबोरिक बोरेट BO33–
H2CO3 कार्‌बॉनिक कार्बोनेट CO32–
HNO3 नायट्रिक नायट्रेट NO3
HNO2 नायट्रस नायट्राइट NO2
H3PO4 ऑर्थोफॉस्फोरिक फॉस्फेट PO43–
H42O7 पायरोफॉस्फोरिक पायरोफॉस्फेट 2O74–
H53O10 ट्रायफॉस्फोरिक ट्रायफॉस्फेट  3O105–
(HPO3)n मेटाफॉस्फोरिक मेटाफॉस्फेट (PO3)n
(HPO3)3 ट्रायमेटाफॉस्फोरिक ट्रायमेटाफॉस्फेट      (PO3)3
H3PO3 फॉस्फरस फॉस्फाइट  HPO32–
H3PO2 हायपोफॉस्फरस हायपोफॉस्फाइट H2PO2
H2SO5 पेरॉक्सिसल्फ्यूरिक पेरॉक्सिसल्फेट SO52–
H2S2O6 डायथायॉनिक डायथायोनेट S2O62–
H2SO4 सल्फ्यूरिक सल्फेट  SO42–
H2SO3 सल्फ्यूरस सल्फाइट  SO32–
H22O3 थायोसल्फ्यूरिक थायोसल्फेट 2O32–
HClO4 परक्लोरिक परक्लोरेट ClO4
HClO3 क्लोरिक क्लोरेट  ClO3
HClO2 क्लोरस क्लोराइट  ClO2
HClO हायपोक्लोरस हायपोक्लोराइट  ClO
HMnO4 परमँगॅनिक परमँगॅनेट MnO4

नॉनस्टोइकिओमेट्रिक संयुगे : एखाद्या संयुगातील मूलद्रव्यांचे गुणोत्तर (परस्पर सापेक्ष प्रमाण) त्याच्या शुद्ध नमुन्यांचे विश्लेषण केल्याने कळते. ज्या संयुगांमध्ये मूलद्रव्यांचे अणू पूर्णांकी गुणोत्तरात असतात त्यांना स्टोइकिओमेट्रिक (या ग्रीक शब्दाचा अर्थ मूलद्रव्य मोजणारे असा आहे) संयुगे म्हणतात. उदा., बहुसंख्य अकार्बनी व सर्व कार्बनी संयुगे. ज्या संयुगांमध्ये मूलद्रव्यांच्या अणूंच्या सापेक्ष संख्या पूर्णांकी नसतात त्यांना नॉनस्टोइकिओमेट्रिक संयुगे म्हणतात. यांमध्ये ठराविक धातूंची (उदा., आवर्त सारणीच्या ६ब गटातील धातूंची) द्वि-अंगी ऑक्साइडे, सल्फाइडे व हायड्राइडे तसेच आंतरधातवीय संयुगे येतात. उदा., टिटॅनियम ऑक्साइड (TiO1.8), सिरियम सल्फाइड (Ce2.7S4), सिरियम हायड्राइड (CeH2.7). अशा प्रकारे या संयुगांचे संघटन नियत प्रमाण नियमानुसार नसते. त्यांना बर्थोलाइड संयुगे म्हणतात. ही संयुगे इलेक्ट्रॉनीय उद्योगामध्ये वापरण्यात येणाऱ्या घन अवस्था प्रयुक्त्यांचे घटक म्हणून महत्त्वाची आहेत.

रासायनिक बंधाच्या प्रकारानुसार वर्गीकरण : रासायनिक बंधाच्या म्हणजे रेणूतील अणू एकत्र धरून ठेवणाऱ्या प्रबल प्रेरणेच्या प्रकारानुसार संयुगांचे आयनी, सहसंयुजी (वा अध्रुवीय) व सहसंबद्ध (किंवा ध्रुवीय) असे प्रकार होतात.

आयनी संयुगे : या संयुगांची जी घटक मूलद्रव्ये असतात. त्यांपैकी एकाच्या अणूमध्ये स्थिर स्वरूपाचा इलेक्ट्रॉन विन्यास (मांडणी) होण्यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या संख्यपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात. [⟶ अणू व आणवीय संरचना] आणि दुसऱ्या घटकाच्या अणूत स्थिर विन्यासासाठी लागणाऱ्या संख्येपेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात. रासायनिक संयोग होतो तेव्हा जास्त इलेक्ट्रॉन असणारा अणू आपले जादा इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूला देतो व दुसरा इलेक्ट्रॉन ते स्वीकारतो. त्यामुळे ते परस्परविरूद्ध विद्युत् भारित होतात. त्यांना आयन म्हणतात. इलेक्ट्रॉन देणारा अणू धन विद्युत् भारित आयन व ते घेणारा अणू ऋण विद्युत् भारित आयन होतो. या परस्परविरूद्ध विद्युत् भारामुळे त्यांच्यामध्ये रासायनिक बंध निर्माण होतो. सोडियम व क्लोरीन यांच्यापासून सोडियम क्लोराइड [⟶ मीठ] तयार होताना असे घडते. सोडियम अणूच्या बाहेरील कक्षेतून एक इलेक्ट्रॉन निघतो व क्लोरीन अणूच्या बाहेरील कक्षेत तो समाविष्ट होतो. त्यामुळे दोन्ही अणूंच्या बाहेरच्या कक्षेत ८−८ इलेक्ट्रॉन झाल्याने विन्यास स्थिर होतो. मात्र इलेक्ट्रॉन निघून गेल्याने सोडियमचा अणू धन विद्युत् भारित, तर इलेक्ट्रॉन मिळाल्याने क्लोरिन अणू ऋण विद्युत् भारित बनतो. अशा विद्युत् रासायनिक बंधाला आयनी बंध म्हणतात. लवणांमध्ये असे बंध असतात. विशिष्ट हायड्राइडे (उदा., सोडियम हायड्राइड) व ऑक्साइडे (उदा., मॅग्नेशियम ऑक्साइड) यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे ती लवणसदृश वा आयनी संयुगे म्हणून गणली जातात.

सहसंयुजी संयुगे : काही विशिष्ट अणूंचा संयोग होताना वरीलप्रमाणे प्रक्रिया होऊ शकत नाही. यात तयार होणाऱ्या. संयुगाच्या घटक अणूंचे इलेक्ट्रॉन स्थानांतरित होत नाहीत त्याऐवजी दोन इलेक्ट्रॉनांची त्या अणूंमध्ये समान भागीदारी होते व बंध निर्माण होतो. अशा बंधाला सहसंयुजी बंध म्हणतात. बहुतेक कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूचा संयोग होताना (उदा., मिथेन) असे बंध निर्माण होतात. अधातूंच्या अणूंचे संयोग अशाच प्रकारे होतात म्हणून त्यांच्या संयुगांना सहसंयुजी संयुगे म्हणतात. दोन्ही अणू विद्युत् भाररहित झाल्याने असे संयुग ध्रुवणता (म्हणजे विद्युतीय गुणधर्मांतील स्थानिक स्वरूपाची भिन्नता) दर्शवीत नाही म्हणून त्याला अध्रुवीय संयुग असेही म्हणतात. अर्थातच या संयुगांचे आयनीभवन (विद्युत् भारित अणू वा अणुगट निर्माण होण्याची क्रिया) होत नाही व त्यांमधून विद्युत् प्रवाह वाहू शकत नाही. सहसंयुजी रेणु हे परिपूर्ण घटक असतात. यांच्यातील आंतररेणवीय प्रेरणा (आयनांतील) स्थिर विद्युतीय प्रेरणांपेक्षा दुर्बल असतात. म्हणून सहसंयुजी संयुगांचे रेणू आयनांच्या मानाने अधिक सहजपणे एकमेकांपासून दूर ओढले जाऊ शकतात. त्यामुळे सहसंयुजी संयुगांचे वितळबिंदू आयनी संयुगांच्या वितळबिंदूपेक्षा कमी असतात.

सहसंयुजी बंधांच्या निर्मितीच्या यंत्रणेमुळे योग्य परिस्थितीत हजारो अथवा लाखो अणूंचे (कार्बन, सिलिकॉन) प्रचंड लांबीचे रेणू बनू शकतात. यापैकी काही संयुगांमध्ये काही अणूसमुच्चयांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा बृहद्रेणूंना बहुवारिके म्हणतात. उदा., प्रथिने, कार्बोहायड्रेटे, न्युक्लीइक अम्लेण, क्वॉर्ट्झ (सिलिका) आणि इतर सिलिकॉनयुक्त खनिजे (उदा., मृत्तिका व प्लॅस्टिके).

सहसंबद्ध संयुगे : काही स्थिर संयुगांच्या संरचनेत इतर रेणुंचा समावेश झाल्याने स्थिर संयुगे बनतात. अशा संयुगांना सहसंबद्ध संयुगे म्हणतात. उदा., क्युप्रिक सल्फेटाचा एक रेणू (CuSO4) व अमोनियाचे (NH3) चार रेणू यांच्या संयोगातून टेट्राअमाइन क्युप्रिक सल्फेट [Cu(NH8)4So4] हे सहसंबंद्ध संयुग बनते. या संयुगांमध्येही दोन इलेक्ट्रॉन सामाईक म्हणून वापरले जातात परंतु येथे प्रत्येक कार्बन अणू एक एक इलेक्ट्रॉन न देता दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच अणूकडून आलेले असतात. अशा संयुगातील एका अणूची इलेक्ट्रॉन आसक्ती दुसऱ्या पेक्षा जेव्हा जास्त असते, तेव्हा जास्त आसक्ती असलेल्या अणूकडे बंध निर्माण करणारे इलेक्ट्रॉन अधिक आकर्षित होतात व त्यांच्यात ध्रुवीय बंध निर्माण होतो. म्हणून त्यांना ध्रुवीय (विद्युतीय गुणधर्मात स्थानिक भेद दर्शविणारी) संयुगे असेही म्हणतात (उदा., आयोडीन मोनोक्लोराइड). ⇨संक्रमणी मूलद्रव्यांची विविध प्रकारची सहसंबद्ध संयुगे बनतात, त्यांना जटिल संयुगे असेही म्हणतात. त्यासंबंधी या लेखात इतरत्र माहिती दिली आहे.

रक्तामधील हीमोग्लोबिनामधील लोहाच्या अणूला कार्बन मोनॉक्साइडाचा रेणू जोडला जाऊन एक सहसंबद्ध संयुग बनते. या स्थिर संयुगामुळे हीमोग्लोलबीनाची ऑक्सिजन आपल्याबरोबर घेऊन जाण्याची क्षमता नष्ट होते. या कारणामुळेच हीमोग्लोबिनाच्या बहुसंख्य अणूंशी कार्बन मोनॉक्साइडाचा संयोग झाल्यास प्राणी मरतो.

रासायनिक विक्रियाशीलतेनुसार वर्गीकरण : संयुगांच्या विविध विक्रियांमध्ये दिसुन येणाऱ्या वर्तनावरून त्यांच्या रासायनिक गुणधर्मातील साम्य-भेद लक्षात येतात व त्यानुसार पुढे दिल्याप्रमाणे वर्गीकरण केले जाते. रासायनिक संरचनेवर आधारलेल्या वर्गीकरणाशी हे वर्गीकरण चांगले जुळते.

अम्ले, क्षारक व लवणे : पुष्कळ द्रव्ये अम्ला प्रमाणे वागतात (उदा., ताक यात लॅक्टिक अम्ली असते, तर व्हिनेगर यात ॲसिटिक अम्ल असते). दर्शक [⟶ दर्शके] म्हणून वापरण्यात येणाऱ्या रंजकद्रव्यांना वैशिष्ट्यपूर्ण रंग प्राप्त करून देणे हा अम्लांचा एक गुणधर्म आहे, उदा., निळा लिटमस रंग अम्लाअने लाल होतो. अम्लांची पुष्कळ धातूंवर संक्षारक (रासयनिक प्रक्रियेने नष्ट होण्याची) विक्रिया होऊन हायड्रोजन वायू निर्माण होतो. यावरून अम्ले हायड्रोजनयुक्त असल्याचे सूचित होते आणि बहुतेक अम्ले तशी आहेतही. अधातवीय मूलद्रव्यांच्या ऑक्साइडांचे जलीय विद्राव म्हणजे खनिज अम्ले होत (उदा., सल्फ्यूरिक व नायट्रीक ही अम्ले).

क्षारकाची अम्लाची विक्रिया झाल्यास ⇨उदासिनीकरण (अम्लता नष्ट होण्याची क्रिया) होऊन लवण व पाणी तयार होतात. क्षारकांमुळेही दर्शक रंजकद्रव्यांना वैशिष्ट्यपूर्ण रंग प्राप्त होतो (उदा., क्षारकाच्या विद्रावात तांबडा लिटमस कागद बुडविल्यास तो निळा होतो). क्षार हायड्रॉक्साइडे (उदा., दाहक सोडा) आणि क्षारीय मृत्तिकांच्या ऑक्साइडे (उदा., कॅल्शियम ऑक्साइड) हे नमुनेदार क्षारक आहेत. काही वेळा मात्र अम्ल व क्षारकात विक्रिया होऊन उदासिनिकरण होताना पाणी निर्माण होत नाही. (उदा., नायट्रीक अम्ल व अमोनिया यांच्यातील विक्रिया) म्हणजे अम्लातील हायड्रोजन क्षारक घेऊ शकतात. हायड्रोजन नसलेल्या संयुगांशी क्षारकांची विक्रिया होते (उदा., बोरॉन ट्रायफ्ल्युओराइड). अम्ले ही इलेक्ट्रॉनांच्या जोडीचा स्वीकार करणारी संयुगे तर क्षारक इलेक्ट्रॉनांच्या जोडीचा त्याग (दान) करणारी संयुगे होत.

अम्लातील हायड्रोजनाच्या एका वा अनेक अणूंच्या जागी धातूचे अणू वा धन विद्युत् भारित मूलके (अणुगट) येऊन बनलेल्या संयुगांना लवणे म्हणतात. लवणे सर्वसाधारण तापमानात स्फटिकी असतात व ती पाण्यात विरघळविल्यास धन व ऋण विद्युत् भारित आयन निर्माण होतात [⟶ अम्ले व क्षारक, लवण].

ऑक्सिडीकारक व क्षपणकारक : ⇨ऑक्सिडीभवन व ⇨क्षपण या विक्रियांमध्ये कित्येक घटकांची इतरांशी संयोग पावण्याची क्षमता (संयुजा) बदलते. उदा., तांब्यावर ऑक्सिजनाची विक्रिया केल्यास तांब्याचे ऑक्साइड मिळते. या विक्रियेत तांब्याच्या अणूंचे ऑक्सिजनाच्या अणूंनी ऑक्सिडीभवन झाले, असे म्हणतात. येथे तांब्याच्या अणूची संयुजा ० पासून + २ पर्यंत (संयुगात) वाढली आणि त्याच वेळी ऑक्सिजनाची संयुजा ० पासून–२ पर्यंत (संयुगात) घटली.

तांब्यावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया केल्यास तांब्याचे सल्फेट, सल्फर डाय-ऑक्साइड वायू व पाणी ही संयुगे मिळतात. या विक्रियेत सल्फ्यूरिक अम्लम या ऑक्सिडीकारकाने तांब्याचे ऑक्सिडीभवन आणि सल्फ्यूरिक अम्लाचे क्षपण होऊन सल्फर डाय-ऑक्साइड बनते. येथे गंधकाची संयुजा + ६ पासून (H2SO4 –सल्फ्यूरिक अम्ल ) + ४ पर्यंत (SO2 –सल्फर डाय-ऑक्साइड) घटते, तर तांब्याची ० पासून + २ पर्यंत वाढते. अशा प्रकारे या वर्गीकरणात परस्परपूरकता आहे. कारण यात नेहमीच ऑक्सिडीकारकाचे क्षपण व क्षपणकारकाचे ऑक्सिडीभवन होते. रसायनशास्त्राच्या सर्व शाखांमध्ये ऑक्सिडीभवन व क्षपण यांची असंख्य उदाहरणे आढळत असल्याचे हे वर्गीकरण महत्त्वाचे आहे तसेच या वर्गीकरणामुळे पुष्कळ विक्रियांमध्ये शेवटी काय निष्पन्न होईल, याविषयी पूर्वानुमान करता येते.

रसायनबाह्य वर्गीकरणे : संयुगांची वर्गीकरणे सोयीनुसार इतरही अनेक प्रकारे करता येतात. उदा., शुद्ध द्रव्याच्या भौतिक अवस्थांनुसार संयुगे घन, द्रव व वायू या प्रकारांत विभागता येतात. हे वर्गीकरण उपयुक्त असले, तरी संयुगांची संरचना वा विक्रियाशीलता यांचा यावरून बोध होत नाही. उदा., वाफ, पाणी आणि बर्फ या एकाच संयुगाच्या (H2O) तीन अवस्था असून त्या रासायनिक दृष्ट्या एकसारख्याच आहेत.

उद्‌गमानुसार करण्यात येणाऱ्या वर्गीकरणात संयुगांचे नैसर्गिक व कृत्रिम (किंवा संश्लेषित) हे मुख्य प्रकार होतात आणि नैसर्गिक प्रकाराचे भूजात (पृथ्वीवरील), उल्काजन्य, चांद्र इ. उपप्रकार करता येतात. येथे कोणत्याही प्रकारातील असले, तरी शुद्ध संयुग रासायनिक दृष्टीने सारखेच असते. यामुळे अशा प्रकारच्या वर्गीकरणास रसायनशास्त्राज्ञांच्या मते महत्त्व नाही.

काही प्रचलित संयुग प्रकार : वरील वर्गीकरणांमध्ये उल्लेख झालेले व न झालेले संयुग प्रकारांची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे. यांपैकी काही प्रकार वरील एखाद्या वर्गीकरण पद्धतीत अंतर्भूत होणारेही असू शकतील.

योगिक वा रेणवीय संयुग : दोन अथवा अधिक साधी संयुगे जोडली जाऊन वा संघटित होऊन बनलेले संयुग. आधीच संतृप्त असलेले (मुक्त संयुजा नसलेले) दोन वा अधिक रेणू जोडले जाऊन वा संघटित होऊन बनलेल्या संयुगाचा रेणवीय संयुग असेही म्हणतात. द्विलवणे, स्फटिकजलयुक्त लवणे व धातू-अमेनियम अनुजात ही यांची उदाहरणे होत.

सहयोगी संयुगे : साधारणपणे एकाच वा सारख्या रासायनिक संघटनाचे दोन वा अधिक रेणू संघटित होऊन बनलेल्या जटिल रेणूच्या संयुगाला हे नाव देतात.

समावेशक संयुगे : समावेशक विक्रियेने (एक विक्रियाकारक दुसऱ्या विक्रियाकारकात समाविष्ट होणाच्या विक्रियेने) बनलेली अथवा एक वा अनेक द्विबंध व त्रिबंध संतृप्त होऊन बनलेली संयुगे.

ॲलिसायक्लिक संयुगे : कार्बन अणूंचे संतृप्त वलय असलेली कार्बनी संयुगे. उदा., सायक्लोहेक्झेन.

द्वि-अंगी संयुग : निश्चित रेणवीय गुणोत्तरात असलेल्या दोन मूलद्रव्यांपासून बनलेले संयुग. उदा., सोडियम क्लोराइड Nacl, मॅग्नेअशियम नायट्राइड Mg3N2.

ग्राम संयुग : ज्या रासायनिक संयुगांत धातूचा आयन दोन वा अधिक अधातवीय अणूंशी जोडला जाऊन विषमवलयी संरचना बनलेली आहे असे संयुग [⟶ ग्रामण].

परिवेष्टीत (आवेष्टीत) संयुग : एका घटकाच्या रेणू दुसऱ्या एका संयुगाच्या स्फटिकी संरचनेत प्रत्यक्षात आवेष्टित झालेला आहे असे वनरूप रेणवीय संयुग, उदा.,स SO2, CO2, CO यांची बर्फ व हायड्रोक्विनोन यांबरोबर झालेली परिवेष्टित संयुगे. अशा संयुगांचे गुणधर्म मूलतः आवेष्टित करणाऱ्या, संयुगांचे असतात. पूर्वी याला अंतर्विष्ट संयुग म्हणत.

जटिल संयुग : संरचनात्मक दृष्ट्या दोन किंवा अधिक संयुगांचे किंवा आयनांचे बनलेले संयुग. उदा., [CO(NH2)6] Cl3 [Cu (NH3)4] SO4.

वलयी संयुग : ज्याच्या काही वा सर्व अणूंपासून वलयी संरचना बनलेली असते असे संयुग.

समवलयी संयुग : एकाच मूलद्रव्याच्या अणूंचे बनलेले वलय असलेले संयुग. उदा., बेंझीन.

विषमवलयी संयुग : भिन्न मूलद्रव्यांच्या काही अणूंपासून बनलेल्या वलयाची संरचना असलेले संयुग.

स्पायरो संयुग : ज्या संयुगात दोन वलये असून त्यांमध्ये एक कार्बन अणू समाईक आहे असे संयुग.

एपॉक्सी संयुग : एखाद्या संयुगातील एकमेकांना जोडले गेलेले कार्बन अणू ऑक्सिजन अणूमार्फत जोडले गेले (ऑक्सिजन सेतूने), तर जी संरचना होते तशी संरचना असलेले संयुग. उदा., १, ४, एपॉक्सी ब्यूटेन.

उष्माग्राही संयुग : जे संयुग तयार होताना उष्णता शोधली जाते असे संयुग.

उष्मादायी संयुग : जे संयुग तयार होताना उष्णता बाहेर टाकली जाते असे संयुग.

अंतःसयुंग : एखाद्या संयुगाच्या संरचनेमधील अणूंमध्ये संयुजाबंध निर्माण होऊन बनलेले संयुग. सामान्यतः त्याची संरचना वलयी असते व ती होताना पाणी अथवा तत्सम साधे द्रव्य अथवा त्याची घटक मूलद्रव्ये गमावली जातात. उदा., अंतर-एस्टरे अंतर-ॲनहायड्राइडे.

आंतरधातवीय संयुग : यात केवळ धातूंचे अणू असून ते धातवीय बंधांनी जोडलेले असतात, उदा., InAs. यालाच इलेक्ट्रॉन किंवा ह्यूम-रोदरी संयुग असेही म्हणतात.

आंतरपोकळी संयुग : यात एक वा अनेक धातू व विशिष्ट धातू सद्दश मूलद्रव्ये असून धातूच्या जालिकेतीलर अणूंमधल्या पोकळ्यामध्ये (फटींमध्ये) धातुसदृश मूलद्रव्याचे अणू उपस्थिक असतात. उदा., TaC, TiC, IrC, NbC आणि कार्बन, नायट्रोजन, बोरॉन व हायड्रोजन यांची धातूबरोबरची यांसारखी संयुगे.

संतृप्त संयुग : ज्यातील सर्व अणूंच्या संयुजांची पूर्ती झालेली आहे असे कार्बनी संयुग. म्हणजे यात द्विबंध वा त्रिबंध नसतात. त्यामुळे त्यात आणखी मूलद्रव्ये अथवा संयुगे समाविष्ट करता येत नाहीत.

असंतृप्त संयुग : एक वा अनेक द्विबंध वा त्रिबंध असलेल्या कार्बनी संयुगाला हे नाव देतात. हे बंध सहजपणे मोकळे करून त्यांना इतर घटक जोडता येतात उदा., ओलेफिने, डायओलेफिने.

मार्गण (अन्वेषी) संयुग : विविध विक्रिया किंवा प्रक्रिया सोयीस्करपणे अभ्यासण्यासाठी वापरण्यात येणारे व सुलभतेने ओळखता येणारे संयुग. शरीरक्रियावैज्ञानिक विक्रियांचे अध्ययन करण्यासाठी अशा संयुगांचा पुष्कळ उपयोग केला जातो. [⟶ मार्गण मूलद्रव्ये].

शृंखलाबद्ध संयुगे : यांचा विन्यास अणुगटांपासून बनलेल्या दोन स्वतंत्र कड्यांचा बनलेला असतो. अणूंच्या एका गटाचे कडे अणूच्या दुसऱ्या गटाच्य कड्यामधून गेलेले असते परंतु ही कडी बंध प्रेरणांनी जोडलेली नसतात. अवकाशीय दृष्टीने मात्र ती एकमेकांत गुंतलेली असतात. त्यामुळे त्यांना संयुग म्हणता येईल की नाही असा प्रश्न उपस्थित होतो.

जटिल संयुगे : ज्या संयुगाच्या रेणूत सहसंबद्ध बंध असतो त्याला सहबद्ध संयुग, जटिल संयुग किंवा (नुसतीच) जटिल ही संज्ञा लावतात. हा बंध होताना जो अणू इलेक्ट्रॉनयुग्म देतो त्याला बंधक म्हणतात. ज्या बंधकात इलेक्ट्रॉनयुग्म देणारा एकच अणू असतो त्याला एकदंती, असे दोन अणू असणाऱ्याला द्विदंती व अनेक अणू असणाऱ्यांना बहुदंती बंधक म्हणतात. द्विदंती व बहुदंती बंधकांमुळे ग्राभ संयुगे [⟶ ग्राभण] निर्माण होतात. इलेक्ट्रॉनयुग्म स्वीकारणाऱ्या अणूला मध्यवर्ती अणू किंवा सहसंबद्धता केंद्र संज्ञा लावतात. असे अणू धातूचे आयन असतात.

जटिले धन विद्युत् भारित, ऋण विद्युत् भारित अथवा उदासीन असतात. मध्यवर्ती अणूवरील मूळच्या विद्युत् भारातून बंधकावरील विद्युत् भार वजा केल्यावर जो विद्युत् भार उरतो त्यावर हे अवलंबून असते.

प्रशियन ब्ल्यू हा निळा रंग हे जटिल संयुगाचे एक प्राचीन उदाहरण होय. पोटॅशियम फेरोसायनाइड हे असेच आणखी एक उदाहरण आहे.

इ. स. १७९८ मध्ये टासार्ट यांना असे दिसून आले की, कोबाल्ट क्लोराइड व जलीय अमोनिया मिश्र केल्यास CoCl3.6NH3 या संघटनाचे संयुग बनते. कोबाल्ट क्लोराइड व अमोनिया ही दोन्ही संयुगे स्थिर स्वरूपाची असतानाही ती सुलभतेने संयोग पावतात व वेगळ्या गुणधर्माचे संयुग बनते, याचे त्यांना फार आश्चर्य वाटले. लोह आणि प्लॅटिनम यांचीही अशीच संयुगे बनतात, असे त्यानंतर दिसून आले.

अशा संयुगांच्या संरचनेचे स्पष्टीकरण प्रथम १८९३ मध्ये आल्फ्रेड व्हेर्नर यांनी केले. त्यांच्या मते मूलद्रव्यांच्या अणूंना प्रमुख व दुय्यम अशा दोन प्रकारच्या संयुजा असतात. आयनावरील विद्युत् भाराची परिपूर्ती प्रमुख संयुजेने होते आणि सहसंबद्ध गट दुय्यम संयुजांनी जोडले जातात. कोबाल्ट क्लोराइडामध्ये कोबाल्टाच्या अणूला क्लोरिनाचे अणू प्रमुख संयुजेने जोडलेले आहेत. अमोनियाची विक्रिया कोबाल्ट क्लोराइडवर होते तेव्हा अमोनियाचे रेणू दुय्यम संयुजांनी कोबाल्ट अणूला जोडले जातात. जटिलांमधील बंधकांची जोडणी सहसंबंद्ध बंधाने होते, हे १९२७ मध्ये एन्. व्ही. सिज्विनक यांनी दाखविले उदा., बोरॉन ट्रायफ्युओराइड व अमोनिया यांपासून पुढीलप्रमाणे सहसंबद्ध संयुग बनते.

महत्त्व व उपयोग : रासायनिक व तांत्रिक क्षेत्रांत जटिलांचा उपयोग अनेक तऱ्हांनी होतो. अनेक जटिले रंजक द्रव्ये आणि रंगद्रव्ये म्हणून वापरली जातात. उदा., प्रशियन ब्ल्यू, कॉपर थॅलोसायनीन.

कित्येक धातूंच्या निष्कर्षणासाठी जटिलोत्पादक प्रक्रिया उपयोगी पडतात. उदा., जलीय अमोनियाच्या योगाने जटिले बनवून निकेल, कोबाल्ट व तांबे ही धातूकांपासून (कच्च्या रूपातील धातूंपासून) निष्कर्षित करतात. कार्बन मोनॉक्साइडाबरोबर निकेलाचे जटिल बनते. ते बाष्पनशील आहे. त्यामुळे ऊर्ध्वपातनाने (तापवून बाष्प करून व मग ते थंड करून अशुध्दी अलग करण्याच्या क्रियेने) शुद्ध करता येते. नंतर त्याचे अपघटन केले म्हणजे शुद्ध निकेल मिळते. सोन्याचे निष्कर्षण करताना जलीय सायनाइडे वापरून सोन्याचे डायसायनोऑरस जटिलात रूपांतर केले जाते.

रासायनिक विश्लेषणात विवेचन निक्षेपकारक (मिश्रणातील काही निवडक आयनांची जटिले बनवून त्यांचे निक्षेपण करणारे) म्हणून जटिलकारकांचा उपयोग करता येतो. उदा., डायमिथिल ग्लायऑक्झाइमाने निकेल आयनांचे जटिल इतर धातूंचे आयन तसेच ठेवून निक्षेपित करता येते. काही जटिले रंगीत असतात, त्यांचा उपयोग करून वर्णपट प्रकाशमापकाने [⟶ प्रकाशमापन] आयनांची मात्रा ठरविता येते. काही जटिलांच्या अंगी कार्बनी विद्रावकांत विरघळण्याचा गुण असतो. त्यामुळे जलीय विद्रावात असलेल्या अनेक धातवीय आयनांतून त्या आयनाचे ॲसिटिल ॲसिटोनेट हे जटिल बनवितात व ते कार्बनी विद्रावकात विद्राव्य असल्यास कार्बनी विद्रावकाने निष्कर्षण करून इष्ट आयन वेगळा करता येतो.

काही जटिले उत्प्रेरक (रासायनिक विक्रियेचा वेग बदलणारे पदार्थ) म्हणून फार उपयोगी पडतात. उदा., टिटॅनियम ट्रायक्लोराइड व ट्रायएथिल ॲल्युमिनियम यांपासून बनणारे जटिल हे द्विबंध असलेल्या कार्बनी संयुगाचे ⇨बहुवारिकीकरण सौम्य विक्रिया परिस्थितीत घडवून त्रिमितीय विशिष्ट संरचनेचे आणि उच्च रेणुभारचे बहुवारिक बनविण्यास उपयोगी पडते.

जैव विक्रियांमध्येही जटिले महत्त्वाची आहेत. कित्येक एंझाइमाचे (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांचे) कार्य त्याच्या संरचनेत जटिलावस्थेत असलेल्या धातवीय आयनावर अवलंबून असते. कार्बॉक्सिपेप्टिडेज ह्या पचनक्रियेत महत्त्वाच्या असलेल्या एंझाइमात जस्ताचा आयन जटिल रूपाने प्रथिनातील ॲमिनो आम्लांच्या अवशेषांशी सहसंबद्ध झालेला असतो. रक्तामधील हीमोग्लोबिनात लोह पॉर्फिरीन जटिले असतात. त्यातील लोह अणूच्या अंगी ऑक्सिजन रेणूशी सहसंबद्ध बंध निर्माण करणे व तो मोडणे या क्रिया व्युत्क्रमी पद्धतीने करण्याचा गुण असतो. वनस्पतींतील हरितद्रव्यात (क्लोरोफिलामध्ये) मॅग्नेशियमाचे आणि ब१२ जीवनसत्त्वामध्ये कोबाल्टाचे जटिल असते.

जटिलांमध्ये अनेक तऱ्हांच्या समघटकता संभवतात [⟶ समघटकता].

संश्लेषण : संयुगे मिळविण्यासाठी रासायनिक विक्रियांच्या मदतीने छोट्या रेणूंपासून मोठे रेणू अथवा अधिक साध्या संयुगांपासून जास्त गुंतागुंतीची संरचना असलेली संयुगे किंवा रेणूमधील अणूंची फेरमांडणी करून नवीन रेणू निर्माण करण्याची प्रक्रिया. प्रक्रियेत प्रथम मिळणाऱ्या अशुद्ध मिश्रणातून सामान्यपणे ⇨ऊर्ध्वपातन, ⇨स्फटिकीकरण व विद्रावकांद्वारे ⇨निष्कर्षण इ. इष्ट प्रक्रिया करून संयुग शुद्ध करतात. अधिक अवघड प्रकारच्या शुद्धीकरणात विवेचक अभिशोषण वर्णलेखन [⟶ वर्णलेखन], ⇨विद्युत् संचारण वगैरे पद्धती वापरतात.

संश्लेषण प्रक्रियांचा उपयोग : एखाद्या उत्पादनाची (उदा., खतांसाठी लागणारा अमोनिया) औद्योगिक मागणी पुरी करणे प्रथिने, अल्कलॉइडे यांसारख्या नैसर्गिक संयुगांची संरचना जाणून घेणे अथवा त्याची निश्चिती करून घेणे रासायनिक संरचना व विक्रियाशीलता यांच्याविषयीचे सिद्धांत पारखून घेणे आणि निसर्गात न आढळलेले व पूर्वी तयार न केलेले विशिष्ट संरचना असलेले संयुग तयार करणे यांपैकी कोणत्याही कारणासाठी केला जातो. [⟶ संश्लेषण].

पुढील संयुग-गटांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत : अमाइडे, अमाइने, अम्ल-ॲनहायड्राइडे, अम्ल-हॅलाइडे, अम्ले व क्षारक, अल्कलॉइडे, अल्कोहॉले, अँथोसायनिने आणि अँथोझँथिने, ॲझाइडे, ॲझो संयुगे, ॲमिनो अम्ले, ॲरोमॅटिक संयुगे, ॲलिफॅटिक संयुगे, ॲलिसायक्लिक संयुगे, ॲसिटाले, आल्डिहाइडे, ऑक्साइडे, इंटरफेरॉने, उभयधर्मी संयुगे, एंझाइमे, एथॅनॉल अमाइने, एनॅमल, एस्टरे, कॅरोटिनॉइडे, कार्बनी-धातु संयुगे, कार्बाइडे, कार्बॉक्सिलिक अम्ले, कार्बोनिले, कार्बोनेटे, कार्बोहायड्रेटे, कीटोने, क्विनोने, खनिजतेल रसायने, ग्लाटयकोसाइडे, ग्लुधकोसाइडे, जीवनसत्वे, टर्पिने, टॅनिने, डायाझो संयुगे, डेक्स्ट्रिने, थॅलिक अम्ले , न्यूक्लिइक अम्ले, पेक्टिने, पेनिसिलीन, पेरॉक्सी संयुगे, प्युरिने, प्रतिजैव पदार्थ, प्रथिने, प्लॅस्टिक आणि उच्च बहुवारिके, फॉस्फोरिक अम्ले , फिनॉले, फ्लॅव्होने, रंगद्रव्ये, रंगलेप, रंजक व रंजकद्रव्ये, रबर रसायने, रेझिने, लॅकर, लिपिडे, वसाम्ले, विषमवलयी संयुगे, सिलिकोने, सेल्यूलोज, स्टेरॉल आणि स्टेरॉइडे, हायड्रॉक्साइडे, हायड्रोकार्बने, हॉर्मोने इत्यादी. यांशिवाय काही महत्त्वाच्या संयुगांवरही (उदा., बेंझीन, सल्फ्यूरिक अम्ल,) मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी असून मूलद्रव्यांवरील नोंदीमध्ये त्या त्या मूलद्रव्याच्या महत्त्वाच्या संयुगांची माहिती दिलेली आहे.

पाहा : रासायनिक विक्रिया; संयुजा.

संदर्भ :

  • Embree, H. D., Organic Chemistry : Brief Course, 1983.
  • Huheey, J. E., Inorganic Chemistry : Principles of Structure and Reactivity, 1983.
  • Jolly, W. L., Modern Inorganic Chemistry, 1984.
  • McMurry. J., Organic Chemistry, 1984.
  • Sidgwick, N. V., The Chemical Elements and Their Compunds, 2 Vols., London, 1950.
  • Solomons, T. W. G., Organic Chemistry, 1984.

लेखक : ठाकूर, अ. ना.; केळकर, गो. रा.