लवण : अम्‍लाची क्षाराबरोबर विक्रिया झाल्यास तयार होणाऱ्या पदार्थाला रसायनशास्त्रात लवण म्हणतात. क्षारकाचा घन आयन ( विद्युत् भरित अणू वा अणुगट) व अम्‍लाचा ऋण आयन यांनी लवण बनलेले असते. अम्‍ल व क्षारक यांतील रासायनिक विक्रियेला उदासिनीकरण विक्रिया म्हणतात. विरघळलेल्या वा वितळलेल्या अवस्थेत बहुतेक लवाणांचे घन व ऋण भारित आयनांत पूर्णपणे वियोजन होते. आणि त्यामुळे या अवस्थांत ती चांगली विद्युत् संवाहक असतात. [ अम्‍ले व क्षारक उदासिनीकरण ].

मीठ (NaCI), नवसागर (NH4CI), टाकणखार (Na2 B4 O7 l0 H2 O), खाण्याचा (NaHCO3), व धुण्याचा सोडा (Na2CO3), तुरटी [ KAI (SO4)2 . 12 H2O ]. ही लवणांची सामान्य उदाहरणे होत. लवणांचे अस्तित्व वनस्पती, प्राणी व खनिज या तिन्ही सृष्टींमध्ये आढळते. ती नैसर्गिकउद्गमांपासून वेगळी करून किंवा उपलब्ध कच्च्या मालापासून रासायनिक विक्रियांनी मिळविली जातात. त्यांच्या निर्मितीसाठी अनेक रासायनिक विक्रिया उपयोगी पडतात उदा., घटक मूलद्रव्यांचा संयोग घडवून धातू व अम्‍ल यांच्या रासायनिक विक्रियेने धातूचे ऑक्साइड, हायड्रॉक्साइड, कार्बोनेट अथवा सल्फाइड यांवर समुचित अम्‍लाची विक्रिया करून अथवा योग्य अशा दोन लवणांचा परस्पर विक्रियांनी (उदा., सिल्व्हर क्कोराइडासाठी सिल्व्हर नायट्रेट व सोडियम क्कोराइड यांमधील विक्रियेने ).

प्रकार : समुचित अम्‍लातील हायड्रोजन अणूचे प्रतिष्टापन धातूंचे आयन किंवा ऋणायनी मूलके [मूलके ] यांनी केले म्हणजे लवणाचे संघटन सिद्ध होते. उदा., हायड्रोक्कोरिक अम्‍ल HCL पासून बनणारे NaCl सोडियम क्कोराइड हे लवण. ज्या अम्‍लांच्या रेणूत प्रतिष्ठापन होण्यासारखे एकापेक्षा जास्त हायड्रोजन अणू असतात त्यांपासून दोन प्रकारची लवणे मिळू शकतात. उदा., सल्फ्यूरिक अम्‍लापासून सोडियम सल्फेट Na2 SO4 व सोडियम हायड्रोजन सल्फेट NaHSO4. सोडियम सल्फेटाच्या संघटनेत सल्फ्यूरिक अम्‍लातील दोन्ही हायड्रोजन अणू प्रतिष्ठापित झालेले आहेत. सोडियम हायड्रोजन सल्फेटाच्या संघटनेत प्रतिष्ठापित होण्यासारखा एक हायड्रोजन अणू शिल्लक राहिलेला आहे. अम्‍लातील सर्व हायड्रोजन अणू प्रतिषठापित होऊन बनलेल्या लवणाला सामान्य लवण म्हणतात आणि ज्यामध्ये काही हायड्रोजन अणू प्रतिष्ठापित न झालेले असे शिल्लक आहेत त्याला अम्‍लीय लवण म्हणतात. सोडियम हायड्रोजन सल्फेट हे अम्‍लीय लवणाचे उदाहरण आहे, अम्‍लाच्या संघटनेत दोनापेक्षा जास्त हायड्रोजन अणू असतील ( समजा तीन ), तर त्यापासून एक सामान्य लवण व दोन अम्‍लीय लवणे बनू शकतील उदा., H3PO4 पासून Na3 PO4 सोडियम फॉस्फेट हे सामान्य लवण व NaH2 PO4 सोडियम डायहायड्रोजन फॉस्फेट ही दोन लवणे बनू शकतात. दोन हायड्रोजन अणू असलेल्या अम्‍लातील एक हायड्रोजन अणू एका धातूच्या अणूने व दुसऱ्या धातूच्या अणूने प्रतिष्ठापित झाला, तर जे लवण बनते त्याला मिश्र लवण म्हणतात. उदा., NaKSO4. मिश्र लवणांची संघटने त्यांच्या रेणूतील घटक अणूंच्या संख्यांचा उल्लेख करून स्पष्टपणे दाखविता येतात. उदा., NaH2 PO4 सोडियम डायहायड्रोजन फॉस्फेट,Na2 HPO4 डायसोडियम मोनोहायड्रोजन फॉस्फेट.

लवणांचे संघटन क्षारकीय हायड्रॉक्साइडातील हायड्रॉक्सी ( OH ) गटाचे प्रतिष्ठापन अधातूच्या अणूने किंवा ऋण केले असताही सिद्ध होते. उदा., NaOH पासून OH गटाचे CI ने प्रतिष्ठापन होऊन NaCI. ज्या क्षारकीय हायड्रॉक्साइडात एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सी गट आहेत तेथे दोन प्रकारची लवणे बनू शकतात. उदा., दोन हायड्रॉक्सी गट असलेल्या Ba(OH)2 पासून BaCl2 हे दोन्ही OH गट प्रतिष्ठापित होऊन बनलेले सामन्य लवण व Ba(OH)Cl हे एकच OH गट प्रतिष्ठापित होऊन बनलेले लवण. या प्रकारच्या लवणाला क्षारकीय लवण म्हणतात. क्षारकीय लवणाच्या रेणूत असलेल्या OH गटांच्या संख्येस अनुसरून त्यांचे एक-क्षारकीय -एक OH गट असलेले, द्वि-क्षारकीय-दोन OH गट असलेले इ. प्रकार होतात.

लवणे पाण्यात विरघळली म्हणजे आयनीभवन होऊन घटकांचे आयन निर्माण होतात. उदा., NaCl+H2 O ⟶ Na’ + Cl’ + H’+ OH’. पाण्याचेही काही प्रमाणात आयनीभवन झाल्यामुळे H’ OH’ आयनही बनतात. विरघळलेले लवण जर प्रबल अम्‍ल आणि दुर्बल क्षारक किंवा दुर्बल अम्‍ल व प्रबल क्षारक यांपासून बनलेले असेल, तर विक्रिया येथेच थांबत नाही. उदा., CuSO4 + 2H2O = Cu”+ SO4 + 2H’ 2OH’ असे प्रथम आयनीभवन होते पण लगेच Cu”आयन आणि OH’ आयन यांमध्ये विक्रिया होते व Cu(OH)2 बनते. तथापि Cu(OH)2 हे एक दुर्बल क्षारक आसल्यामुळे ते वियोजन न झालेल्या अवस्थेतच राहते. त्यामुळे ते बनण्यासाठी वापरले गेलेले OH आयन, आयनीभवन झालेल्या रूपात म्हणजेच Cu(OH)2 रूपात राहतात. याचा परीणाम असा होतो की, विद्रवात OH आयनांची संख्या कमी व H आयनांची जास्त होते, त्यामुळे विद्राव अम्‍लधर्मी बनतो. Na3PO4 हे लवण प्रबल क्षारक व दुर्बल अम्‍ल यांपासून बनलेले आहे. ते पाण्यात विरघळले म्हणजे आयनीभवन होते.

Na3PO4 +3H2 O ⟶ 3Na’ + PO’4 + 3H’+ 3OH’ H’ आयनामुळे PO4पासून H3PO4 बनते पण ते बरेचसे आयनीभवन न झालेल्या रूपात राहते व त्यामुळे विद्रावात OH आयन जास्त होतात व विद्राव क्षारधर्मी बनतो. लवणांवर होणाऱ्या पाण्याच्या या परिणामाला जलीय विच्छेदन म्हणतात.

जटिल लवणे पाण्यात विरघळली असता विद्रावात जटिल आयन निर्माण होतात. उदा., K4Fe(CN)6 यापासून K आणि Fe (CN)6 हा जटिल आयन बनतो.

लवणांचे वितळबिंदू सामान्यतः उच्च असतात. वितळलेल्या स्थितीत लवणे विद्युत् संवाहक असतात.

लवणामधील घटकांचे बंध विद्युत् संयोजक स्वरूपाचे असतात. तेथे धातूच्या अणूमधील एक ( अथवा अधिक ) इलेक्ट्रॉन अधातवीय अणूकडे किंवा ऋण मूलकाकडे जातो व त्यामुळे बंध निर्माण होतो. धातूच्या अणूवर त्यामुळेच घन विद्युत् भार व अधातूच्या अणूवर किंवा ऋण मूलकावर ऋण विद्युत् भार येतो.

कारेकर, न. वि. केळकर, गो. रा.