फ्रिट्झ स्ट्रासमान

स्ट्रासमान, फ्रिट्झ: (२२ फेबुवारी १९०२—२२ एप्रिल १९८०). जर्मन भौतिकीय रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ⇨ ओटो हान यांच्यासमवेत न्यूट्नॉनांच्या भडिमारामुळे युरेनियमाच्या अणुकेंद्रांचे भंजन होते असा शोध लावला (१९३८). यामुळे अणुऊर्जानिर्मिती व तिचे नियंत्रण करण्याच्या क्षेत्राला चालना मिळाली.

स्ट्नासमान यांचा जन्म बोपार्ड (जर्मनी) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण डय्सेल्डॉर्फ येथे झाले. त्यांनी हॅनोव्हर येथील टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये रसायनशास्त्राचा अभ्यास केला. तेथूनच त्यांनी भौतिकीय रसायनशास्त्राची पीएच्.डी. पदवी मिळविली (१९२९). त्यांनी हान व ⇨ लिझे माइटनर यांच्यासमवेत ‘ कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्री, बर्लिन ’ ( आता ‘ माक्स प्लांक इन्स्टिट्यूट, मेंझ’ ) येथे संशोधन केले (१९२९—४४). याच काळात ते बर्लिन येथील कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूट व हॅनोव्हर येथील टेक्निकल इन्स्टिट्यूट या ठिकाणी अध्यापक होते. १९४६ मध्ये त्यांची ‘ युनिव्हर्सिटी ऑफ मेंझ ’ येथे अकार्बनी व अणुकेंद्रीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. तेथे त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ( नंतरची इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर केमिस्ट्री ) या संस्थेची स्थापना केली. ते माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्री या संस्थेतील रसायनशास्त्र विभागाचे संचालक होते (१९४५—५३). त्यांनी सॅनडिएगो येथे ट्राएगा मार्क-II ही अणुभट्टी उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले (१९५८—६७).

इ. स. १९३४ मध्ये ⇨ एन्रीको फेर्मी यांनी युरेनियमाच्या अणूंवर मंदगती न्यूट्रॉनांचा भडिमार करून नेपच्यूनियम हे नवीन मूलद्रव्य तयार केले. या प्रयोगातच युरेनियमाच्या अणूंचे भंजन घडून आले पण त्यांना या विक्रियेचे महत्त्व ओळखता आले नाही. त्यांच्या या संशोधनामुळे प्रभावित होऊन स्ट्रासमान, हान व लिझे माइटनर यांनी युरेनियमाच्या न्यूट्रॉन प्रवर्तित क्रियाशीलतेबाबत प्रयोग करण्यास सुरुवात केली (१९३४—३८). स्ट्रासमान व हान यांनी मंदगती न्यूट्रॉनांच्या भडिमारामुळे युरेनियम (२३५) या समस्थानिकाच्या (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकाराचा) अणुकेंद्राचे भंजन होऊन त्याचे बर्‍याच हलक्या व लहान मूलद्रव्यांत रूपांतर होते, असा निष्कर्ष काढला. तसेच त्यांनी भंजन उत्पादातील बेरियम, क्रिप्टॉन व इतर मूलद्रव्यांचे अस्तित्व प्रयोगांनी पडताळून प्रस्थापित केले (१९३९).

स्ट्रासमान यांनी भूकालक्रम ठरविण्यासाठी वापरली जाणारी स्ट्राँशियम व रुबिडियम कालनिर्धारण पद्धती विकसित केली (१९३४) तसेच माइटनर व हान यांच्यासमवेत ⇨ युरेनियमोत्तर मूलद्रव्ये शोधण्यासाठी संशोधन केले. स्ट्रासमान, हान व माइटनर यांना त्यांच्या संशोधनकार्या-बद्दल १९६६ मध्ये अमेरिकेच्या ॲटॉमिक एनर्जी कमिशनचा फेर्मी पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

स्ट्रासमान यांचे मेंझ ( जर्मनी ) येथे निधन झाले.

दीक्षित, रा. ज्ञा.